Thursday, November 26, 2026

वृत्त क्रमांक 

प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी अंतिम संधी

• नांदेड जिल्ह्यात 28 व 29 नोव्हेंबरला सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिराचे आयोजन

नांदेड, दि. 26 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-2026 अंतर्गत प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न होऊ शकलेल्या पात्र मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव नोंदविण्याची विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनुपस्थित (Absent), स्थलांतरित (Shifted), मृत (Dead) किंवा दुबार (Duplicate) म्हणजेच एएसडीडी (ASDD) प्रवर्गात नोंद झालेल्या मतदारांसाठी ही संधी देण्यात आली आहे.

या मोहिमेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर शनिवार, दि. 28 व रविवार, दि. 29 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित मतदान केंद्रावर उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

मतदारांसाठी आवश्यक प्रक्रिया 

पत्ता बदललेला नसल्यास : रीतसर भरलेले व स्वाक्षरी केलेले गणना प्रपत्र तसेच यापूर्वी प्रपत्र सादर न करू शकल्याचे कारण नमूद असलेले परिशिष्ट-ब (Annexure-B) मधील निवेदन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावे.

राज्यांतर्गत पत्ता बदलल्यास : स्वतंत्रपणे नमुना-8 भरण्याची आवश्यकता नाही. गणना प्रपत्रासोबत नवीन पत्ता व नवीन विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख असलेले परिशिष्ट-क (Annexure-C) मधील निवेदन आणि रहिवासी पुरावा नवीन मतदारसंघातील बीएलओ यांच्याकडे सादर करावा. बेघर नागरिकांसाठी बीएलओचा क्षेत्रीय पडताळणी अहवाल ग्राह्य धरला जाईल.

जुना मतदार ओळखपत्र क्रमांक कायम : अर्जाची छाननी व पडताळणी झाल्यानंतर पात्र ठरलेल्या मतदारांना त्यांचा पूर्वीचा मतदार ओळखपत्र (EPIC) क्रमांक पुन्हा देण्यात येईल.

नमुना-6 सादर केलेल्यांना सूट : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमादरम्यान नवीन नाव नोंदणीसाठी यापूर्वीच नमुना-6 सादर केलेल्या मतदारांना पुन्हा गणना प्रपत्र व निवेदन सादर करण्याची आवश्यकता नाही.

एएसडीडी (ASDD) प्रवर्गातील मतदारांच्या मतदान केंद्रनिहाय याद्या संबंधित मतदान केंद्रे, ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका तसेच गटविकास अधिकारी कार्यालयांच्या सूचना फलकांवर आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. मतदारांना ECINET अॅप किंवा voters.eci.gov.in या संकेतस्थळावरूनही प्रपत्र डाउनलोड करून भरता येईल. तसेच ‘Book a Call with BLO’ सुविधेचा वापर करून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल.

पात्र मतदारांनी 28 व 29 नोव्हेंबर रोजी आयोजित विशेष शिबिरात सहभागी होऊन अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची ही संधी अवश्य घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

***

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   बाल न्याय संस्थांच्या तपासणी समितीसाठी अशासकीय सदस्यांना संधी पात्र इच्छुकांनी 15 दिवसांत अर्ज सादर करण्याचे आवाहन नांदेड, द...