Thursday, November 26, 2026

वृत्त क्रमांक 

कुटुंब नियोजनात पुरुषांचा सहभाग वाढविण्यासाठी नांदेड जिल्ह्यात ‘पुरुष नसबंदी पंधरवडा’

• 21 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरदरम्यान विशेष मोहीम; बिनाटाका नसबंदीबाबत गैरसमज दूर करण्यावर भर

नांदेड, दि. 26 : कुटुंब नियोजनाची जबाबदारी केवळ महिलांची नसून पुरुषांनीही त्यात सक्रिय सहभाग घ्यावा, या उद्देशाने नांदेड जिल्ह्यात 21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2026 या कालावधीत ‘पुरुष नसबंदी पंधरवडा 2026’ राबविण्यात येत आहे. पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेबाबत समाजातील गैरसमज दूर करून अधिकाधिक पुरुषांना कुटुंब नियोजनासाठी प्रोत्साहित करण्यावर या मोहिमेत भर देण्यात येत आहे. “स्वस्थ व आनंदी कुटुंबाचे स्वप्न, पुरुषांच्या सहभागातूनच साकार” हे यंदाच्या मोहिमेचे घोषवाक्य आहे.

जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यांमध्ये ही मोहीम दोन टप्प्यांत राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 21 ते 27 नोव्हेंबरदरम्यान संपर्क सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या काळात आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटी देऊन पात्र जोडप्यांचे समुपदेशन, इच्छुक लाभार्थ्यांची नोंदणी आणि पुरुष नसबंदीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यापूर्वी बिनाटाका पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केलेल्या लाभार्थ्यांच्या माध्यमातूनही जनजागृती केली जात आहे.

दुसऱ्या टप्प्यात 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरदरम्यान सेवा सप्ताह राबविण्यात येणार आहे. या कालावधीत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांमधील शस्त्रक्रियागृहे पुरुष नसबंदी शस्त्रक्रियांसाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहेत. तज्ज्ञ शल्यचिकित्सकांच्या पथकांमार्फत नोंदणीकृत लाभार्थ्यांवर सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

बिनाटाका पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ही सोपी व सुरक्षित असून, शस्त्रक्रियेनंतर मोठ्या विश्रांतीची आवश्यकता नसते. या शस्त्रक्रियेसाठी शासनामार्फत लाभार्थ्यांना विहित आर्थिक मोबदला दिला जातो. त्यामुळे पात्र पुरुषांनी कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता कुटुंब नियोजनात सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी आणि शस्त्रक्रियेच्या लाभासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

***



No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   बाल न्याय संस्थांच्या तपासणी समितीसाठी अशासकीय सदस्यांना संधी पात्र इच्छुकांनी 15 दिवसांत अर्ज सादर करण्याचे आवाहन नांदेड, द...