वृत्त क्रमांक
संविधान मूल्यांच्या जतनासह विकसित भारताच्या निर्मितीत युवकांनी योगदान द्यावे
• माय भारत नांदेडतर्फे ‘विकसित भारत युवा संवाद’; यशवंत महाविद्यालयात 150 युवक-युवतींचा सहभाग
नांदेड, दि. 26 : विकसित भारताच्या निर्मितीत युवकांनी सक्रिय सहभाग नोंदवून राष्ट्रनिर्मितीची जबाबदारी स्वीकारावी, तसेच भारतीय संविधानातील मूल्यांचे जतन व संवर्धन करावे, असे आवाहन संविधान दिनानिमित्त आयोजित ‘विकसित भारत युवा संवाद’ कार्यक्रमातून करण्यात आले.
युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत मेरा युवा भारत (माय भारत), नांदेड यांच्या वतीने यशवंत महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमात 150 युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. कविता सोनकांबळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. युवा आयकॉन देवयानी देशमुख आणि समाजमाध्यम प्रभावक नागसेन तुळसे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. देवयानी देशमुख यांनी विकसित भारताच्या निर्मितीमध्ये युवकांची भूमिका स्पष्ट करून देशाच्या प्रगतीसाठी युवकांनी जबाबदारी स्वीकारत राष्ट्रनिर्मितीत अर्थपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन केले.
नागसेन तुळसे यांनी भारतीय संविधानाचे जतन व संवर्धन करण्यात युवकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. संविधानातील मूल्यांचे आकलन, लोकशाही तत्त्वांचा आदर आणि जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्यपालन करण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले. भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये लोकशाही व्यवस्थेचा पाया असून, ती प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनात आचरणात आणणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
संविधान दिनानिमित्त आयोजित या संवादातून युवकांना नागरिक म्हणून असलेल्या अधिकारांसोबतच कर्तव्यांची जाणीव करून देण्यात आली. राष्ट्रनिर्मिती, सामाजिक विकास आणि लोकशाही मूल्यांचे संवर्धन यामध्ये युवकांचा सहभाग महत्त्वपूर्ण असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. माय भारतच्या माध्यमातून युवकांना जनजागृती, नेतृत्व विकास आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांमध्ये सहभागासाठी सातत्याने व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे.
माय भारतच्या विविध उपक्रमांची आणि युवकांसाठी उपलब्ध संधींची अधिक माहिती घेण्यासाठी www.mybharat.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
***

.jpeg)
No comments:
Post a Comment