Sunday, March 15, 2026

वृत्त क्रमांक 325

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली

३८ कोटींची तडजोड

नांदेड दि. १५ मार्च:-महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये नरेंद्र के. ब्रह्मे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नरेंद्र के.ब्रह्मे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 14 मार्च 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

सदरील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, दिवाणी व फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, एन.आय.अॅक्टची प्रकरणे, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका वाद पुर्व मालमत्ता कराची प्रकरणे, गुन्हा कबुलीची प्रकरणे, आर.टी.ओ. व रेल्वे पोलीस विभागाची प्रकरणे, कौटुंबिक, कामगार, सहकार, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच प्रकरणे, सर्व बॅंक प्रकरणे, फायनान्स कंपनीची प्रकरणे, पंचायत समिती कर वसुली व दाखलपुर्व प्रकरणे, बि.एस.एन.एल. कंपनी प्रकरणे, एम.एस.ई.डी.सी.एल. कंपनी  ईत्यादी प्रकरणे ठेवण्यात आली होती त्या करीता जिल्ह्यात एकुण 33 पॅनल तयार करण्यात आले होते.

दिनांक 14 मार्च 2026 रोजी झालेल्या लोक न्यायालयात नांदेड जिल्ह्यातील न्यायालयातील प्रलंबित एकूण 12629 प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी 1135 प्रकरणे निकाली व जवळपास 298184502 रुपयांचे तडजोड मुल्य होते. मालमत्ता थकबाकी व पाणीपट्टीची 4528 प्रकरणे निकाली निघाली व 45638383 रूपयांचे तडजोड मुल्य होते. असे एकूण 6199 प्रकरणे निकाली निघाली आणि तडजोड मुल्य 380460759 रूपये एवढे आहे.

विषेश म्हणजे 14 कोटींचे मुख्य दिवाणी प्रकरण आणि एम.ए.सी.टी.चे 103 प्रकरणे या राष्ट्रीय लोकअदातीमध्ये निकाली निघाली.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद जी. देशपांडे यांनी राष्ट्रीय लोकअदालतीसाठी सहभागी झालेल्या सर्व पक्षकार, न्यायाधीश वर्ग, कर्मचारी वर्ग त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

०००००



 वृत्त क्रमांक 324

माहिती आयोग आपल्या दारी’ उपक्रमातून नांदेडमध्ये

1136 द्वितीय अपीलांची सुनावणी; वेळ व पैशाची बचत झाल्याने अपीलार्थीनी मानले आभार

नांदेड, दि.15मार्च :- राज्य माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘माहिती आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात 9 ते 13 मार्च या कालावधीत द्वितीय अपीलांच्या विशेष सुनावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष कार्यक्रमात एकूण 1 हजार 136 द्वितीय अपीलांवर सुनावणी होऊन प्रकरणे निकाली काढण्यात आली.

या उपक्रमामुळे नांदेड जिल्ह्यातील जन माहिती अधिकारी, अपीलीय अधिकारी आणि अपिलार्थींना छत्रपती संभाजीनगर येथे जाण्याची आवश्यकता भासली नाही. द्वितीय अपीलांची सुनावणी थेट नांदेड येथेच झाल्यामुळे अनेक अपिलार्थी तसेच संबंधित अधिकारी यांचा वेळ आणि पैशाची मोठ्या प्रमाणात बचत झाली.याबाबत अनेक अपीलार्थी यांनी माहिती आयोगाचे आभार मानले.

सन 2024 व 2025 या कालावधीत आयोगाकडे सादर करण्यात आलेली आणि अद्याप प्रलंबित असलेली नांदेड जिल्ह्यातील एकूण 1 हजार 136 द्वितीय अपीलांची सुनावणी या विशेष कार्यक्रमांतर्गत घेण्यात आली. या सुनावण्या राज्य माहिती आयुक्त, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ यांच्या उपस्थितीत नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडल्या.

सर्व संबंधितांना आयोगाकडून सुनावणी नोटिसा देण्यात आल्या होत्या. तसेच सुनावणी बोर्ड व वादसूची आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्यामुळे अपिलार्थींना वेळेत उपस्थित राहणे सुलभ झाले.

सुनावनी दरम्याने ज्या कार्यालयाचे जन माहिती अधिकारी यांनी अद्यापपर्यत माहिती उपलब्ध करुन दिली नाही. तसेच ज्या जन माहिती अधिकाऱ्यांनी सुनावनीस माहिती सोबत आणली नाही अशा जन माहिती अधिकाऱ्यांना सुनावणी संपेपर्यत सुनावनी कक्षात थांबवून अपीलार्थी समक्ष माहिती उपलब्ध करुन देण्यात आली.

सुनावनी कार्यक्रम संपल्यानंतर जिल्हा प्रशासनामार्फत आयोगाचे माहिती आयुक्त व इतर अधिकारी-कर्मचारी यांचे नांदेड येथे शिबिर घेतल्याबाबत आभार मानले. 

तसेच आयोगाच्यावतीने उपसचिव राजाराम सरोदे यांनी जिल्हा प्रशासनामार्फत कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कर्मचारी व इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्याबाबत प्रशासनाचे आभार मानले.

द्वितीय अपीलांच्या विशेष सुनावणी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माहिती आयोगाचे उपसचिव राजाराम सरोदे, कर्मचारी कैलास टरके, विजय शिंदे, आनंद वाघमारे इ. कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन केले.

00000

 वृत्त क्रमांक 323

जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन

125 विविध स्टॉल प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध

तीन दिवसीय नांदेड जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड, दि. 15 मार्च : भारत हा कृषीप्रधान देश असून शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता आहे. तो प्रत्येकाच्या ताटात अन्न पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य करतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. उत्पादन वाढीसोबतच आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करत तंत्रज्ञानाची जोड द्यावी, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी केले.

नांदेड येथे आयोजित जिल्हा कृषी व धान्य महोत्सव व प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचे 15 ते 17 मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास खासदार रविंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, कृषी उपसंचालक कैलास वानखेडे, उपसंचालक आत्मा अर्चना गुंजकर, किशोर स्वामी, प्रगतशील शेतकरी, नागरिक आदी मोठया संख्येने उपस्थित होते. महोत्सवात विविध विषयांवरील शेतकरी-शास्त्रज्ञ परिसंवाद, चर्चासत्रे, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, कृषी मालाचे प्रदर्शन तसेच खरेदीदार-विक्रेता संमेलन होणार आहे.

खासदार अशोक चव्हाण  म्हणाले की, काळानुसार शेती करताना शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता आधुनिक व नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करावा. शेतीत एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादन वाढीस मदत होईल व शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या लाभ होईल. शासन शेतकऱ्यांसाठी विविध भरीव योजना राबवत असून नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात २ लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन विकसित भारत संकल्पनेतून नांदेड जिल्ह्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

संयुक्त राष्ट्र संघटनेने 2026 हे वर्ष महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात महिलांचे अतुलनीय योगदान आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांनी विशेष अभिनंदन केले. या कृषी महोत्सव व प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कृषी विभागाने राबविलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

*शेतीसोबत शेतीपूरक व्यवसायाकडे वळा * – खासदार रविंद्र चव्हाण

डिजिटल युगात शेती करताना शेतकऱ्यांना आता जगातील इतर शेतकऱ्यांशी स्पर्धा करावी लागत आहे. त्यामुळे उत्पादन कसे वाढवता येईल आणि कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळेल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे. तसेच आधुनिक शेतीसोबत शेतीपूरक व्यवसायाकडे वळल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल, असे आवाहन खासदार रविंद्र चव्हाण यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, परदेशात वापरले जाणारे आधुनिक शेती तंत्रज्ञान तसेच विविध विषयांवरील चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रांचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी काळानुसार पीक पद्धतीत बदल करावा. ऊसाची उत्पादकता वाढविण्यासाठी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता)चा वापर करावा तसेच सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे. शेतीत विविध नाविन्यपूर्ण प्रयोग राबवून उत्पादन वाढविण्यावर भर देण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नाविन्यपूर्ण शेती करण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाऐवजी नाविन्यपूर्ण पिकांचा अवलंब करून उत्पादकता वाढीवर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. यासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात रेशीम शेती, चिया सिड लागवड, फार्मर कप, सेंद्रिय शेतीचे फायदे, दुग्ध व्यवसाय वृद्धीसाठी उपाययोजना, कृत्रिम रेतनाचा अवलंब, शेतीतील यांत्रिकीकरणाचा वापर तसेच बीबीएफ (BBF) पद्धतीचा वापर यांसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे. यासोबतच बांबू लागवडीचे फायदे आणि पीक कापणी प्रयोग याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी नांदेड शहराला इतर मोठ्या शहरांशी जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या कृषी महोत्सव व प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या महोत्सवात एकूण 125 स्टॉल लावण्यात आले असून जिल्ह्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग आहे. महोत्सवाच्या ठिकाणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला गहू, ज्वारी, तांदूळ, तूर, मूग, उडीद, चनाडाळ, हळद, मिरची, मसाले तसेच गूळ, हळद पावडर, सेंद्रीय डाळी यांसारखी सेंद्रीय उत्पादने उपलब्ध आहेत. मध, गुळाचा पाक, महिला बचत गटांची चटणी, लोणचे, पापड, कुरडई, टरबूज, खरबूज यांसारखी फळे व विविध भाजीपाला थेट विक्रीसाठी उपलब्ध आहे. याशिवाय जात्यावरची सेंद्रीय डाळ, गोदाकाठची ज्वारी, सेंद्रीय हिरव्या भाज्या, फळभाज्या, रानफळे तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले लाकडी घाण्याचे करडई, भुईमूग, जवस व तिळाचे तेल, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू, केळीचे वेफर्स, डिंक व बिब्याची गोडंबी यांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे.

तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या महोत्सवात भेट देवून शेतकऱ्यांचा माल खरेदी करावा असे आवाहन  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी त्यांच्या प्रास्ताविकात केले.

या वेळी 36 प्रगतीशील शेतकरी व महिला शेतकऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते www.nandedkrushimahotsav.in पोर्टलचे उदघाटन करण्यात आले. या पोर्टलवर सर्व स्टॉलधारकांची माहिती व संपर्क क्रमांक असून शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्यासाठी ग्राहकांना याचा फायदा होणार असून संपर्क साधता येणार आहे.

000000
































 वृत्त क्रमांक 322

ठरलेल्या कालावधीनंतर संस्थेची कार्यकारिणी अद्यावत करावी – धर्मादाय उपआयुक्त ममता राखडे

नांदेड दि.१५ मार्च: धर्मादाय नोंदणीकृत संस्थांचे कामकाज करताना संस्थाचालकांनी संस्थेच्या घटनेतील नियमांनुसार ठरलेली कालमर्यादा संपल्यानंतर कार्यकारिणी अद्यावत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन धर्मादाय उपआयुक्त ममता राखडे यांनी केले.

नांदेड ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने आयोजित ‘महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम व सार्वजनिक ग्रंथालयांसमोरील आव्हाने’ या विषयावरील मार्गदर्शन सत्रात त्या बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, अनेक वेळा संस्थेचे पदाधिकारी मयत झाल्यानंतरही कार्यकारिणीमध्ये आवश्यक बदल केले जात नाहीत. त्यामुळे संस्थेचे कामकाज अडचणीत येते. त्यामुळे अशा बदलांची नोंद वेळेवर करणे अत्यंत आवश्यक आहे.

संस्थांनी दरवर्षी ३० सप्टेंबरपर्यंत ऑडिट अहवाल सादर करणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच पक्षकाराने वकिलाशिवाय बदल अर्ज दाखल केल्यास त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधिज्ञ विजय भोपी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ. वा. सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन नवनाथ कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन विधिज्ञ व्यंकटेश भवर यांनी मानले.

या कार्यक्रमास जिल्हाभरातील ग्रंथालय संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रंथप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000





वृत्त क्रमांक 321

छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अत्यंत संस्कारी महापुरुष – निळकंठ पाचंगे

नांदेड दि.१५ मार्च: छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत संस्कारी महापुरुष होते. या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांचे चरित्र आपल्याला संयम आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची शिकवण देते. महामानव घडविण्यात माता जिजाऊ आणि माता भिमाई यांचे अमूल्य योगदान असल्याचे प्रतिपादन परिसंवादाचे अध्यक्ष तथा कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे यांनी केले.

नांदेड ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने दि. १४ मार्च रोजी आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वराज्य संकल्पना’ या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते बोलत होते.

परिसंवादात बोलताना प्रा. राजेंद्र गोणारकर म्हणाले की, मोठी माणसे सर्वांसाठी स्वप्ने पाहतात आणि ती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतात. छत्रपती शिवाजी महाराज हे लोकाना वाटणारे राजे होते. त्यांच्या राज्यात सर्वांना समानतेची वागणूक दिली जात होती.

दुसरे वक्ते प्रा. संतोष देवराये यांनी सांगितले की, शिवरायांच्या स्वराज्यात जात-वर्णभेद नव्हता. सतराव्या शतकातील राजेशाही व्यवस्थेत लोकशाही मूल्यांची स्थापना करणारे ते पहिले राजे होते. महामानव कोणत्याही एका जातीपुरते मर्यादित नसतात, ते सर्व समाजाचे असतात. शिवरायांचे विचार कृतीत आणणे हे आपले कर्तव्य आहे. शिवरायांच्या स्वराज्याचा विचार भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण हंबर्डे यांनी केले, तर आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ. वा. सूर्यवंशी यांनी मानले.

00000



वृत्त क्रमांक 320

मराठी भाषा अस्मितेचा श्वास – प्रा. मा. मा. जाधव

नांदेड दि. १५ मार्च : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी शेकडो वर्षांचा इतिहास आणि शासनासोबत जवळपास अकरा वर्षे सातत्याने प्रयत्न करावे लागले. हा दर्जा उशिरा मिळाला असला तरी मराठी भाषेचा अभिमान बाळगणे व तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. मराठी भाषा ही आपल्या अस्मितेचा श्वास आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. मा. मा. जाधव यांनी केले.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (दि. १५ मार्च) आयोजित ‘अभिजात मराठी भाषा व साहित्य’ या परिसंवादाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते बोलत होते.

डॉ. जाधव पुढे म्हणाले की, अभिजात भाषेचा दर्जा मिळणे म्हणजे हजारो वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव होय. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती समाजातील वेदना, संघर्ष आणि दु:ख व्यक्त करणारे प्रभावी माध्यम आहे. अशा प्रकारे समाजाशी जोडलेली भाषा कायम जिवंत राहते.

या परिसंवादात वक्ते संजय जगताप यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यामागील ऐतिहासिक पुराव्यांचा उल्लेख केला. दोन हजार वर्षांपूर्वीचे शिलालेख, इ.स. ९३९ चे शिलालेख, ज्योतिष रत्नमाला या संस्कृत ग्रंथातील संदर्भ, आद्यकवी मुकुंदराज यांचा विवेकसिंधु, इ.स. १२७८ मधील महिम भट्ट यांचे लीळाचरित्र, तसेच ज्ञानेश्वरी आणि संत तुकाराम गाथा यांसारख्या साहित्यसंपदेच्या आधारे मराठीच्या प्राचीनतेचे व समृद्धतेचे पुरावे अधोरेखित झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ साहित्यिक विलास वैद्य यांनी ‘मराठीच बोला, संतांचा विचार घरोघरी’ या कवितेद्वारे मराठी भाषेचा अभिमान आणि महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमास नांदेडचे तहसीलदार विकास बिरादार व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ. वा. सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन साहित्यिक नारायण शिंदे यांनी केले तर आभार बालाजी नार्लेवाड यांनी मानले.

0000




वृत्त क्रमांक 319

नांदेड कृषी महोत्सवात १७ मार्च रोजी पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा

नांदेड दि.१५ मार्च : नवा मोंढा मैदान, नांदेड येथे १५ ते १७ मार्च २०२६ दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्हा कृषी महोत्सव २०२६ आयोजित करण्यात आला आहे.

या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने १७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ‘पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी बाजरी, नाचणी, वरई, भगर आदी पौष्टिक तृणधान्यांपासून तयार केलेले विविध पदार्थ स्पर्धकांनी सोबत आणावेत.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी कृषी महोत्सवातील नोंदणी विभागात दि. १७ मार्च २०२६ पर्यंत नोंदणी करावी. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात येणार आहे.

जास्तीत जास्त स्पर्धकांनी या पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 338   नांदेड ग्रंथोत्सव -2025 आयोजित वाचकांनी केली विक्रमी खरेदी ; दहा लाख रुपयांची ग्रंथविक्री   नांदेड दि. 18 मार्च :-...