Friday, November 20, 2026

वृत्त क्रमांक

मतदार यादी पुनरीक्षणाची मोहीम ३० नोव्हेंबर पर्यंत 

२२ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार ; 

सुधारित वेळापत्रकानुसार प्रशासनास सहकार्य करण्याचे हणमंत कोळेकर यांचे आवाहन

नांदेड, दि. २० : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ (SIR) च्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन करण्यात येणार असून, २२ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रक्रियेत सर्व राजकीय पक्ष, नागरिक आणि पात्र मतदारांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन ०८६ नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी हणमंत कोळेकर यांनी केले आहे.

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत पहिल्या टप्प्यात मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या मतदारांच्या घरी भेट देऊन गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन करण्यात येणार आहे. प्राप्त गणना प्रपत्रांचे संगणकीकरण करण्याची अंतिम मुदत १० डिसेंबर २०२६ आहे. तसेच नोटीस टप्पा, दावे व हरकतींचा निपटारा ३१ ऑगस्ट ते १५ डिसेंबर २०२६ या कालावधीत करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी २२ डिसेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होईल.

या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी राजकीय पक्षांनी कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे १९ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण घेण्यात आले. त्यांना गणना प्रपत्रे, सूचनापत्रे आणि ASDD मतदारांची यादी देऊन कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बीएलओमार्फत संबंधित मतदारांना गणना प्रपत्र व आवश्यक सूचना वितरित करण्यात येतील. ज्या मतदारांकडे व्हॉट्सॲप सुविधा उपलब्ध आहे, त्यांना पूर्ण भरलेल्या गणना प्रपत्राची प्रत व्हॉट्सॲपद्वारे पाठविण्यात येईल. व्हॉट्सॲप सुविधा नसलेल्या मतदारांना स्वतंत्र पोचपावती देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व पात्र मतदारांनी बीएलओंना आवश्यक सहकार्य करून आपली माहिती वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी हणमंत कोळेकर व सहायक मतदार नोंदणी अधिकारी इंद्रजित गरड यांनी केले आहे.

****







महात्मा जोतीराव फुले यांची अभ्यासूवृत्ती त्यांच्या हस्ताक्षरातूनही स्पष्ट होते. त्यांना उत्तम मराठी भाषेबरोबरच इंग्रजीचेही उत्तम ज्ञान होते. त्यांचे इंग्रजीचे हस्ताक्षर

(संदर्भ : महात्मा फुले : समग्र वाङ्मय)



दुष्काळग्रस्त भागातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीसाठी उत्पन्न मर्यादेची अट शिथिल

विशेष वृत्त क्रमांक

सुधारित

पायाभूत सुविधांच्या निर्मितीतून जनतेला दर्जेदार सेवा देण्यावर भर - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

कंधार येथील विविध विकासकामांचे लोकार्पण

नांदेड, दि. 20 : कंधारच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाची नवीन इमारत, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि स्वर्गीय शांतीदूत गोविंदराव पाटील चिखलीकर उद्यानाचे लोकार्पण आज झाले. इतिहासाचा अभिमान बाळगतानाच भविष्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, हीच विकासाची खरी संकल्पना आहे. या माध्यमातून जनतेला दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज कंधार येथे केले.

कंधार येथील विविध विकासकामांच्या उद्घाटनानंतर श्री शिवाजी हायस्कूलच्या मैदानावर आयोजित जाहीर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्रीमती पवार बोलत होत्या. या कार्यक्रमाला सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार रविंद्र चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता रूपा राऊळ आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, श्रेणीवर्धित 100 खाटांच्या नवीन उपजिल्हा रुग्णालय इमारतीमुळे कंधार आणि परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. रुग्णालयाची इमारत आधुनिक होण्यासोबतच आरोग्यसेवाही दर्जेदार व्हावी, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत आणि गरीब रुग्णांना सन्मानाने व आपुलकीने वागणूक मिळावी, यासाठी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक काम करावे, अशी सूचना त्यांनी केली. तसेच, उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीतून लोकाभिमुख कामकाज होऊन सामान्य नागरिकांचे प्रश्न तातडीने सुटावेत, त्यांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत आणि वेळेत सेवासुविधांसह सन्मानाची वागणूक मिळावी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी व्यक्त केली.

राज्यातील बहुतांश भागांत कमी पाऊस झाल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची राज्य शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना एकटे न सोडता शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तातडीच्या मदतीसोबतच दीर्घकालीन उपाययोजनांवर भर दिला जात असून, त्यासाठी जलसंधारणाची कामे, पाणी साठवण, भूजल पातळी वाढवणे आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन यावर शासनाचा विशेष भर राहील. या परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी आणि पशुधन यापैकी कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी दिली.

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, याचाच एक भाग म्हणून कंधार येथे अद्ययावत उपजिल्हा रुग्णालय इमारत उभी राहिली आहे. यामुळे नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील. तसेच, शासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने कंधार उपविभागीय अधिकारी कार्यालयाची सुसज्ज इमारत उभारण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांना तत्पर सेवा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात असून, प्रोत्साहनपर अनुदान वितरणाबाबत लवकरच पुढील कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये अपेक्षित असलेल्या सुधारणा प्रत्यक्षात आणण्याचा टप्पा कंधार उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाने सुरू झाला आहे. या इमारतीच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील आणि या अनुषंगाने लवकरच आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येईल. तत्पर आरोग्य सेवा देऊन प्रशासन गतिमान करण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. 

आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की, राज्यातील सर्वात अद्ययावत रुग्णालय कंधार येथे उभारले गेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने कंधार व लोहा तालुक्यातील आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणाला मोठी मदत केली आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयाची सुसज्ज इमारत नागरिकांच्या सेवेत दाखल झाल्याने कामकाजात गतिमानता येईल. तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांनीही भरघोस निधी देऊन या भागाच्या विकासाला गती दिली होती. कंधार व लोहा परिसरातील प्रलंबित विकासकामांचा उल्लेख करून त्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड यांनी केले. यावेळी त्यांनी उद्घाटन झालेल्या तिन्ही विकासकामांची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमात विजय होकर्णे निर्मित मन्याडचा तीरावर आरोग्य सेवेचा मानबिंदू या माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले. 

***






















वृत्त क्रमांक

किसान ड्रोनच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना रोजगाराची संधी ; 

महाडीबीटी पोर्टलवर जास्तीत जास्त अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 20 नोव्हेंबर :- शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासह कृषी कामांमध्ये यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान ड्रोन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना कृषी फवारणी सेवा व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध झाली असून नांदेड जिल्ह्यातील तरुण शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार युवकांनी महाडीबीटी पोर्टलवर किसान ड्रोन घटकासाठी जास्तीत जास्त ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. 

किसान ड्रोन खरेदीसाठी राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत ड्रोनच्या किमतीच्या ८५ टक्क्यांपर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक युवकांना कमी स्वभांडवलात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषी सेवा व्यवसाय सुरू करता येणार आहे. ही कर्ज सुविधा बँकेच्या प्रचलित नियम व अटींनुसार मंजूर करण्यात येणार आहे.

सात दिवसीय प्रशिक्षण व प्रमाणपत्राची सुविधा

किसान ड्रोनचा सुरक्षित व प्रभावी वापर करता यावा, यासाठी कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, ता. बिलोली, जि. नांदेड यांच्या माध्यमातून सात दिवसीय प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रशिक्षणामध्ये ड्रोन हाताळणी, संचालन, फवारणी तंत्रज्ञान तसेच आवश्यक तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

कमी वेळेत फवारणी आणि मनुष्यबळाची बचत

किसान ड्रोनच्या साहाय्याने पिकांवर कीटकनाशके, बुरशीनाशके व इतर आवश्यक द्रवरूप कृषी निविष्ठांची फवारणी कमी वेळेत करता येते. ड्रोनद्वारे एका एकर क्षेत्रावर फवारणी करण्यासाठी साधारणतः ६ ते ७ मिनिटांचा कालावधी लागतो. त्यामुळे वेळ, श्रम आणि मनुष्यबळाची बचत होते. तसेच फवारणी करणाऱ्या व्यक्तींचा विषारी रसायनांशी थेट संपर्क टाळण्यास मदत होत असल्याने आरोग्यविषयक जोखीम कमी होते. शेतात प्रत्यक्ष प्रवेश न करता फवारणी करता येत असल्यामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासही मदत होते.

ग्रामीण युवकांसाठी स्वयंरोजगाराची संधी

किसान ड्रोनच्या माध्यमातून युवकांना स्वतःचा कृषी फवारणी सेवा व्यवसाय सुरू करता येणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर फवारणी सेवा उपलब्ध करून देऊन नियमित उत्पन्नाचे साधन निर्माण करता येऊ शकते. विशेषतः ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक आणि तरुण शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित रोजगाराची ही महत्त्वपूर्ण संधी आहे.

नांदेड जिल्ह्यातील इच्छुक तरुण शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक व कृषी क्षेत्रात स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी किसान ड्रोन घटकाचा लाभ घ्यावा. महाडीबीटी पोर्टलवर जास्तीत जास्त ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

वृत्त क्रमांक

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे ; पात्र संस्थांकडून प्रस्ताव मागविले

नांदेड, दि. 20 नोव्हेंबर :- जिल्हा परिषद नांदेडच्या समाज कल्याण विभागामार्फत २० टक्के सेस योजनेंतर्गत सन 2026-27 या वर्षासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे कार्य करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील इच्छुक व पात्र संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा परिषद, नांदेड येथील समाजकल्याण विभागाशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

MPSC, UPSC, SSC-CGL आणि IBPS यासारख्या स्पर्धा परीक्षांची पूर्व व मुख्य परीक्षांची तयारी करणाऱ्या पदवीधर विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांमध्ये स्थानिक संस्थांच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबिरे राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी तालुकास्तरीय शिबिराकरिता प्रत्येकी ३० हजार रुपये, तर जिल्हास्तरीय शिबिराकरिता ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा अनुभव असलेल्या स्थानिक संस्थांमार्फत ही शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.

संस्थांसाठी आवश्यक अटी व कागदपत्रे

संबंधित संस्थेकडे नोंदणी प्रमाणपत्र असणे बंधनकारक असून, प्रशिक्षणाचा किमान 5 वर्षाचा अनुभव आणि मागील तीन वर्षांचे ऑडिट रिपोर्ट आवश्यक आहेत. तसेच संस्थेने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केल्याचे पुरावे, विद्यार्थ्यांच्या निवड याद्या अथवा संस्थेच्या उपक्रमांच्या छायांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे. संबंधित संस्था नांदेड जिल्ह्यात कार्यरत असणे बंधनकारक आहे.

निवड झालेल्या संस्थांना सर्व १६ तालुक्यांमध्ये मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावी लागणार आहेत. शिबिरांमध्ये प्रशिक्षणार्थ्यांसाठी चहापान, घडीपुस्तिका तसेच मार्गदर्शकांचे मानधन व इतर अनुषंगिक बाबींची व्यवस्था संबंधित संस्थेला करावी लागणार आहे. पात्र ठरणाऱ्या संस्थांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.  

00000

वृत्त क्रमांक

नांदेडमध्ये 26 नोव्हेंबरला पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

नांदेड, दि. 20 : जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड आणि शासकीय तंत्र निकेतन, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 26 नोव्हेंबर 2026 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह (जागेवर निवड संधी) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात विविध खासगी आस्थापनांमध्ये उपलब्ध असलेल्या रोजगार व नोकरीच्या संधींसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक-युवतींना या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी गुरुवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता शासकीय तंत्र निकेतन, नांदेड येथे उपस्थित राहून या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. आर. एस. कोल्हे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर, नांदेड. ई-मेल : nandedrojgar01@gmail.com येथे संपर्क साधावा.

**

वृत्त क्रमांक

बालविवाहमुक्त नांदेडसाठी प्रशासनाचा निर्धार

एप्रिल २०२७ पर्यंत बालविवाह निर्मूलनाचे उद्दिष्ट ; विविध विभागांतील चॅम्पियन्सना प्रशिक्षण

नांदेड, दि. २० : बालविवाहासारखी गंभीर सामाजिक समस्या समूळ नष्ट करून प्रत्येक बालकाला सुरक्षित बालपण, शिक्षण आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. एप्रिल २०२७ पर्यंत जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महिला व बालविकास विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शासकीय विभागांतील नियुक्त चॅम्पियन्सचे प्रशिक्षण गुरुवारी (दि. १९) हॉटेल सिटी सिम्फोनी येथे आयोजित करण्यात आले.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गणेश वाघ यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी उपशिक्षणाधिकारी भोईर, बालकल्याण समितीचे अध्यक्ष राजवंतसिंग कदम्ब, शिक्षण विस्तार अधिकारी के. के. फटाले, जिंदमवार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महिला व बालविकास, आरोग्य, पंचायत राज, शिक्षण, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि बाल मदतवाहिनीतील नियुक्त चॅम्पियन्सनी प्रशिक्षणात सहभाग घेतला. बालविवाहाची सामाजिक कारणे, मुलींच्या आरोग्य व शिक्षणावर होणारे दुष्परिणाम, संभाव्य बालविवाहाची वेळीच ओळख, प्रतिबंधात्मक उपाययोजना, तक्रार प्राप्त झाल्यानंतर करावयाची कार्यवाही आणि विविध विभागांतील समन्वय या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

युनिसेफच्या बाल संरक्षण सल्लागार डॉ. सरिता शंकर आणि सल्लागार नंदू जाधव यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. बालविवाह निर्मूलनासाठी चॅम्पियन्सची भूमिका, क्षेत्रीय स्तरावर करावयाच्या उपाययोजना आणि प्रभावी प्रतिसाद यंत्रणा यांची माहिती त्यांनी दिली. निलेश कुलकर्णी यांचेही सहकार्य लाभले.

एप्रिल २०२७ पर्यंत बालविवाह निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हास्तरीय कृती आराखड्यावर प्रशिक्षणात सविस्तर चर्चा झाली. गावपातळीवर प्रतिबंधात्मक यंत्रणा सक्षम करणे, संभाव्य घटनांवर लक्ष ठेवणे, तातडीने माहितीची देवाणघेवाण करणे तसेच बालविवाह रोखल्यानंतर संबंधित बालकांच्या शिक्षण, संरक्षण व पुनर्वसनासाठी पाठपुरावा करणे यावर विशेष भर देण्यात आला. शाळा, ग्रामपंचायती, महिला बचत गट, युवक आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचे आवाहनही करण्यात आले.

बालविवाह रोखणे म्हणजे केवळ एका विवाहाला प्रतिबंध करणे नव्हे, तर बालकाचे बालपण, आरोग्य, शिक्षण आणि भविष्य सुरक्षित करणे होय. यासाठी सर्व शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि समाजाने समन्वयाने काम केल्यास बालविवाहमुक्त नांदेडचे उद्दिष्ट निश्चितच साध्य होईल, असा विश्वास या प्रशिक्षणातून व्यक्त करण्यात आला.

****



वृत्त क्रमांक

स्वाधार योजनेच्या अर्जांसाठी ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ ;  

नवीन, नूतनीकरण व त्रुटी पूर्ततेसाठी विद्यार्थ्यांना संधी

नांदेड दि. 20 नोव्हेंबर :- अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळावे आणि त्यांचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे खंडित होऊ नये, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नवीन अर्ज, नूतनीकरण अर्ज तसेच प्रलंबित त्रुटी पूर्तता सादर करण्यासाठी सोमवार ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अनुसूचित जातीतील ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेले आणि समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येते. महानगरपालिका क्षेत्रापासून पाच किलोमीटरच्या आतील तसेच नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व तालुक्याच्या हद्दीतील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता पात्र विद्यार्थ्यांनी नवीन अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. तसेच यापूर्वी योजनेचा लाभ घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यूजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करून नूतनीकरणाचा (Renewal) अर्ज आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण भरावा. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज कागदपत्रांतील त्रुटींमुळे प्रलंबित आहेत, त्यांनीही संबंधित त्रुटींची पूर्तता करून आवश्यक कागदपत्रे तातडीने सादर करावीत.

विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज सादर करावेत. अर्जाची सद्यस्थिती वेळोवेळी संकेतस्थळावर तपासावी. अर्ज पूर्ण भरल्यानंतर त्याची प्रत आपल्या महाविद्यालयांतर्गत स्थापित समान संधी केंद्रामध्ये जमा करणे आवश्यक आहे.

अधिकृत सोशल मीडिया पेज व व्हॉटसॲप ग्रुपवर मिळणार माहिती

स्वाधार योजनेसंदर्भात विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी समाजकल्याण विभाग, नांदेड कार्यालयाच्या अधिकृत इन्स्टाग्राम व फेसबुक पेजवर samajkalyannanded या नावाने वेळोवेळी माहिती प्रसिद्ध केली जात आहे. विद्यार्थ्यांनी या अधिकृत पेजला फॉलो करून अद्ययावत माहिती घ्यावी. तसेच कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या अधिकृत WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हावे. अनधिकृत ग्रुप किंवा व्यक्तींकडून मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून राहू नये. काही अडचणी असल्यास समाजकल्याण कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

३० नोव्हेंबर ही अंतिम मुदत; विद्यार्थ्यांनी विलंब टाळावा

स्वाधार योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण आर्थिक सहाय्य मिळते. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन ३० नोव्हेंबर २०२६ पूर्वी आपले नवीन व नूतनीकरण अर्ज परिपूर्ण कागदपत्रांसह सादर करावेत. मुदतीनंतर नूतनीकरण अर्ज भरता येणार नसल्याने विद्यार्थ्यांनी कोणताही विलंब करू नये, असे आवाहन शिवानंद मिनगिरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक

नांदेड जिल्ह्यातील 3 लाख 88 हजार एएसडीडी मतदारांना नाव नोंदणीची शेवटची संधी

• 30 नोव्हेंबरपर्यंत गणना प्रपत्र सादर करा ; पात्र मतदारांनी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा लाभ घेण्याचे जिल्हा निवडणूक प्रशासनाचे आवाहन

नांदेड, दि. 20 : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम-2026 (SIR) अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 3 लाख 88 हजार 387 मतदारांची नावे अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार (ASDD) या प्रवर्गांत नोंदविण्यात आली आहेत. प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र मतदारांना मतदार यादीत पुन्हा नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी संबंधित मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह गणना प्रपत्र (Enumeration Form) भरून 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. घरोघरी सर्वेक्षणादरम्यान अनुपस्थित (Absent), स्थलांतरित (Shifted), मृत (Dead) आणि दुबार (Duplicate) अशा प्रवर्गांत नोंद झाल्यामुळे प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट होऊ न शकलेल्या मतदारांसाठी आयोगाने 17 नोव्हेंबर 2026 रोजीच्या पत्रानुसार विशेष तरतूद केली आहे. त्यानुसार अशा मतदारांना गणना प्रपत्र उपलब्ध करून देण्यात आले असून, 18 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत बीएलओमार्फत प्रत्यक्ष पडताळणी व प्रपत्रांचे वितरण आणि संकलन करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील एएसडीडी (ASDD) मतदारांमध्ये 2 लाख 27 हजार 453 स्थलांतरित, 71 हजार 587 मृत, 45 हजार 684 अनुपस्थित, 42 हजार 647 दुबार आणि 1 हजार 16 इतर मतदारांचा समावेश आहे. या सर्व मतदारांची बीएलओमार्फत प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी केली जात आहे. पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

गणना प्रपत्र भरण्याची सुविधा

मतदारांना मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ या अधिकृत संकेतस्थळावर किंवा ECINET ॲपवर EPIC क्रमांक टाकून गणना प्रपत्र उपलब्ध करून घेता येईल. संबंधित प्रपत्र मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनाही उपलब्ध करून देण्यात आले आहे. बीएलओ प्रत्यक्ष भेट देऊन तसेच व्हॉट्सॲप आणि ई-मेलद्वारेही मतदारांशी संपर्क साधणार आहेत. याशिवाय 'बुक अ कॉल विथ बीएलओ' ही सुविधाही उपलब्ध आहे. राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी (BLA) प्रारूप यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांची माहिती संबंधित बीएलओंना द्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मतदारांनी घ्यावयाची दक्षता

मूळ निवासस्थानीच वास्तव्यास असलेल्या; मात्र एएसडीडी (ASDD) यादीत नाव समाविष्ट झालेल्या मतदारांनी गणना प्रपत्रासोबत परिशिष्ट-ब जोडून यापूर्वी प्रपत्र सादर न करण्याचे कारण नमूद करावे. स्थलांतरित मतदारांनी नवीन पत्त्याचा तपशील व आवश्यक पुराव्यांसह परिशिष्ट-क जोडून संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावा. अशा मतदारांना स्वतंत्रपणे नमुना-8 भरण्याची आवश्यकता नाही. तसेच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नाव नोंदणीसाठी नमुना-6 भरलेल्या मतदारांना पुन्हा गणना प्रपत्र भरण्याची आवश्यकता नाही.

22 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या सुधारित वेळापत्रकानुसार 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन करण्यात येणार आहे. प्राप्त प्रपत्रांवरील कार्यवाही 10 डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल. दावे व हरकतींचा निपटारा 15 डिसेंबर 2026 पर्यंत करून 22 डिसेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

एकही पात्र मतदार मतदार यादीपासून वंचित राहू नये आणि एकही अपात्र मतदार मतदार यादीत राहू नये, हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रारूप मतदार यादी आणि ASDD यादीत आपले नाव तपासावे. यादीत नाव नसल्यास किंवा ASDD प्रवर्गात नाव असल्यास ३० नोव्हेंबरपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह गणना प्रपत्र संबंधित बीएलओ किंवा मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे सादर करावे. नांदेड जिल्ह्याच्या संकेतस्थळावर तसेच संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात याद्या उपलब्ध आहेत. पात्र मतदारांनी या संधीचा लाभ घेऊन निवडणूक विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

****

वृत्त क्रमांक

नांदेड जिल्ह्यातील 5 हजार 761 शेतकरी ओटीएस कर्जमुक्तीसाठी पात्र

• पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध, 31 मार्च 2027 पर्यंत रक्कम भरण्याची मुदत

नांदेड, दि. 20 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत एकवेळ समझोता (OTS) घटकासाठी नांदेड जिल्ह्यातील 5 हजार 761 पात्र शेतकऱ्यांची यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची दोन लाख रुपयांवरील रक्कम संबंधित बँकेत जमा केल्यानंतर त्यांना शासनामार्फत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. या याद्या संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाने 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना सुरू केली असून, कर्जमाफी, एकवेळ समझोता आणि प्रोत्साहन असे तीन घटक आहेत. पहिल्या टप्प्यातील कर्जमाफी घटकांतर्गत नांदेड जिल्ह्यातील 2 लाख 2 हजार 73 पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या 1 लाख 57 हजार 128 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 1 हजार 416 कोटी 40 लाख रुपयांची कर्जमुक्ती करण्यात आली आहे.

एकवेळ समझोता घटकासाठी प्रसिद्ध केलेल्या यादीत शेतकऱ्यांचे नाव, विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक, बँक व शाखेचे नाव, कर्जखाते क्रमांक, 31 मार्च 2026 अखेरची थकबाकी, ओटीएसनुसार नुसार थकबाकी, शेतकऱ्याने भरावयाची रक्कम आणि शासनामार्फत देय असलेली रक्कम यांचा तपशील नमूद आहे. पात्र शेतकऱ्यांनी यादीतील माहिती तपासून आपला हिस्सा संबंधित बँकेत जमा करावा. एकाच बँकेत एकापेक्षा अधिक कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची रक्कम कोणत्याही एका कर्जखात्यात भरण्याची सुविधा आहे. मात्र, संबंधित खात्यासाठी ओटीएस (OTS) अंतर्गत निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम जमा करू नये. याबाबत शेतकऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांकडून आवश्यक मार्गदर्शन घ्यावे.

शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2027 आहे. बँकांकडून दर शुक्रवारी भरणा केलेल्या रकमेची माहिती पोर्टलवर अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यानंतर महा आयटीमार्फत रकमेची पडताळणी केली जाईल. थकबाकी अद्ययावत झाल्यानंतर तीन दिवसांनी आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध होईल. यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक असून, अॅग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांना निकषांनुसार आणि त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरल्यानंतर दोन लाख रुपयांचा लाभ वितरित करण्यात येईल. शासनाची रक्कम कर्जखात्यात जमा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईल.

ओटीएस (OTS) अंतर्गत प्रसिद्ध झालेली ही पहिली यादी असून, बँकांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीचे संगणकीय संस्करण करून पुढील काळातही पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तसेच, मयत, वयोवृद्ध आणि बोटांचे ठसे नोंदविण्यात अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी 19 ऑगस्ट 2026 रोजी मानक कार्यपद्धती (SOP) निर्गमित करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेशी संपर्क साधून योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे. 

****

वृत्त क्रमांक

कंधारच्या विकासाला नवी गती ; तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण

शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि विकसित उद्यान नागरिकांच्या सेवेत दाखल

नांदेड, दि. २० : कंधार शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण भर घालणाऱ्या शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि शांतीदूत गोविंदराव पाटील चिखलीकर विकसित उद्यानाचे लोकार्पण आज राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांमुळे #कंधार परिसरातील नागरिकांना आरोग्य, प्रशासकीय सेवा आणि मनोरंजनाच्या अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यास मदत होणार असून, उपविभागीय अधिकारी कार्यालयामुळे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ होणार आहे. तसेच विकसित उद्यानामुळे नागरिकांना विरंगुळ्यासाठी एक चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे.

कार्यक्रमास राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता रुपा राऊळ, उपविभागीय अधिकारी विलास नरवटे यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

**










शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय






उपविभागीय अधिकारी कार्यालय




शांतीदूत गोविंदराव पाटील चिखलीकर विकसित उद्यानाचे लोकार्पण

वृत्त क्रमांक मतदार यादी पुनरीक्षणाची मोहीम ३० नोव्हेंबर पर्यंत  २२ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार ;  सुधारित वेळापत्रकानुसार ...