स्वच्छ शौचालय, सन्मानाचे भविष्य; ग्रामीण स्वच्छतेला नवी दिशा
जागतिक शौचालय दिनानिमित्त स्वच्छ शौचालय-गरिमामय भविष्य या अभियानाच्या अनुषंगाने विशेष लेख
स्वच्छता ही केवळ आरोग्याची गरज नाही, तर ती मानवी प्रतिष्ठा, सुरक्षितता आणि समानतेचा मूलभूत आधार आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ आणि सुरक्षित शौचालयाची सुविधा मिळणे हा सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचाच एक भाग आहे. विशेषतः महिला आणि मुलींना शौचालयाच्या अभावामुळे असुरक्षिततेचा सामना करावा लागू नये, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये आणि त्यांना कोणत्याही संकोचाशिवाय शौचालयाचा वापर करता यावा, ही काळाची गरज आहे. याच विचारातून ‘स्वच्छ शौचालय-गरिमामय भविष्य’ ही संकल्पना पुढे आली आहे.
गरिमामय भविष्य म्हणजे नेमके काय? तर गरिमा म्हणजे मानवी प्रतिष्ठा, सन्मान व आत्मप्रतिष्ठा. प्रत्येक व्यक्तीला अपमान, असुरक्षितता किंवा मूलभूत सुविधांच्या अभावामुळे होणाऱ्या गैरसोयींशिवाय सन्मानाने जगता यावे, असे भविष्य म्हणजे गरिमामय भविष्य होय. त्यामुळे स्वच्छ शौचालय म्हणजे केवळ एक सुविधा नसून महिलांचा सन्मान, मुलांची सुरक्षितता आणि प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची हमी आहे.
जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून 19 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2026 या कालावधीत हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्र संघाने यंदाच्या जागतिक शौचालय दिनासाठी ‘सुरक्षित शौचालये, समान भविष्य’ ही संकल्पना निश्चित केली आहे. ग्रामीण स्वच्छतेला शाश्वत स्वरूप देण्यासोबतच स्वच्छता आणि सामाजिक समानता यांचा संबंध अधोरेखित करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, केवळ शौचालय बांधणे पुरेसे नसून त्यांचा नियमित वापर, स्वच्छता, देखभाल आणि सुरक्षितता सुनिश्चित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील सार्वजनिक, सामुदायिक तसेच शाळा आणि अंगणवाड्यांमधील शौचालयांची स्थिती तपासण्यात येणार आहे. पाण्याची उपलब्धता, स्वच्छता, सुरक्षितता आणि वापरण्यायोग्यता यांचे परीक्षण करून आवश्यक दुरुस्ती व सुधारणा करण्यावर भर दिला जाणार आहे. महिला, विद्यार्थिनी आणि दिव्यांग व्यक्तींना सुलभपणे वापरता येतील अशा सुविधांना प्राधान्य दिले जाईल.
वैयक्तिक घरगुती शौचालयांच्या तांत्रिक स्थितीचेही मूल्यांकन करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार एक खड्डा शौचालयाचे दोन खड्ड्यांच्या शौचालयात रूपांतर, तसेच सोकपिट नसलेल्या सेप्टिक टँकचे सोकपिटयुक्त व्यवस्थेत अद्ययावतीकरण करण्यावर भर राहणार आहे. शौचालयांमधील मैला गाळाचे सुरक्षित संकलन, वाहतूक आणि शास्त्रोक्त विल्हेवाट याबाबतही जनजागृती केली जाणार आहे.
स्वच्छतेचे संस्कार बालपणापासून रुजावेत, यासाठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागातून जनजागृती उपक्रम आणि शाळा स्वच्छता परीक्षण आयोजित केले जाणार आहे. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, सार्वजनिक स्वच्छता संकुले आणि वैयक्तिक घरगुती शौचालयांसाठी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. १० डिसेंबर रोजी मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गौरव केला जाणार आहे.
स्वच्छतेची चळवळ यशस्वी करण्यासाठी केवळ प्रशासनाचे प्रयत्न पुरेसे नाहीत. ग्रामपंचायती, महिला बचतगट, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. नांदेड जिल्ह्यातही हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असून नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे.
प्रत्येक घरात शौचालय असणे, प्रत्येक शौचालय स्वच्छ व वापरण्यायोग्य असणे आणि प्रत्येक नागरिकाला सुरक्षिततेने त्याचा वापर करता येणे, हेच या अभियानाचे खरे यश आहे. स्वच्छतेची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून ती प्रत्येक नागरिकाची आहे. लोकसहभागातून स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी गावे निर्माण झाली, तरच ‘स्वच्छ शौचालय - गरिमामय भविष्य’ या संकल्पनेला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप प्राप्त होईल.
मिलिंद व्यवहारे
जिल्हा परिषद नांदेड
९४२२१८८०९४
***
No comments:
Post a Comment