Wednesday, November 18, 2026

वृत्त क्रमांक

जागतिक शौचालय दिनानिमित्त विशेष अभियान; नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा-मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे आवाहन

•आजपासून जिल्ह्यात अभियानाला सुरुवात

नांदेड, दि. 18 : जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून 19 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2026 या कालावधीत जिल्ह्यात ‘स्वच्छ शौचालय, गरिमामय भविष्य’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील सार्वजनिक, सामुदायिक तसेच शाळा व अंगणवाडीतील शौचालयांची स्वच्छता, सुरक्षितता आणि उपयुक्तता वाढविण्यासह प्रत्येक कुटुंबाने वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर करावा, यासाठी या अभियानात विशेष भर दिला जाणार आहे. या अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे.

      केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या निर्देशानुसार हे अभियान राबविण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्र संघाने यंदाच्या जागतिक शौचालय दिनासाठी ‘सुरक्षित शौचालये, समान भविष्य’ ही संकल्पना निश्चित केली आहे. प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ शौचालय सुविधा उपलब्ध व्हावी, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

      अभियानांतर्गत ग्रामीण भागातील सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छता संकुले, शाळा आणि अंगणवाड्यांमधील शौचालयांची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व सुधारणा करण्यात येणार आहेत. विशेषतः महिला, विद्यार्थिनी आणि दिव्यांग व्यक्तींना शौचालयांचा सुरक्षित व सुलभ वापर करता यावा, यासाठी आवश्यक सुविधांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तसेच एक खड्डा असलेल्या शौचालयांचे दोन खड्ड्यांच्या शौचालयांमध्ये रूपांतर, सोकपिट नसलेल्या सेप्टिक टँकमध्ये सोकपिटची सुविधा आणि मैला गाळ व्यवस्थापन नियमांचे पालन याबाबतही गावकऱ्यांना माहिती दिली जाणार आहे.

      गावांचा हागणदारीमुक्त दर्जा कायम राखणे, शौचालयांचा नियमित वापर, साबणाने हात धुण्याची सवय रुजविणे आणि घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 बाबत जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाड्या, महिला बचत गट आणि ग्रामस्थांचा सहभाग घेतला जाणार आहे.

      अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सार्वजनिक स्वच्छता संकुलांना, संस्थात्मक व वैयक्तिक घरगुती शौचालयांना प्रोत्साहन देण्यासाठी मूल्यमापन करण्यात येणार असून, उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रामपंचायती आणि लाभार्थ्यांचा गौरव केला जाणार आहे. 9 व 10 डिसेंबर रोजी जिल्हा व ग्रामपंचायत स्तरावर सांगता कार्यक्रम आयोजित करून अभियानाची प्रगती स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) च्या निर्धारित प्रणालीवर नोंदविण्यात येणार आहे.

      स्वच्छता ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. शौचालयांचा नियमित वापर, त्यांची स्वच्छता व देखभाल आणि गावातील स्वच्छतेचे वातावरण टिकविण्यासाठी नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील व उप मुख्य कार्यकारी अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड यांनी केले आहे.

***

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शासकीय योजनांचा लाभ घ्या! मांडवी येथे जनजाती गौरव दिन सेवा सप्ताहाचा समारोप महिला सक्...