Thursday, November 26, 2026

वृत्त क्रमांक 

संविधानाच्या मूल्यांचा अंगीकार करून जबाबदार नागरिक बना

• श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान दिन उत्साहात साजरा

नांदेड, दि. 26 : संविधानातील मूल्यांविषयी आदरभाव दृढ करणे, सामाजिक व नागरी जबाबदारीची जाणीव निर्माण करणे आणि लोकशाहीप्रती कर्तव्यभाव जागृत करण्याच्या उद्देशाने श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे संविधान दिन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून उपस्थितांनी संविधानाची शपथ घेतली.

या कार्यक्रमाला जिल्हा व सत्र न्यायालयाचे अधिवक्ता अमित डोईफोडे, एस. पी. गोडबोले, संस्थेचे कार्यालय अधीक्षक व्ही. एस. सोनकांबळे, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डी. ए. पोतदार यांनी केले. त्यांनी संविधानाचे महत्त्व विशद करून उपस्थितांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रमुख वक्ते अधिवक्ता अमित डोईफोडे यांनी संविधानाचे महत्त्व आणि संविधानाच्या उद्देशिकेचा अर्थ उदाहरणांसह स्पष्ट केला. व्यक्तीची श्रेष्ठता तिच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. प्रत्येकाने जीवनात बुद्धिवाद आणि विज्ञानवादाचा पुरस्कार करावा तसेच राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करावा, असे त्यांनी सांगितले. सत्य, अहिंसा, धर्मनिरपेक्षता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करून समृद्ध भारत घडविण्यासाठी संविधानातील मूल्ये आचरणात आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून उद्योगांना आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाते. तांत्रिक ज्ञानाबरोबरच प्रशिक्षणार्थ्यांना सामाजिक जबाबदारी, अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव व्हावी, या उद्देशाने राज्यातील सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दर महिन्याला सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना संचालनालयाने दिल्या आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्प निदेशक पी. बी. उभेदळ यांनी केले, तर शिल्प निदेशक एस. जी. खडसे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

***



No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   बाल न्याय संस्थांच्या तपासणी समितीसाठी अशासकीय सदस्यांना संधी पात्र इच्छुकांनी 15 दिवसांत अर्ज सादर करण्याचे आवाहन नांदेड, द...