Friday, November 20, 2026

वृत्त क्रमांक

मतदार यादी पुनरीक्षणाची मोहीम ३० नोव्हेंबर पर्यंत 

२२ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार ; 

सुधारित वेळापत्रकानुसार प्रशासनास सहकार्य करण्याचे हणमंत कोळेकर यांचे आवाहन

नांदेड, दि. २० : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ (SIR) च्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन करण्यात येणार असून, २२ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रक्रियेत सर्व राजकीय पक्ष, नागरिक आणि पात्र मतदारांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन ०८६ नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी हणमंत कोळेकर यांनी केले आहे.

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत पहिल्या टप्प्यात मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या मतदारांच्या घरी भेट देऊन गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन करण्यात येणार आहे. प्राप्त गणना प्रपत्रांचे संगणकीकरण करण्याची अंतिम मुदत १० डिसेंबर २०२६ आहे. तसेच नोटीस टप्पा, दावे व हरकतींचा निपटारा ३१ ऑगस्ट ते १५ डिसेंबर २०२६ या कालावधीत करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी २२ डिसेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होईल.

या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी राजकीय पक्षांनी कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे १९ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण घेण्यात आले. त्यांना गणना प्रपत्रे, सूचनापत्रे आणि ASDD मतदारांची यादी देऊन कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बीएलओमार्फत संबंधित मतदारांना गणना प्रपत्र व आवश्यक सूचना वितरित करण्यात येतील. ज्या मतदारांकडे व्हॉट्सॲप सुविधा उपलब्ध आहे, त्यांना पूर्ण भरलेल्या गणना प्रपत्राची प्रत व्हॉट्सॲपद्वारे पाठविण्यात येईल. व्हॉट्सॲप सुविधा नसलेल्या मतदारांना स्वतंत्र पोचपावती देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व पात्र मतदारांनी बीएलओंना आवश्यक सहकार्य करून आपली माहिती वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी हणमंत कोळेकर व सहायक मतदार नोंदणी अधिकारी इंद्रजित गरड यांनी केले आहे.

****







No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक मतदार यादी पुनरीक्षणाची मोहीम ३० नोव्हेंबर पर्यंत  २२ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार ;  सुधारित वेळापत्रकानुसार ...