Thursday, November 26, 2026

वृत्त क्रमांक 

बाल न्याय संस्थांच्या तपासणी समितीसाठी अशासकीय सदस्यांना संधी

पात्र इच्छुकांनी 15 दिवसांत अर्ज सादर करण्याचे आवाहन

नांदेड, दि.26 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 मधील कलम 54 नुसार नोंदणीकृत तसेच मान्यताप्राप्त बाल संगोपन संस्थांच्या तपासणीसाठी राज्य व जिल्हास्तरावर तपासणी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, पात्र इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

यासंदर्भात शासन निर्णय क्रमांक बालगृ-2017/प्र.क्र.211/का-8, दि. 21 मार्च 2018 अन्वये तपासणी समिती गठित करण्यात आली आहे. शासन निर्णयात नमूद केलेले पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक अशासकीय सदस्यांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नांदेड येथे वृत्त प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत सादर करावेत.

इच्छुकांनी आपले अर्ज महिला व बाल विकास भवन, महात्मा फुले मार्केटच्या मागे, गणेश नगर रोड, नांदेड या पत्त्यावर सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

**

महात्मा जोतीराव फुले यांनी 1883 सालीच पाण्याचे महत्व ओळखून जलसंधारणाचा मूलमंत्र दिला होता. पाणी आडवा, पाणी जिरवा - हाच खरा विकासाचा मंत्र!

#महात्माफुले200 #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष #महाराष्ट्रशासन #MahaDGIPR



महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे झालेल्या उपसमिती बैठकीत, पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सिडको, नैना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नदी व नाल्यांवर बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन पुलाला आता बंधारा जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे प्रत्येक पुलाखाली किमान एक मीटर पाणी अडवले जाईल,असे नियोजन करण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच, शक्तीपीठ महामार्गावरही पूल वजा बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

वृत्त क्रमांक 

बाल न्याय संस्थांच्या तपासणी समितीसाठी अशासकीय सदस्यांना संधी

पात्र इच्छुकांनी 15 दिवसांत अर्ज सादर करण्याचे आवाहन

नांदेड, दि.26 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 मधील कलम 54 नुसार नोंदणीकृत तसेच मान्यताप्राप्त बाल संगोपन संस्थांच्या तपासणीसाठी राज्य व जिल्हास्तरावर तपासणी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, पात्र इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

यासंदर्भात शासन निर्णय क्रमांक बालगृ-2017/प्र.क्र.211/का-8, दि. 21 मार्च 2018 अन्वये तपासणी समिती गठित करण्यात आली आहे. शासन निर्णयात नमूद केलेले पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक अशासकीय सदस्यांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नांदेड येथे वृत्त प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत सादर करावेत.

इच्छुकांनी आपले अर्ज महिला व बाल विकास भवन, महात्मा फुले मार्केटच्या मागे, गणेश नगर रोड, नांदेड या पत्त्यावर सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

**

वृत्त क्रमांक 

संविधान मूल्यांच्या जतनासह विकसित भारताच्या निर्मितीत युवकांनी योगदान द्यावे

• माय भारत नांदेडतर्फे ‘विकसित भारत युवा संवाद’; यशवंत महाविद्यालयात 150 युवक-युवतींचा सहभाग

नांदेड, दि. 26 : विकसित भारताच्या निर्मितीत युवकांनी सक्रिय सहभाग नोंदवून राष्ट्रनिर्मितीची जबाबदारी स्वीकारावी, तसेच भारतीय संविधानातील मूल्यांचे जतन व संवर्धन करावे, असे आवाहन संविधान दिनानिमित्त आयोजित ‘विकसित भारत युवा संवाद’ कार्यक्रमातून करण्यात आले. 

युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत मेरा युवा भारत (माय भारत), नांदेड यांच्या वतीने यशवंत महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमात 150 युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. कविता सोनकांबळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. युवा आयकॉन देवयानी देशमुख आणि समाजमाध्यम प्रभावक नागसेन तुळसे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. देवयानी देशमुख यांनी विकसित भारताच्या निर्मितीमध्ये युवकांची भूमिका स्पष्ट करून देशाच्या प्रगतीसाठी युवकांनी जबाबदारी स्वीकारत राष्ट्रनिर्मितीत अर्थपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन केले.

नागसेन तुळसे यांनी भारतीय संविधानाचे जतन व संवर्धन करण्यात युवकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. संविधानातील मूल्यांचे आकलन, लोकशाही तत्त्वांचा आदर आणि जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्यपालन करण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले. भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये लोकशाही व्यवस्थेचा पाया असून, ती प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनात आचरणात आणणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

संविधान दिनानिमित्त आयोजित या संवादातून युवकांना नागरिक म्हणून असलेल्या अधिकारांसोबतच कर्तव्यांची जाणीव करून देण्यात आली. राष्ट्रनिर्मिती, सामाजिक विकास आणि लोकशाही मूल्यांचे संवर्धन यामध्ये युवकांचा सहभाग महत्त्वपूर्ण असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. माय भारतच्या माध्यमातून युवकांना जनजागृती, नेतृत्व विकास आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांमध्ये सहभागासाठी सातत्याने व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे.

माय भारतच्या विविध उपक्रमांची आणि युवकांसाठी उपलब्ध संधींची अधिक माहिती घेण्यासाठी www.mybharat.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

***



वृत्त क्रमांक 

दुष्काळातही रेशीम शेतीतून लाखोंचे उत्पन्न; नांदेड रेशीम हब बनणार!

• जिल्ह्यातील 200 हून अधिक शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न-डॉ. महेंद्र ढवळे यांचे प्रतिपादन

नांदेड, दि. 26 : दुष्काळी परिस्थितीतही कमी पाण्यात आणि योग्य तांत्रिक नियोजनातून रेशीम शेती फायदेशीर ठरू शकते. जिल्ह्यातील 200 हून अधिक शेतकऱ्यांनी चालू हंगामात रेशीम शेतीतून एक लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्याला रेशीम उत्पादनाचे प्रमुख केंद्र अर्थात रेशीम हब म्हणून विकसित करण्याचे नियोजन सुरू असल्याचे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे यांनी केले.

सिल्क समग्र-2 योजनेअंतर्गत येथील जिल्हा रेशीम कार्यालय आणि भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (एसबीआय आरसेटी) यांच्या संयुक्त विद्यमाने 20 ते 26 नोव्हेंबरदरम्यान मालेगाव रोड येथील एसबीआय आरसेटीमध्ये सात दिवसीय लाभार्थी सक्षमीकरण प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी डॉ. ढवळे बोलत होते. त्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी परभणी प्रादेशिक विस्तार केंद्राचे वैज्ञानिक डॉ. अशोक जाधव यांनी रेशीम कीटक संगोपनातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली. एसबीआय आरसेटीचे संचालक कैलास जायभाये यांनी स्वयंरोजगार व वित्तपुरवठा योजनांविषयी मार्गदर्शन केले. डीएसटी प्रशिक्षक शिवप्रसाद माळवतकर यांनी तांत्रिक प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले, तर प्रशिक्षण विभागाचे प्राध्यापक आशिष राऊत यांनी प्रशिक्षणादरम्यान झालेली प्रात्यक्षिके व यशस्वी शेतकऱ्यांच्या अनुभवांची माहिती दिली.

जिल्हा रेशीम विकास अधिकारी अशोक वडवळे यांनी नांदेड जिल्ह्यात रेशीम विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन रेशीम शेतीच्या विस्तारासाठी आणि नांदेडला रेशीम हब म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न आणि स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

यावेळी रेशीम कार्यालयाच्या वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक कांचन जाधव, क्षेत्र सहाय्यक अमर सूर्यवंशी, नरोजी कोरके, अभय कुलकर्णी, संतोष कोल्हे, अनिल खिल्लारे, गजानन काचगुंडे, दत्ता कुस्कटे यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते. 

***





वृत्त क्रमांक 

संविधानाच्या जयघोषात नांदेडमध्ये भव्य संविधान रॅली

• समाजकल्याण विभागाचा पुढाकार; संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन, विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

नांदेड, दि. 26 : भारतीय संविधानातील मूल्यांचा प्रसार, नागरिकांमध्ये लोकशाहीविषयी जाणीव आणि संविधानाने दिलेल्या अधिकार व कर्तव्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने येथील सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाच्या वतीने संविधान दिनानिमित्त शहरात भव्य संविधान रॅली काढण्यात आली. या रॅलीत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचनही करण्यात आले.

रॅलीच्या प्रारंभी सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास, तर जिल्हा समाजकल्याण अधिकारी रेखा शेंडगे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शिवानंद मिनगीरे आणि रेखा शेंडगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. 

महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ते शिवाजीनगर, कलामंदिर, पोलीस अधीक्षक कार्यालय चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीताची धून सादर केली.

यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटनांपैकी एक असून, जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने संविधानाचा अभ्यास करावा. संविधानाने दिलेले अधिकार समजून घेतानाच त्यातील कर्तव्यांचेही प्रामाणिकपणे पालन करावे, असे आवाहन केले. त्यानंतर उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. रॅलीत पोलीस बँड पथकाने देशभक्तिपर गीतांच्या धून सादर करून उत्साह निर्माण केला. 

या रॅलीत मदर टेरेसा नर्सिंग स्कूल, सहयोग कॅम्पस, सिडको येथील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, नांदेड आदर्श विद्यालय, टिळकनगर येथील विद्यार्थी व शिक्षक, स्काऊट-गाईड, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, बार्टीचे समतादूत, विविध महामंडळांचे अधिकारी-कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, आजी-माजी सैनिक संघटना, पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक सहभागी झाले होते. यावेळी श्री हुजूर साहेब ब्लड सेंटर, नांदेड यांच्या वतीने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास समाजकल्याण विभागाचे समाजकल्याण अधिकारी गजानन नरवाडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त व्यक्ती व संस्थांचे प्रतिनिधी, अधिवक्ता इम्रान खान, विजय सुवर्णकार, एल. ए. हिरे, सुनील केंद्रे, ए. एस. पंडित, कैलास मोरे, लक्ष्मी गायके, पंडित खानसोळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

***







मा.ना.डॉ. उदय सामंत, मंत्री ( उद्योग ,गुंतवणूक सेवा व मराठी भाषा ) , महाराष्‍ट्र राज्‍य तथा पालकमंत्री रत्‍नागिरी जिल्‍हा यांचा नांदेड जिल्‍हा दौरा कार्यक्रम दिनांक २७ नोव्‍हेंबर, २०२६



वृत्त क्रमांक 

भोकर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्त्वावर शिल्पनिदेशकांची नियुक्ती

• इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रिक वाहन दुरुस्ती व नळकारागीर व्यवसायांसाठी 30 नोव्हेंबरला लेखी परीक्षा व मुलाखत

नांदेड, दि. 26 : स्वातंत्र्यसैनिक डॉ. दासराव साकळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोकर येथे इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक इलेक्ट्रिक व्हेईकल आणि प्लंबर या व्यवसायांतील रिक्त शिल्पनिदेशक पदांवर 2026-27 या प्रवेश सत्रासाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्त्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी सोमवार, दि. 30 नोव्हेंबर 2026 रोजी लेखी परीक्षा व मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

डीजीटी, नवी दिल्ली यांच्या मानकांनुसार आयटीआय, अप्रेंटिसशिप, पदविका, पदवी तसेच सीओई/सीआयटीएस आदी आवश्यक शैक्षणिक अर्हता आणि अनुभव धारण करणाऱ्या पात्र इच्छुक उमेदवारांनी दि. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक 10 वाजता स्वातंत्र्यसैनिक डॉ. दासराव साकळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोकर जि.नांदेड येथे उपस्थित राहावे.

उमेदवारांनी अर्जासह सर्व आवश्यक मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्रे सोबत आणावीत. पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.

***

 वृत्त क्रमांक 

रक्ताचा तुटवडा टाळण्यासाठी राज्यभर विशेष रक्तदान शिबिरे

• राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सर्व रक्तपेढ्यांना निर्देश

• सामाजिक संस्था, महाविद्यालये, कार्यालये व गृहनिर्माण संस्थांना पुढाकार घेण्याचे आवाहन

नांदेड, दि. 26 : नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात सण आणि सुट्ट्यांमुळे नियमित रक्तदात्यांची उपलब्धता कमी होण्याची शक्यता लक्षात घेता, राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये आणि रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी विशेष स्वैच्छिक रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने केले आहे. यासंदर्भात राज्यातील सर्व रक्तपेढ्या व रक्त संकलन केंद्रांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दिवाळी व नाताळच्या सुट्ट्यांमुळे महाविद्यालये, शाळा आणि कार्यालयांमधील नियमित उपक्रमांवर परिणाम होतो. अनेक रक्तदाते सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जात असल्याने रक्तसंकलनाचे प्रमाण घटण्याची शक्यता असते. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे तसेच नियमित रक्ताची आवश्यकता असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी पुरेसा रक्तसाठा राखणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर सर्व रक्तपेढ्यांनी उपलब्ध रक्तसाठ्याचा आढावा घेऊन स्थानिक गरजेनुसार सामाजिक, राजकीय, धार्मिक संस्था, स्वयंसेवी संघटना, शैक्षणिक संस्था आणि इतर संघटनांच्या सहकार्याने विशेष रक्तदान शिबिरे आयोजित करावीत. मुंबईतील शासकीय रक्तकेंद्रांनी रेल्वे स्थानके, कार्यालये आणि गृहनिर्माण संस्थांसारख्या ठिकाणी शिबिरे घेण्यासह रक्तदात्यांपर्यंत पोहोचून त्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

राज्यातील रक्तदात्यांनी आपल्या जवळच्या रक्तपेढी किंवा रक्त संकलन केंद्रामार्फत आयोजित शिबिरांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. सामाजिक संस्था, महाविद्यालये, कार्यालये आणि गृहनिर्माण संस्थांनीही रक्तदान शिबिरांचे आयोजन करून या जीवनदायी उपक्रमात योगदान द्यावे. रक्ताच्या अभावामुळे कोणत्याही रुग्णाची गैरसोय होऊ नये आणि प्रत्येक गरजू रुग्णाला वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने केले आहे.

***



वृत्त क्रमांक 

संविधानाच्या मूल्यांचा अंगीकार करून जबाबदार नागरिक बना

• श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान दिन उत्साहात साजरा

नांदेड, दि. 26 : संविधानातील मूल्यांविषयी आदरभाव दृढ करणे, सामाजिक व नागरी जबाबदारीची जाणीव निर्माण करणे आणि लोकशाहीप्रती कर्तव्यभाव जागृत करण्याच्या उद्देशाने श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे संविधान दिन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून उपस्थितांनी संविधानाची शपथ घेतली.

या कार्यक्रमाला जिल्हा व सत्र न्यायालयाचे अधिवक्ता अमित डोईफोडे, एस. पी. गोडबोले, संस्थेचे कार्यालय अधीक्षक व्ही. एस. सोनकांबळे, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डी. ए. पोतदार यांनी केले. त्यांनी संविधानाचे महत्त्व विशद करून उपस्थितांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रमुख वक्ते अधिवक्ता अमित डोईफोडे यांनी संविधानाचे महत्त्व आणि संविधानाच्या उद्देशिकेचा अर्थ उदाहरणांसह स्पष्ट केला. व्यक्तीची श्रेष्ठता तिच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. प्रत्येकाने जीवनात बुद्धिवाद आणि विज्ञानवादाचा पुरस्कार करावा तसेच राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करावा, असे त्यांनी सांगितले. सत्य, अहिंसा, धर्मनिरपेक्षता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करून समृद्ध भारत घडविण्यासाठी संविधानातील मूल्ये आचरणात आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून उद्योगांना आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाते. तांत्रिक ज्ञानाबरोबरच प्रशिक्षणार्थ्यांना सामाजिक जबाबदारी, अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव व्हावी, या उद्देशाने राज्यातील सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दर महिन्याला सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना संचालनालयाने दिल्या आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्प निदेशक पी. बी. उभेदळ यांनी केले, तर शिल्प निदेशक एस. जी. खडसे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

***



वृत्त क्रमांक 

आयुर्वेदाच्या नव्या प्रवासाची ‘आयुप्रवेशिका 2026’ने सुरुवात

• शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात संक्रमणकालीन अभ्यासक्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साहात

नांदेड, दि. 26 : येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात प्रथम वर्ष बी.ए.एम.एस.च्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘आयुप्रवेशिका 2026’ या संक्रमणकालीन अभ्यासक्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आयुर्वेद शिक्षणाची मूलभूत तत्त्वे, वैद्यकीय शिक्षणातील शिस्त आणि भावी वैद्यकीय कारकिर्दीतील जबाबदाऱ्यांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने या अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्राध्यापक डॉ. ना. सु. गंगासागरे होते. महाराष्ट्र राज्याचे आयुष संचालक डॉ. रामन घुंगराळेकर तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. मधुकर लहानकर यांची विशेष अतिथी व प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती होती. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आयुर्वेद शास्त्राची व्यापकता, आयुर्वेद शिक्षणाची मूलभूत तत्त्वे, वैद्यकीय शिक्षणातील शिस्त, नैतिक मूल्ये आणि भावी वैद्यकीय कारकिर्दीतील जबाबदाऱ्या यांविषयी मार्गदर्शन केले. नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम आयुर्वेद शिक्षणाच्या प्रवासाची दिशादर्शक सुरुवात ठरला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. जे. जे. पवार यांनी केले. अभ्यासक्रमाच्या मुख्य समन्वयक अधिकारी सहयोगी प्राध्यापिका डॉ. शिल्पा इंगळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात विशेष योगदान दिले. डॉ. संजीवनी हंबर्डे यांनी आभारप्रदर्शन केले. 

***




वृत्त क्रमांक 

कुटुंब नियोजनात पुरुषांचा सहभाग वाढविण्यासाठी नांदेड जिल्ह्यात ‘पुरुष नसबंदी पंधरवडा’

• 21 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरदरम्यान विशेष मोहीम; बिनाटाका नसबंदीबाबत गैरसमज दूर करण्यावर भर

नांदेड, दि. 26 : कुटुंब नियोजनाची जबाबदारी केवळ महिलांची नसून पुरुषांनीही त्यात सक्रिय सहभाग घ्यावा, या उद्देशाने नांदेड जिल्ह्यात 21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2026 या कालावधीत ‘पुरुष नसबंदी पंधरवडा 2026’ राबविण्यात येत आहे. पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेबाबत समाजातील गैरसमज दूर करून अधिकाधिक पुरुषांना कुटुंब नियोजनासाठी प्रोत्साहित करण्यावर या मोहिमेत भर देण्यात येत आहे. “स्वस्थ व आनंदी कुटुंबाचे स्वप्न, पुरुषांच्या सहभागातूनच साकार” हे यंदाच्या मोहिमेचे घोषवाक्य आहे.

जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यांमध्ये ही मोहीम दोन टप्प्यांत राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 21 ते 27 नोव्हेंबरदरम्यान संपर्क सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या काळात आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटी देऊन पात्र जोडप्यांचे समुपदेशन, इच्छुक लाभार्थ्यांची नोंदणी आणि पुरुष नसबंदीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यापूर्वी बिनाटाका पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केलेल्या लाभार्थ्यांच्या माध्यमातूनही जनजागृती केली जात आहे.

दुसऱ्या टप्प्यात 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरदरम्यान सेवा सप्ताह राबविण्यात येणार आहे. या कालावधीत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांमधील शस्त्रक्रियागृहे पुरुष नसबंदी शस्त्रक्रियांसाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहेत. तज्ज्ञ शल्यचिकित्सकांच्या पथकांमार्फत नोंदणीकृत लाभार्थ्यांवर सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

बिनाटाका पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ही सोपी व सुरक्षित असून, शस्त्रक्रियेनंतर मोठ्या विश्रांतीची आवश्यकता नसते. या शस्त्रक्रियेसाठी शासनामार्फत लाभार्थ्यांना विहित आर्थिक मोबदला दिला जातो. त्यामुळे पात्र पुरुषांनी कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता कुटुंब नियोजनात सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी आणि शस्त्रक्रियेच्या लाभासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

***



वृत्त क्रमांक 

प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी अंतिम संधी

• नांदेड जिल्ह्यात 28 व 29 नोव्हेंबरला सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिराचे आयोजन

नांदेड, दि. 26 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-2026 अंतर्गत प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न होऊ शकलेल्या पात्र मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव नोंदविण्याची विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनुपस्थित (Absent), स्थलांतरित (Shifted), मृत (Dead) किंवा दुबार (Duplicate) म्हणजेच एएसडीडी (ASDD) प्रवर्गात नोंद झालेल्या मतदारांसाठी ही संधी देण्यात आली आहे.

या मोहिमेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर शनिवार, दि. 28 व रविवार, दि. 29 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित मतदान केंद्रावर उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

मतदारांसाठी आवश्यक प्रक्रिया 

पत्ता बदललेला नसल्यास : रीतसर भरलेले व स्वाक्षरी केलेले गणना प्रपत्र तसेच यापूर्वी प्रपत्र सादर न करू शकल्याचे कारण नमूद असलेले परिशिष्ट-ब (Annexure-B) मधील निवेदन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावे.

राज्यांतर्गत पत्ता बदलल्यास : स्वतंत्रपणे नमुना-8 भरण्याची आवश्यकता नाही. गणना प्रपत्रासोबत नवीन पत्ता व नवीन विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख असलेले परिशिष्ट-क (Annexure-C) मधील निवेदन आणि रहिवासी पुरावा नवीन मतदारसंघातील बीएलओ यांच्याकडे सादर करावा. बेघर नागरिकांसाठी बीएलओचा क्षेत्रीय पडताळणी अहवाल ग्राह्य धरला जाईल.

जुना मतदार ओळखपत्र क्रमांक कायम : अर्जाची छाननी व पडताळणी झाल्यानंतर पात्र ठरलेल्या मतदारांना त्यांचा पूर्वीचा मतदार ओळखपत्र (EPIC) क्रमांक पुन्हा देण्यात येईल.

नमुना-6 सादर केलेल्यांना सूट : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमादरम्यान नवीन नाव नोंदणीसाठी यापूर्वीच नमुना-6 सादर केलेल्या मतदारांना पुन्हा गणना प्रपत्र व निवेदन सादर करण्याची आवश्यकता नाही.

एएसडीडी (ASDD) प्रवर्गातील मतदारांच्या मतदान केंद्रनिहाय याद्या संबंधित मतदान केंद्रे, ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका तसेच गटविकास अधिकारी कार्यालयांच्या सूचना फलकांवर आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. मतदारांना ECINET अॅप किंवा voters.eci.gov.in या संकेतस्थळावरूनही प्रपत्र डाउनलोड करून भरता येईल. तसेच ‘Book a Call with BLO’ सुविधेचा वापर करून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल.

पात्र मतदारांनी 28 व 29 नोव्हेंबर रोजी आयोजित विशेष शिबिरात सहभागी होऊन अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची ही संधी अवश्य घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

***

वृत्त क्रमांक   बाल न्याय संस्थांच्या तपासणी समितीसाठी अशासकीय सदस्यांना संधी पात्र इच्छुकांनी 15 दिवसांत अर्ज सादर करण्याचे आवाहन नांदेड, द...