Thursday, September 10, 2026

 वृत्त क्रमांक

प्रारूप मतदार यादी अंतिम नसून, पात्र मतदारांनी नोंदणीची संधी घ्यावी

विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ अंतर्गत अंतिम यादी नोव्हेंबरच्या सुरुवातीला प्रसिद्ध होणार

नांदेड(जिमाका), दि. १० : राज्यात सध्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR- Special Intensive Revision)-२०२६ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी ही अंतिम मतदार यादी नसल्याने, तिची २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील मतदारसंख्येशी अथवा मतदानाच्या आकडेवारीशी तुलना करणे अयोग्य व दिशाभूल करणारे ठरेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ च्या पहिल्या टप्प्यात मतदार अर्जामध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर सर्वसाधारणपणे वास्तव्यास असल्याची वस्तुस्थिती पडताळण्यावर विशेष भर देण्यात आला. त्यामुळे संबंधित पत्त्यावर प्रत्यक्ष वास्तव्यास नसलेल्या व्यक्तींची नावे प्रारूप यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. तसेच मृत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या पुढील टप्प्यात अर्जामध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर उपलब्ध नसलेले किंवा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेले, मात्र राज्याच्या हद्दीतच वास्तव्यास असलेले मतदार त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी मतदार म्हणून नोंदणीसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय १ ऑक्टोबर २०२४ नंतर वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र नवमतदारांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.

विशेष सखोल पुनरीक्षणाच्या पहिल्या टप्प्यात दीर्घकाळ घराबाहेर राहणे अथवा अन्य कारणांमुळे ज्यांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट होऊ शकली नाहीत, अशा पात्र नागरिकांनाही आता मतदार म्हणून नोंदणीसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे सध्याचा टप्पा हा प्रामुख्याने पात्र मतदारांची नावे समाविष्ट करण्यावर केंद्रित आहे. एकही पात्र नागरिक मतदार यादीतून वंचित राहू नये, याची सुनिश्चिती या प्रक्रियेद्वारे केली जात आहे.

विशेष सखोल पुनरीक्षणाची संपूर्ण प्रक्रिया नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पूर्ण होणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे सध्या प्रकाशित झालेल्या प्रारूप यादीतील मतदारसंख्या आणि पूर्वीच्या संक्षिप्त पुनरीक्षणावर आधारित अंतिम मतदार यादीतील आकडेवारी यांची तुलना करणे योग्य ठरणार नाही.

अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच तुलना करावी

विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी मतदारसंख्येबाबत कोणतेही निष्कर्ष काढणे अथवा तुलना करणे टाळावे. अंतिम मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध झाल्यानंतरच तिच्या आधारे कोणतेही विश्लेषण किंवा मूल्यमापन करणे योग्य ठरेल. त्यामुळे सर्व संबंधित घटक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी अंतिम यादी प्रसिद्ध होईपर्यंत प्रतीक्षा करून त्यानंतरच मतदारसंख्येबाबत निष्कर्ष काढावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

***

No comments:

Post a Comment

  मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...