वृत्त क्रमांक
आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शासकीय योजनांचा लाभ घ्या!
मांडवी येथे जनजाती गौरव दिन सेवा सप्ताहाचा समारोप
महिला सक्षमीकरण सेवा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड, दि. १८ : क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘भगवान बिरसा मुंडा जनजाती गौरव दिन सेवा सप्ताहा’चा समारोप मांडवी (ता. किनवट) येथे आदिवासी महिला सक्षमीकरण सेवा शिबिराने उत्साहात झाला. आदिवासी विकास विभागामार्फत ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या सेवा सप्ताहाच्या समारोपानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट यांच्या वतीने बुधवारी विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी बी. सरवनन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक प्रकल्प अधिकारी (विकास) प्रदीप नाईक यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी मुंडे, शबरी आर्थिक विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक राठोड, लेखाधिकारी बोरुळकर यांच्यासह स्थानिक मान्यवर व अधिकारी उपस्थित होते. प्रदीप नाईक यांनी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध वैयक्तिक व सामूहिक कल्याणकारी योजनांसह राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेची माहिती दिली.
महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची संधी साधून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन करत विभागीय व्यवस्थापक राठोड यांनी शबरी आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती दिली. लेखाधिकारी बोरुळकर यांनी बचतगटांचे आर्थिक व्यवहार व हिशोब व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. कृषी अधिकारी मुंडे यांनी कृषी, पशुसंवर्धन व कौशल्य विकास योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या शिबिराला आदर्श क्रांतीज्योती महिला प्रभाग संघ, मांडवीच्या पदाधिकारी, आदिवासी महिला बचतगटांच्या सदस्या, ग्रामसखी, पशुसखी, शेतकरी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे प्रभाग समन्वयक ईश्वर आडे, प्रकल्प कार्यालयाचे कटकमवार तसेच किनवट प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
****


