वृत्त क्रमांक
रक्ताचा तुटवडा टाळण्यासाठी राज्यभर विशेष रक्तदान शिबिरे
• राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सर्व रक्तपेढ्यांना निर्देश
• सामाजिक संस्था, महाविद्यालये, कार्यालये व गृहनिर्माण संस्थांना पुढाकार घेण्याचे आवाहन
नांदेड, दि. 26 : नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात सण आणि सुट्ट्यांमुळे नियमित रक्तदात्यांची उपलब्धता कमी होण्याची शक्यता लक्षात घेता, राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये आणि रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी विशेष स्वैच्छिक रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने केले आहे. यासंदर्भात राज्यातील सर्व रक्तपेढ्या व रक्त संकलन केंद्रांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दिवाळी व नाताळच्या सुट्ट्यांमुळे महाविद्यालये, शाळा आणि कार्यालयांमधील नियमित उपक्रमांवर परिणाम होतो. अनेक रक्तदाते सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जात असल्याने रक्तसंकलनाचे प्रमाण घटण्याची शक्यता असते. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे तसेच नियमित रक्ताची आवश्यकता असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी पुरेसा रक्तसाठा राखणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व रक्तपेढ्यांनी उपलब्ध रक्तसाठ्याचा आढावा घेऊन स्थानिक गरजेनुसार सामाजिक, राजकीय, धार्मिक संस्था, स्वयंसेवी संघटना, शैक्षणिक संस्था आणि इतर संघटनांच्या सहकार्याने विशेष रक्तदान शिबिरे आयोजित करावीत. मुंबईतील शासकीय रक्तकेंद्रांनी रेल्वे स्थानके, कार्यालये आणि गृहनिर्माण संस्थांसारख्या ठिकाणी शिबिरे घेण्यासह रक्तदात्यांपर्यंत पोहोचून त्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
राज्यातील रक्तदात्यांनी आपल्या जवळच्या रक्तपेढी किंवा रक्त संकलन केंद्रामार्फत आयोजित शिबिरांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. सामाजिक संस्था, महाविद्यालये, कार्यालये आणि गृहनिर्माण संस्थांनीही रक्तदान शिबिरांचे आयोजन करून या जीवनदायी उपक्रमात योगदान द्यावे. रक्ताच्या अभावामुळे कोणत्याही रुग्णाची गैरसोय होऊ नये आणि प्रत्येक गरजू रुग्णाला वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने केले आहे.
***

No comments:
Post a Comment