वृत्त क्रमांक
महसूल लोक अदालत प्रलंबित महसुली प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याची संधी!
२६ नोव्हेंबर रोजी अपर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत’
नागरिकांनी सहभागी होण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
नांदेड, दि. १८ : महसूल प्रशासनातील प्रलंबित अर्धन्यायिक महसुली प्रकरणांचा आपसी संमतीने आणि तडजोडीद्वारे जलदगतीने निपटारा करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या कार्यालयात गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत’ आयोजित करण्यात आली आहे. या लोक अदालतीच्या माध्यमातून पक्षकारांना आपली प्रलंबित प्रकरणे तडजोडीने कायमस्वरूपी निकाली काढण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून महसूल व वन विभागाच्या १४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यात १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे. महसूल प्रशासनातील अपर जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनीशी संबंधित अनेक महसुली दावे व अपिले वर्षानुवर्षे प्रलंबित असतात. त्यामुळे पक्षकारांचा वेळ आणि पैसा खर्च होतो. ही प्रकरणे परस्पर संमतीने जलदगतीने निकाली काढणे तसेच न्यायालयांवरील प्रलंबित प्रकरणांचा भार कमी करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
या लोक अदालतीमध्ये अपर जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयात प्रलंबित असलेल्या सर्व प्रकारच्या महसुली दाव्यांचा व अपिलांचा समावेश असेल. संबंधित पक्षकारांनी दोन्ही पक्षांच्या संमतीने किंवा वकिलांमार्फत विहित नमुन्यातील ‘प्रपत्र-अ’ मध्ये तडजोडनामा अर्ज संबंधित न्यायालयात सादर करावा. प्राप्त अर्जांची छाननी करून दोन्ही पक्षांची संमती निश्चित केली जाईल आणि कायदेशीर तडजोडनामा तयार करण्यात येईल. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी आयोजित लोक अदालतीमध्ये सहमतीने अंतिम आदेश पारित करून पात्र प्रकरणे निकाली काढण्यात येतील.
नांदेड जिल्ह्यातील संबंधित पक्षकारांनी आपल्या प्रलंबित महसुली प्रकरणांचा तडजोडीने कायमस्वरूपी निपटारा करून घेण्यासाठी या विशेष लोक अदालतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
****
No comments:
Post a Comment