वृत्त क्रमांक
नांदेडच्या युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षणाची सुवर्णसंधी !
• ऑटोमोटिव्ह व आरोग्य सेवा क्षेत्रातील रोजगाराभिमुख अभ्यासक्रम
• 18 ते 35 वयोगटातील उमेदवारांना निवासी व अनिवासी प्रशिक्षणाची सुविधा
नांदेड, दि. 18 : जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगारक्षम बनविण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्र, नांदेड आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ऑटोमोटिव्ह टू व्हीलर टेक्निशियन आणि जनरल ड्युटी असिस्टंट (GDA) हे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ऑटोमोटिव्ह टू व्हीलर टेक्निशियन अभ्यासक्रमाचा कालावधी 45 दिवस, तर जनरल ड्युटी असिस्टंट अभ्यासक्रमाचा कालावधी 50 दिवस आहे. दोन्ही अभ्यासक्रमांसाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 18 ते 35 वयोगटातील युवक-युवतींना या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेता येणार आहे. प्रशिक्षण निवासी व अनिवासी अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध असून, निवासी प्रशिक्षणार्थींसाठी भोजन व निवासाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान व्यावसायिक कौशल्य विकास, प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण आणि रोजगाराभिमुख मार्गदर्शन दिले जाणार असून, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार मिळविण्यासाठीही सहाय्य करण्यात येणार आहे.
प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी केवळ 30 जागा उपलब्ध असून, प्रवेशासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्र, गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, बँक पासबुक व पासपोर्ट आकाराचा फोटो ही कागदपत्रे तयार ठेवावीत. या प्रशिक्षणासाठी https://forms.gle/acC7YHCT2szVYKse8 या गूगल फार्म लिंकवर क्लिक करून ऑनलाइन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी 9763564514, 9890435356, 7498668574 किंवा 8010504359 या क्रमांकांवर संपर्क साधावा.
जिल्ह्यातील युवक-युवतींनी या मोफत प्रशिक्षण संधीचा लाभ घेऊन कौशल्य विकसित करावे आणि रोजगाराच्या माध्यमातून आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.
***
No comments:
Post a Comment