Thursday, April 16, 2026

 









 #NariShakti


 


 नारी शक्ति : विकसित भारत की पहचान





वृत्त क्रमांक

अण्णासाहेब पाटील महामंडळाची वैयक्तिक व गट कर्ज सुलभ परतावा योजना

नांदेड दि. 16 एप्रिल :- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत बँक मंजुरी स्तरावर “Reject for Incomplete Documents” अर्थात अपूर्ण कागदपत्रांमुळे Reject स्थितीत असलेली प्रकरणे लाभार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या लॉगिनद्वारे पाहता येणार आहेत. 

लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत केल्यानंतर संबंधित प्रकरण “Scrutiny” स्तरावर दिसेल. त्या ठिकाणी कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र प्रकरणांसाठी “Submit” पर्याय उपलब्ध होईल. “Submit” केल्यानंतर संबंधित प्रकरण पुढील तपासणीसाठी मुख्यालयाकडे पाठविण्यात येईल व त्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

त्यानंतरच्या टप्प्यात, लाभार्थी व्याज परताव्यासाठी क्लेम सादर करत असताना कागदपत्रांमधील त्रुटींमुळे Hold स्थितीत असलेली प्रकरणे लाभार्थ्यांना त्यांच्या लॉगिनवर कारणांसह दिसतील. अशा प्रकरणांचे त्वरित निराकरण करण्यासाठी लाभार्थ्यांनी संबंधित त्रुटींची पूर्तता जिल्हा समन्वयकांमार्फत करावी.

सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे जिल्हा समन्वयकांकडून प्राथमिक तपासणी व विभागीय समन्वयकांकडून पुढील प्रक्रिया पूर्ण करून प्रकरण मुख्यालयाकडे पाठविले जाईल. लाभार्थ्यांनी Hold स्थितीतील कारणे लक्षात घेऊन 15 दिवसांच्या आत कागदपत्रे पूर्ण करावीत. आवश्यक असल्यास जिल्हा समन्वयकांकडून मार्गदर्शन घ्यावे. भविष्यात Hold संबंधित कागदपत्रे लॉगिनवरून अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे.

पूर्वी व्याज परतावा खात्यात जमा झाल्यानंतरच पुढील क्लेम करता येत होता आता “Sent for CAFO” स्तरावर पोहोचताच पुढील क्लेम सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी प्रतीक्षा न करता सुविधा वापरावी.

एकापेक्षा अधिक समान संपर्क क्रमांक, बँक तपशीलातील विसंगती तसेच कागदपत्रांमधील खाडाखोड या कारणांमुळे काही प्रकरणे Block करण्यात आलेली आहेत. संबंधित लाभार्थ्यांनी योग्य संपर्क क्रमांक / बँक तपशील दुरुस्त करावेत. मूळ कागदपत्रांसह अर्ज जिल्हा समन्वयकांकडे सादर करावा. 

सर्व लाभार्थ्यांनी  लॉगिनवर जाऊन Hold/Block कारणे तपासावीत, त्वरित कागदपत्रे पूर्ण करावीत. अडचण असल्यास जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधावा. फक्त अधिकृत संकेतस्थळाव्दारेच प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 

परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे

अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांचा दौरा 

नांदेड दि. 16 एप्रिल :- परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे (मंत्री दर्जा) अध्यक्ष कॅप्टन आशिष आनंद दामले हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

शुक्रवार 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वा. छत्रपती संभाजीनगर येथून नांदेडकडे प्रयाण. सायं. 7 वा. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नांदेडद्वारा आयोजित परशुराम तेजोत्सव अंतर्गत प्रखर हिंदुत्व कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ कुसूम सभागृह नांदेड. रात्री 8.45 वा. नांदेड येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

00000

वृत्त क्रमांक 

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड जिल्हा दौरा 

नांदेड दि. 16 एप्रिल :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे 17 व 18 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

शुक्रवार 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 वा. छत्रपती संभाजीनगर येथून माहूरगड शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह माहूरगड येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वा. परमपुज्य महंत दत्त शिखर संस्थान माहूरगड यांची भेट व दर्शन. सकाळी 10.30 वा. रेणुकादेवी माता दर्शन व परिसरातील विकास कामांची पाहणी. सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह माहूरगड येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वा. माहूर विकास आराखडा सादरीकरण आणि जिल्हाधिकारी व इतर संबंधित यांच्यासोबत बैठक. स्थळ-तहसिल कार्यालय माहूरगड. दुपारी 1 वा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी किनवट आणि इतर संबंधित यांच्यासोबत आदिवासी उपयोजना आणि इतर विषयी संबंधीत बैठक. स्थळ तहसिल कार्यालय माहूरगड. दुपारी 2 वा. भोजन व राखीव. दुपारी 4 वा. शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सायं. 6 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव व मुक्काम. 

शनिवार 18 एप्रिल 2026 सकाळी 9 वा. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे नियोजित ओबीसी स्वयंरोजगार मेळावा 2026 निमित्त पाहणी. सकाळी 10 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे विविध प्रशासकीय बैठका. नांदेड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था संदर्भाने प्रशासकीय अधिकारी यांची आढावा बैठक. बळीराजा शेती पाणंद रस्ते योजना आढावा बैठक. जिल्हा परिषद, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, वन विभाग इत्यादींची आढावा बैठक. दुपारी 2 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून छत्रपती संभाजीनगरकडे वाहनाने प्रयाण करतील.

00000

 वृत्त क्रमांक  

विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड दि. 16 एप्रिल :- वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. अंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील लोकांसाठी योजना राबविल्या जात आहेत.

तसेच महाराष्ट्र शासनाने वडार समाजासाठी पैलवान कै.मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी)  व रामोशी समाजासाठी उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) गवळी समाजासाठी श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) नाथपंथीय समाजासाठी श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) लोहार समाजासाठी ब्रम्हलिन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) विणकर समाजासाठी विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) या सहा उपकंपन्याची स्थापना केलेली आहे. ही महामंडळे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. अंतर्गत कार्यरत असुन त्यांना स्वतंत्र उददीष्ट देण्यात आलेले आहे. या सहा उपकंपनीना महामंडळां अंतर्गत पुढीलप्रमाणे योजना राबलिल्या जातात.

वैयक्तिक  कर्ज व्याज परतावा योजना - या योजनेची मर्यादा 15 लाख रुपयांपर्यत असुन अर्जदार हा विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असावे, अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. ही योजना ऑनलाईन असुन यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा संबंधीत व्यवसायाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल व इतर कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजना -  या योजनेची मर्यादा 10 लाख ते 50 लाख रुपयांपर्यत असुन या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत गट असावा व गटातील सदस्य हे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावे. गटातील सदस्यांचे वय 18 ते 45 वर्ष पर्यत असावे. गटातील लाभार्थ्याचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. उत्पन्नाची मर्यादा नॉन क्रिमीनल साठी 8 लाखाच्या मर्यादीत असावी. ही योजना ऑनलाईन असुन यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा संबंधीत व्यवसायाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल वेबसाईटवर मुळ कागदत्रासह अपलोड करणे आवश्यक आहे.

1 लाख रुपये थेट कर्ज योजना - या योजनेमध्ये महामंडळाकडुन 1 लाख रुपये थेट कर्ज दिले जाते. या योजनेसाठी दोन जामीनदार व गहाणखत तसेच बोझा नोंद करुन देणे आवश्यक आहे. या योजनेसाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (1 लाख रुपयांपर्यत),रेशन कार्ड ,आधार कार्ड, वयाचा पुरावा, व्यवसायाचा परवाना इ. कागदपत्रांसह  संबंधीत व्यवसायानुसार कागदपत्रे आवश्यक आहे. ही योजना ऑनलाईन करण्यात आलेली असून अर्ज महामंडळाच्या संकेतस्थळावर भरता येईल. 

बीज भांडवल योजना - ही योजना बँकेमार्फत राबविली जात असुन अर्जदाराने महामंडळाकडे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (1 लाखापर्यंत) ,रेशनकार्ड ,आधार कार्ड, वयाचा पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र ,संबंधीत व्यवसायानुसार आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडुन कार्यालयात दाखल करावी लागतील . यापुर्वी लाभार्थीने कर्जाचा लाभ घेतला असल्यास त्यांना परत कर्ज प्रस्ताव दाखल करता येणार नाही.

तरी जिल्हयातील इच्छुक लाभार्थीनी अर्ज करण्यासाठी महामंडळाच्या https://vnvjntdc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक वि.जा.भ.ज. विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर.एस.नरवडे यांनी केले आहे.

000000

 यशकथा               

जिद्द, धाडस आणि यश.. अमृताताईंची क्रीडा क्षेत्रात प्रेरणादायी झेप

रेणापूरकरर्स नेक्सस स्पोर्ट्स अकॅडमी; क्रीडा क्षेत्रात आदर्शवत वाटचाल”

केंद्र व राज्य शासनाच्यावतीने महिला सक्षमीकरणासाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबनाची संधी मिळत असून अनेक महिला उद्योग-व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.

नांदेड येथील श्रीमती अमृता रेणापूरकर या अशाच यशस्वी महिला उद्योजिकांपैकी एक आहेत. पारंपरिक व्यवसायाच्या चौकटीत न अडकता त्यांनी वेगळ्या क्षेत्रात पाऊल ठेवत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. धाडस, चिकाटी आणि नावीन्यपूर्ण दृष्टिकोन यांच्या जोरावर त्यांनी आपल्या व्यवसायात उल्लेखनीय यश मिळवले आहे.

अनेक महिलांनी पारंपरिक व्यवसायाची निवड केली असताना अमृता रेणापूरकर यांनी वेगळा मार्ग स्वीकारत नवीन संधी शोधल्या आणि त्या यशस्वीपणे साध्य केल्या. त्यांच्या या प्रयत्नांमुळे त्या केवळ स्वतःपुरत्याच मर्यादित राहिल्या नाहीत, तर इतर महिलांसाठीही प्रेरणास्थान ठरल्या आहेत.

नांदेड शहरात अशा यशस्वी महिला उद्योजिका घडत आहेत ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. त्यांच्या या यशकथेमुळे इतर महिलांनाही स्वतःच्या पायावर उभे राहण्याची आणि नव्या क्षेत्रात संधी शोधण्याची प्रेरणा मिळत आहे.

नांदेड ग्रामीण व निमशहरी भागातील होतकरू खेळाडूना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सन 2022 मध्ये स्थापन झालेली रेणापूरकरर्स नेक्सस स्पोर्ट्स अकॅडमी आज क्रीडा क्षेत्रातील एक यशस्वी आणि प्रेरणादायी उपक्रम ठरली आहे. अल्पावधीतच या अकॅडमीने शिस्त, गुणवत्ता आणि उत्कृष्ट प्रशिक्षणाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या अकॅडमीच्या स्थापनेमागे श्रीमती अमृता देव रेणापूरकर यांची दूरदृष्टी, जिद्द, चिकाटी, मेहनत आहे. त्यांनी आपले पती श्री. आशिष बलभीमराव रेणापूरकर यांच्या क्रीडा प्रवासाचा जवळून अनुभव घेतला. या प्रवासातून त्यांना खेळाडूंना भेडसावणाऱ्या अडचणी, विशेषतः नांदेडसारख्या ठिकाणी व्यावसायिक प्रशिक्षणाच्या मर्यादित संधी यांची जाणीव झाली. याच जाणिवेतून त्यांनी नवोदित खेळाडूंसाठी सक्षम व्यासपीठ उभारण्याचा संकल्प केला व प्रत्यक्ष अस्तित्वात आणला.

या अकॅडमीची सुरुवात शिवाजी नगर, नांदेड येथे झाली. सुरुवातीला लहान स्वरूपात सुरू झालेला हा उपक्रम स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने विस्तारला गेला आणि पुढे तरोडा येथे दुसरी शाखा सुरू करण्यात आली. आज तरोडा शाखा ही या यशस्वी प्रवासाचे प्रमुख केंद्र बनली आहे.

सध्या अकॅडमीमध्ये 80 पेक्षा अधिक विद्यार्थी 6 प्रशिक्षित व प्रमाणित कोर्सेसच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. तसेच 2 कर्मचाऱ्यांसह एकूण 8 जणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. अकॅडमीमध्ये बास्केटबॉल, फुटबॉल व क्रिकेट या खेळांचे नियोजनबद्ध आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. यासोबतच विद्यार्थ्यांच्या शिस्त, संघभावना या महत्वाच्या असून, व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जातो.

श्रीमती अमृता देव रेणापूरकर यांना अकॅडमीच्या प्रगतीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, नांदेड यांच्याकडून 25 टक्के अनुदान तसेच युनियन बँक ऑफ इंडिया यांच्याकडून 20 लाख रुपयांचे कर्ज मिळाले. या आर्थिक सहाय्यामुळे पायाभूत सुविधा उभारणी व अकॅडमीचा विस्तार अधिक सक्षमपणे करणे त्यांना साध्य झाले.

रेणापूरकर’स नेक्सस स्पोर्ट्स अकॅडमी ही केवळ क्रीडा प्रशिक्षण देणारी संस्था नसून ती नवोदित खेळाडूंचे भविष्य घडविणारी एक सक्षम व्यासपीठ ठरत आहे. येथील विद्यार्थी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

ही यशोगाथा केवळ एका अकॅडमीची नाही, तर स्वप्न पाहण्याची, त्या स्वप्नासाठी झटण्याची आणि समाजासाठी नवे आदर्श निर्माण करण्याची प्रेरणादायी कहाणी आहे. 

अलका राजेंद्र पाटील

उपसंपादक जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

00000





विशेष वृत्त

श्री गुरुगोबिंद सिंघजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महिलांसाठी प्रवेशाची सुवर्णसंधी

नांदेड, दि. 16 मार्च : महिलांच्या कौशल्यविकासाला चालना देत त्यांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने श्री गुरुगोबिंद सिंघजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), नांदेड येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, महिलांसाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांवर अधिक भर देत विविध सवलती व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

संस्थेमार्फत महिलांसाठी कॉस्मेटोलॉजी (Cosmetology) आणि शिवणकाम तंत्रज्ञान (Sewing Technology) या दोन प्रमुख अभ्यासक्रमांची सोय करण्यात आली आहे. कॉस्मेटोलॉजी व्यवसायासाठी २४ तर शिवणकाम तंत्रज्ञानासाठी ४० अशा एकूण ६४ जागा केवळ महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. हे दोन्ही अभ्यासक्रम अल्प कालावधीत कौशल्य आत्मसात करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे ठरत आहेत.

याशिवाय, संस्थेतील इतर तांत्रिक अभ्यासक्रमांमध्येही महिलांसाठी ३० टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या असून, त्यामुळे पारंपरिक क्षेत्रांबरोबरच तांत्रिक क्षेत्रातही महिलांना प्रवेश मिळणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपलब्ध असलेले विविध कोर्सेस उद्योगाभिमुख असल्याने प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची, लघुउद्योग उभारण्याची किंवा नोकरीच्या संधी मिळविण्याची मोठी संधी प्राप्त होते.

संस्थेमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री, सुसज्ज कार्यशाळा आणि अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थिनींना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढतो. तसेच, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विविध सरकारी योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग उभारण्यासाठीही मार्गदर्शन करण्यात येते.

आजच्या बदलत्या आणि स्पर्धात्मक युगात कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेता, महिलांनी शिक्षणासोबतच कौशल्य विकासाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह लवकरात लवकर संस्थेशी संपर्क साधावा. 

संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये:

•महिलांसाठी स्वतंत्र व विशेष राखीव तुकड्या

•कॉस्मेटोलॉजी व शिवणकाम तंत्रज्ञानासारखे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम

•इतर सर्व तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये ३०% आरक्षण

• अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह प्रात्यक्षिक प्रशिक्षण

• अनुभवी व पात्र प्रशिक्षकांचे मार्गदर्शन

महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही संधी अत्यंत महत्त्वाची ठरत असून, नांदेड जिल्ह्यातील महिलांनी याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

 वृत्त क्रमांक  

एकल महिलांसाठी कार्यवाही संवेदनशीलतेने पार पाडा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची बैठक संपन्न

नांदेड, दि. 16 एप्रिल : मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत विधवा व घटस्फोटीत (एकल) महिलांसाठी आवश्यक असलेली सर्व कार्यवाही अत्यंत संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत थोरात, साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी तसेच महिला व बाल विकास विभाग, माविम, उमेद, जिल्हा कौशल्य विकास विभाग आदींचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने 1 मे रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले. या ग्रामसभांमध्ये अंगणवाडी सेविकांनी केलेल्या सर्वेक्षणातील एकल महिलांची यादी सादर करून त्यांच्या गरजा, समस्या व आवश्यक कागदपत्रांबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे सांगण्यात आले. तसेच ग्रामपातळीवर एकल महिलांची अचूक संख्या निश्चित करून त्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याबाबतही ग्रामसभेत चर्चा करण्याचे निर्देश देण्यात आले. संबंधित अहवाल तालुकास्तरीय मिशन वात्सल्य समितीकडे सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

एकल महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात माविम व उमेद अभियानाच्या माध्यमातून मेळावे व प्रेरणा कार्यशाळा आयोजित करण्यावर भर देण्यात यावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन’ योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजू बालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शाळांमार्फत अर्ज मागविण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त शाळांमध्ये एकल पालक असलेल्या बालकांचे सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांचे अर्ज तयार करून तालुकास्तरीय संरक्षण अधिकाऱ्यांकडे सादर करावेत, असेही सांगण्यात आले.

एकल महिलांकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्यास ती पहिल्या टप्प्यात 15 दिवसांच्या आत उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. यामध्ये आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, पतीचा मृत्यू दाखला, जॉब कार्ड आदी कागदपत्रांचा समावेश असून, ग्रामविकास विभागाने तहसीलदार व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या समन्वयातून यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले.

00000



 वृत्त क्रमांक  

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नांदेड दि. 16 एप्रिल :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य" या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थी आणि नागरिकांनी या वैचारिक चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

या स्पर्धेचे स्वरूप आणि नियम पुढीलप्रमाणे आहेतः

स्पर्धेचे गट आणि शब्दमर्यादाः

गट १: आयटीआय / डिप्लोमा / एमसीव्हीसी प्रशिक्षणार्थी व उत्तीर्ण विद्यार्थी (शब्दमर्यादाः ५०० ते ८०० शब्द).

गट २: खुला गट - पुरुष व महिला (शब्दमर्यादाः ८०० ते १२०० शब्द).

सहभाग नोंदणी व कालावधीः निबंध सादर करण्याचा कालावधीः 14 एप्रिल ते 25 एप्रिल 2026.

नोंदणी प्रक्रियाः स्पर्धकांनी आपले निबंध जाहिरातीत दिलेल्या Google Form (QR Code/Link) द्वारेच सादर करणे आवश्यक आहे.

Link: https://forms.gle/RcFPhcUgY8 X4P2NT8

forms.gl/RcFPhcUgY@K4P2NTO

दोन्ही गटांतील विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके निश्चित करण्यात आली आहेत. 

00000



 वृत्त क्रमांक  

युवकांसाठी किनवट येथे शिका आणि कमवा अंतर्गत 23 एप्रिल रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

नांदेड, दि. 16 एप्रिल: बळीराम पाटील महाविद्यालय, किनवट व आदिवासी उमेदवारांकरीता, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट जि.नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानाने टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा.लि. कंपनीमार्फत तरुणांसाठी टोयोटाचा शिका आणि कमवा अंतर्गत कौशल्य विकास उपक्रम प्लेसमेंट ड्राईव्ह 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता बळीराम पाटील महाविद्यालय किनवट येथे आयोजीत केले आहे.

युवकांना तांत्रिक शिक्षणासोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा.लि.यांनी “टोयोटा कौशल्या” तरुणांसाठी टोयोटाचा शिका आणि कमवा अंतर्गत कौशल्य विकास उपक्रम हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येणार असुन त्यांचा कौशलय विकासावर विशेष भर दिला जाणार आहे.

या उपक्रमाअंतर्गत शुन्य खर्चात डायरेक्टरेट जनरल ट्रेनिंग ( DGT) च्या सहकार्याने निवासी जागतिक दर्जाचे तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. 2 वर्ष प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 1 वर्ष शिकाऊ प्रशिक्षणासाठी पात्र व 1 वर्ष शिकाऊ प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या संधीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहे.

या उपक्रमाअंतर्गतचे  कोर्सेस :- 1) वाहन वेल्ड तंत्रज्ञ 2) वाहन रंगकाम तंत्रज्ञ 3) वाहन जोडणी तंत्रज्ञ 4) मेकाट्रॉनिक्स तंत्रज्ञ. 

 या कोर्सेससाठी पात्रता वय 18 ते 21 वर्षे असणे आवश्यक शिक्षण 10 वी 12 वी पास असणे आवश्यक, वैवाहिक स्थिती अविवाहीत असणे आवश्यक. या उपक्रमाअंतर्गत विद्यावेतन व सुविधा  विद्यावेतन ( प्रथम वर्ष ) 15 हजार 815 रुपये  प्रति महिना, ( व्दितीय वर्ष)  17 हजार 615 रुपये  प्रति महिना, मूलभुत सविधांसह राहण्याची व जेवणाची व्यवस्था, सुरक्षिता व देखरेखसाठी चोविस तास वार्डन असणार आहे. 

तरी सर्व बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा आवश्यक  लाभ द्यावा, असे आवाहन किनवटचे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सु.गो.चव्हाण यांनी केले आहे.

000000

 वृत्त क्रमांक  

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी सर्वंकष उपाययोजना करणार : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक संपन्न

नांदेड, दि. 16 एप्रिल : नांदेड हे शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र बनले असून राज्यभरातून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात दर्जेदार शिक्षण मिळावे आणि त्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वंकष उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक पार पडली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. आश्विनी जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तसेच कोचिंग क्लासेसचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी क्लासेस परिसरात ‘दामिनी पथक’ व इतर पथकांमार्फत पोलीस गस्त वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देशही पोलीस विभागाला देण्यात आले.

मेडिकल स्टोअर्समध्ये अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री होऊ नये, तसेच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री टाळावी, याबाबत दुकानदारांनी दक्षता घ्यावी. यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कठोर देखरेख ठेवावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी शिक्षण विभागाने विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवावेत, अशा सूचना देण्यात आल्या. बैठकीदरम्यान कोचिंग क्लासेसच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या समस्याही ऐकून घेण्यात आल्या.

दरम्यान, दि. 20 ते 24 एप्रिल 2026 या कालावधीत दररोज सकाळी 10 ते 12 या वेळेत शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडिअम येथे पालक व विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांना सुरक्षित, निरोगी व सकारात्मक वातावरणात शिक्षण मिळावे, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी नमूद केले.
०००००




  "    वृत्तपत्रीय टिप्पणी    "   "   शिवछत्रपती क्रडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधीनीमध्ये सरळप्रवेश व खेळनिहाय कौशल्य  चाच...