Friday, November 13, 2026

 #भगवानबिरसामुंडा


 #MahatmaPhule200




३०४ तालुक्यांतील प्रत्येक गावात किमान १०० जलशोषक खड्डे

वृत्त क्रमांक

नांदेडमध्ये १६ नोव्हेंबरला महिला लोकशाही दिनाचे आयोजन

• महिलांच्या समस्या व तक्रारींचे होणार निराकरण   

• पीडित महिलांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नांदेड, दि. १३ नोव्हेंबर : शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांतर्गत सोमवार १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वा. नांदेड येथे महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम महसूल प्रबोधिनी (प्रशिक्षण केंद्र), एसबीआय एटीएमच्या मागे, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे पार पडणार आहे.

महिलांच्या विविध समस्या, अडचणी व तक्रारी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. महिला लोकशाही दिनानिमित्त संबंधित समितीचे सदस्य तसेच शासन निर्णयात नमूद विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांनी आपल्या तक्रारी व अर्ज विहित नमुन्यात सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला लोकशाही दिन समितीच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड आणि सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक

रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे

तालुका कृषी अधिकारी विशाल बिऱ्हाडे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

नांदेड, दि. १३ नोव्हेंबर : राज्य शासनाने रब्बी हंगाम २०२६-२७ साठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी या योजनेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. नुकसानी पासून शेतकऱ्यांचे आर्थिक संरक्षण व्हावे, यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अर्धापूरचे तालुका कृषी अधिकारी विशाल बिऱ्हाडे यांनी केले आहे. या हंगामात गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, रब्बी मका, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग व रब्बी कांदा या सात पिकांचा समावेश करण्यात आला आहे. अधिसूचित महसूल मंडळ व क्षेत्रातील शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी पीकनिहाय अंतिम मुदती निश्चित करण्यात आल्या आहेत. रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) पिकासाठी ३० नोव्हेंबर २०२६, तर गहू (बागायत), हरभरा, रब्बी मका व रब्बी कांदा या पिकांसाठी १५ डिसेंबर २०२६ ही अंतिम मुदत आहे. तसेच उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग पिकांसाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत विमा नोंदणी करता येणार आहे.

कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित बँकेमार्फत मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी संबंधित बँकेस लेखी कळविणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या https://pmfby.gov.in या संकेतस्थळावर स्वतः नोंदणी करता येईल. तसेच संबंधित बँका, विमा कंपनीचे नियुक्त प्रतिनिधी, क्रॉप इन्शुरन्स ॲप आणि सामूहिक सेवा केंद्र (CSC) यांच्या माध्यमातूनही नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. भाडेपट्ट्याने किंवा बटाईने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही योजनेत सहभागी होता येणार आहे.

अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. नांदेड जिल्ह्यासाठी नियुक्त विमा कंपनी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 9 वा मजला ऑफिस ए, नेक्सस वेस्टेंड सेक्टर 1 बिल्डिंग ए सर्वे क्र 169/1 परिहार चौकाजवळ डीपी रोड औंध पुणे 411007 असून अधिक माहितीसाठी supportagri@iffcotokio.co.in या ई-मेलवर संपर्क साधता येईल. रब्बी हंगामातील पिकांचे संभाव्य नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी निर्धारित मुदतीपूर्वी पीक विमा नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विशाल वसंतराव विंगाडे यांनी केले आहे.

000

 वृत्त क्रमांक

मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी २० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान

नांदेड, दि. १३ नोव्हेंबर : जिल्हा परिषद नांदेडच्या स्वउत्पन्नातून देण्यात येणाऱ्या २० टक्के उपकर योजनेंतर्गत मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपये अनुदान दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांनी दिली आहे.

या योजनेचा लाभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा लाभ घेता येणार नाही.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे. तहसीलदारांनी निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, अर्जदार किंवा कुटुंबाचे रेशनकार्डची साक्षांकित प्रत आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. एका कुटुंबातील केवळ एका व्यक्तीस या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

अर्जदार विद्यार्थी कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. जानेवारी २०२३ पासून अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग किंवा रेल्वे परीक्षेतील पूर्व अथवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार शासकीय सेवेत कार्यरत नसावा. विद्यार्थ्यांचे वय १८ ते ४3 वर्षे असणे बंधनकारक आहे. सन 2026-27 या वर्षात ज्या योजना राबविण्यात येतील त्या योजनेसाठी कोणत्याही एका योजनेस लाभ देण्यात येईल.

इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज स्वसाक्षांकित करून आपल्या तालुक्यातील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयात सोमवार ३0 नोव्हेंबर २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. या योजनेतील लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येणार असल्याचेही जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांनी कळविले आहे.

0000

 वृत्त क्रमांक

पाच वर्षाखालील बालकांना न्यूमोनियापासून वाचवा ; लक्षणे दिसताच तातडीने उपचार घ्या !

 ‘सांस’ अभियानातून नांदेड जिल्ह्यात जनजागृतीवर भर ; बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज

 न्यूमोनियाला प्रतिबंध करा, बालमृत्यू टाळा !

नांदेड, दि. १३ नोव्हेंबर : पाच वर्षांखालील बालकांमध्ये न्यूमोनियामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने नांदेड जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘सांस’ (SAANS-Social Awareness and Action to Neutralize Pneumonia Successfully) अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून बालकांमधील न्यूमोनियाची लक्षणे वेळीच ओळखणे, तातडीने निदान व उपचार उपलब्ध करून देणे आणि पालकांमध्ये जनजागृती करणे यावर विशेष भर दिला जात आहे. पालकांनी पाच वर्षाखालील बालकांच्या आरोग्याबाबत सतर्क राहून न्यूमोनियाची लक्षणे दिसताच जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केले आहे. 

न्यूमोनिया बालमृत्यूचे प्रमुख कारण ; वेळीच उपचार महत्त्वाचे

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माहितीनुसार देशात पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूंपैकी सुमारे १५ टक्के मृत्यू न्यूमोनियामुळे होतात. योग्य पोषण, नियमित लसीकरण, स्वच्छता, प्रदूषणापासून संरक्षण आणि वेळेवर निदान व उपचार या उपाययोजनांमुळे न्यूमोनियामुळे होणारे अनेक बालमृत्यू टाळणे शक्य आहे. त्यामुळे पालकांनी बालकांच्या आरोग्यातील अगदी लहान बदलांकडेही दुर्लक्ष करू नये. 

वयानुसार न्यूमोनियाची लक्षणे ओळखा !

बालकांना न्यूमोनिया झाल्यास त्यांच्या वयानुसार श्वासोच्छ्वासाचा वेग वाढणे, छाती आत ओढली जाणे, दूध पिण्यास त्रास होणे आणि सुस्ती येणे अशी लक्षणे दिसू शकतात. 

० ते ५९ दिवसांचे नवजात बालक :

* एका मिनिटात ६० किंवा त्यापेक्षा जास्त श्वास घेणे.

* स्तनपान करता न येणे किंवा दूध पिण्यास त्रास होणे.

* ताप येणे किंवा शरीर थंड पडणे.

* हालचाल कमी होणे अथवा असामान्य सुस्ती येणे.

* आकडी येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे. 

२ महिने ते १२ महिने वयोगट :

• एका मिनिटात ५० किंवा त्यापेक्षा जास्त श्वास घेणे.

• श्वास घेताना छाती आत ओढली जाणे.

• दूध पिण्यास त्रास होणे किंवा बालक सुस्त होणे.

१२ महिने ते ५ वर्षे वयोगट :

• एका मिनिटात ४० किंवा त्यापेक्षा जास्त श्वास घेणे.

• श्वास घेण्यास त्रास होणे किंवा छाती आत ओढली जाणे.

• खाणे-पिणे बंद होणे, उलट्या होणे किंवा बालक सुस्त होणे. 

यापैकी कोणतेही गंभीर लक्षण दिसल्यास घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता बालकाला तातडीने शासकीय आरोग्य संस्थेत घेऊन जाणे आवश्यक आहे. 

न्यूमोनिया प्रतिबंधासाठी ‘३ पी’ त्रिसूत्रीचा अवलंब करा !

‘सांस’ अभियानांतर्गत संरक्षण, प्रतिबंध आणि उपचार या तीन प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

संरक्षण : जन्मानंतर पहिले सहा महिने बालकाला केवळ मातेचे दूध द्यावे. सहा महिन्यांनंतर स्तनपान सुरू ठेवून वयानुसार योग्य पूरक आहार द्यावा. तसेच बालकाला नियमानुसार जीवनसत्त्व ‘अ’ची मात्रा द्यावी.

प्रतिबंध : बालकाचे PCV, Hib, गोवर तसेच राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकानुसार सर्व लसीकरण पूर्ण करावे. बालकाला हाताळण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत. घरातील धूर, धूम्रपान आणि हवेचे प्रदूषण टाळावे. घरात स्वच्छता राखून पुरेशी हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. 

उपचार : बालकाला खोकला, सर्दी किंवा जलद श्वासोच्छ्वासाची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. यासाठी आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका (ANM), सामुदायिक आरोग्य अधिकारी (CHO) किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावेत. उपचार सुरू असतानाही स्तनपान आणि पूरक आहार बंद करू नये. 

न्यूमोनिया वरील उपचारांसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

नांदेड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, आयुष्मान आरोग्य मंदिर (आरोग्य वर्धिनी केंद्रे) आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये न्यूमोनियाच्या निदान व उपचारासाठी आवश्यक औषधे आणि उपकरणांची उपलब्धता ठेवण्यात आली आहे. बालकांच्या उपचारासाठी अॅमॉक्सिसिलीन सिरप व गोळ्या तसेच आवश्यकतेनुसार जेंटामायसिन इंजेक्शन उपलब्ध ठेवण्यात आले आहे. 

बालकांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यासाठी पल्स ऑक्सिमीटर, श्वसनासंबंधी उपचारासाठी नेब्युलायझर आणि गरजेनुसार ऑक्सिजनची सुविधाही उपलब्ध आहे. याशिवाय आशा स्वयंसेविका मार्फत गृहभेटी देऊन HBNC व HBYC कार्यक्रमांतर्गत बालकांची आरोग्य तपासणी आणि मातांचे समुपदेशन केले जात आहे.

 पालकांनी आरोग्य विभागाच्या मोहिमेला सहकार्य करावे

न्यूमोनियाची लक्षणे वेळीच ओळखून योग्य वेळी उपचार सुरू करणे हे बालकांचे प्राण वाचविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे पालकांनी बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता नियमित लसीकरण पूर्ण करावे, आशा स्वयंसेविकांच्या गृहभेटींचा लाभ घ्यावा आणि बालकांमध्ये आजाराची लक्षणे दिसताच वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत २३ योजनांसाठी महाडीबीटी २.० प्रणालीवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

जिल्ह्यातील पात्र मत्स्यव्यावसायिकांनी जास्तीत जास्त अर्ज करण्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांचे आवाहन

नांदेड, दि. १३ नोव्हेंबर : मत्स्यव्यावसायिकांचे जीवनमान उंचावणे, आर्थिक समृद्धी साधणे, रोजगार व उद्योजकतेला चालना देणे तसेच मत्स्यव्यवसायातून शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनामार्फत मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध २३ योजनांसाठी महाडीबीटी २.० प्रणालीवर ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पात्र मत्स्यव्यावसायिक, मच्छीमार, मत्स्यकास्तकार तसेच मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था पदाधिकारी, सभासदांनी जास्तीत जास्त ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय नांदेड कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते २८ ऑक्टोबर २०२६ रोजी महाडीबीटी २.० प्रणालीवर अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनांमध्ये भूजलाशयीन मत्स्यव्यवसायासाठीच्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनांचा समावेश असून पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे.

याशिवाय मच्छीमारांना मासेमारी परवाना वितरणाची सेवाही ऑनलाइन करण्यात आली आहे. या डिजिटल प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. उपलब्ध शासकीय डेटाबेसच्या आधारे लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच योजनेंतर्गत मंजूर होणारे अनुदान लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट ऑनलाइन जमा करण्यात येणार असून, संबंधित सेवांची प्रमाणपत्रेही ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

नांदेड जिल्ह्यातील सर्व पात्र मत्स्यकास्तकार, मच्छीमार, मत्स्यव्यावसायिक तसेच मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचे पदाधिकारी व सभासद यांनी https://mahadbt2.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आधार क्रमांकाच्या आधारे महा-आयडी तयार करावी आणि संबंधित योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.

अर्ज सादर करताना किंवा महा-आयडी तयार करताना काही अडचणी उद्भवल्यास सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) नांदेड कार्यालयाशी संपर्क साधावा. यासाठी कार्यालयात मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

संपर्कासाठी अधिकारी व दूरध्वनी क्रमांक 

क. वि. आचार्य, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी नांदेड – ८२९१८६८७९६.

अ. अ. वायचळकर, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय नांदेड – ९९२३३३९३१७.

कार्यालयाचा पत्ता 

सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), नांदेड यांचे कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत कौठा, शासकीय निवासस्थान, बिल्डिंग क्रमांक २, तळमजला, गट क्रमांक १२०, असर्जन पद्मजा सिटी रोड नवीन कौठा परिसर नांदेड ४३१६०३. कार्यालयीन ई-मेल : acfnanded@gmail.com

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन मत्स्यव्यवसायाला आर्थिकदृष्ट्या सक्षम व अधिक शाश्वत बनविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी व शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेडचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय अ. अ. वायचळकर यांनी केले आहे.  

0000

  वृत्त  

आदिवासींचा स्वाभिमान वीर बाबुराव शेडमाके -डॉ.अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री

आदिवासी समाजासाठी अभिमान, आत्मसन्मान आणि हक्कांचे प्रतीक मानले जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे वीर बाबूराव शेडमाके. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे गोंडवाना क्षेत्रातील (सध्याचा चंद्रपूर-गडचिरोली परिसर) एक महान आदिवासी स्वातंत्र्यसेनानी आणि क्रांतिकारक म्हणून त्यांची ओळख आहे. तत्कालीन परिस्थितीचा विचार करता  इंग्रजाच्या अन्यायाने, त्यांच्या जुलूमशाहीने संपूर्ण भारतीय समाज त्रस्त झाला होता. अशा परिस्थितीमध्ये आदिवासी समाजही आपल्या हाल-अपेष्टा, गरीबी, दारिद्र्य या सगळ्या भस्मासुरामध्ये भरडला जात होता. शिवाय इंग्रजांच्या दबावाखाली अन्याय सहन करून जीवन व्यथित करत होता. इंग्रजांच्या विरुद्ध जाऊन बोलण्याची कोणीही हिम्मत करत नव्हते. मग त्यांच्या अन्यायाविरूद्ध आवाज उठवणे तर फार दूर होते. अशा परिस्थितीमध्ये आदिवासी समाजातून कोणी आवाज उठवणे म्हणजे हा एक चमत्कार किंवा दैवीरूप असलेला पुरुषच करेल अशी अवस्था होती. अशा परिस्थितीमध्ये वीर बाबुराव शेडमाके हे आदिवासींचे नेतृत्व करून आदिवासींवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पुढे आलेल एक नाव होत. 

आदिवासी समाजामध्ये जन्मलेला वीर पुरुष पहिल्यांदा लोकांच्या समोर आला. इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी वीर बाबुरावजी शेडमाकेनी आपली वज्रमूठ आवळली. आपल्या जीवाची पर्वा न करता आदिवासीवरील होणारा अन्याय आपणच थांबवला पाहिजे. यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. तत्कालीन आदिवासी समाज रानावनात, डोंगरदऱ्यात, जंगलामध्ये राहून आपले जीवन व्यतीत करत होता. अशा समाजाला भयमुक्त करण्यासाठी, त्या समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्या समाजाला पुढे येऊन आपलं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी वीर बाबुराव शेडमाके या आदिवासीच्या लढवय्या महान योद्धाने आदिवासींमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम केलं.

वीर बाबूराव शेडमाके यांचा जन्म १२ मार्च १८३३ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील किश्तपुर मोलमपल्ली या गावी झाला. वडिल पुल्लेसुर बापू आणि आई जुर्जाकुंवर यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. प्रतिकूल परिस्थिती असतांनाही त्यांनी रायपूर येथे आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. आणि जेव्हा इंग्रजाचा जुलूम वाढू लागला. तेव्हा आपले शिक्षण थांबवून परिस्थितीनरुप आदिवासींच्या पारंपारिक 'गोटूल' या प्रशिक्षण देणाऱ्या व्यवस्थेत प्रवेश घेतला. आणि तेथून मग युद्धकलेचे  त्यात धनुष्यबाण, तलवारबाजी आणि गनिमी कावा याचे प्रशिक्षण घेतले. दिवसेंदिवस इंग्रजी शासन व्यवस्थेचा जुलूम वाढतच गेला. त्यात आदिवासी समाज पार भरडला जात होता. 

इंग्रजांचे शोषण वाढतच चालले होते. त्यांच्या जुलूमशाहीने सगळा समाज त्रस्त झाला होता. भारतामध्ये संपूर्ण समाजामधून एक रोष व्यक्त होत होता. त्यात आदिवासी समाजावर चालवलेला अन्याय-अत्याचार आणि जुलूम हा तर अगदी पराकोटीला गेलेला होता. अशा परिस्थितीत आदिवासी समाजातून वीर बाबुराव शेडमाके यांच्या रूपाने उठावाची ठिणगी पेटली. आणि ती ठिणगी एक ज्वाला होऊन इंग्रजी सत्तेच्या विरूढ मोठा लढा उभा केला. जेव्हा १८५७ मध्ये संपूर्ण भारतामध्ये इंग्रजाविरुद्ध असंतोष निर्माण होवून, सगळीकडून उठाव निर्माण झाला. त्यावेळेस वीर बाबुराव शेडमाके हे २४ वर्षांचे तडफदार एक सळसळते रक्त होते. या जुलूमशाहीला मोडीत काढण्यासाठी त्यांनी विरोध करायला सुरवात केली. १८५७ मध्ये जेव्हा संपूर्ण देशात इंग्रजांविरुद्ध उठाव सुरू झाला. तेव्हा वीर बाबूराव शेडमाके यांनी चंद्रपूर (चांदागड) जिल्ह्यात आदिवासींना एकत्र केले. आदिवासी समाजातील तरुणांना एकत्र करून अन्यायाची जाणीव करून दिली. आणि त्यांना इंग्रजी जुलूमशाही विरूढ लढण्यासाठी तयार केले. त्यांनी २४ सप्टेंबर १८५७ रोजी 'जंगोम सेना' स्थापन केली. या जंगोम सेनेत तरुणांना सामील होण्यास प्रवृत्त केले. त्यांचे एकच ध्येय इंग्रजाचा बीमोड करणे. जंगोम सेनेत ५०० सैनिकांची तुकडी तयार करून त्यांना युद्धाचे प्रशिक्षण देवून तयार केले. या सेनेत केवळ आदिवासी युवकच नव्हते, तर रोहिले आणि इतर समाजाचे युवकही मोठ्या प्रमाणात सामील होते.

जंगोम सेनेच्या माध्यमातून वीर बाबुराव शेडमाके यांनी इंग्रजांविरुद्ध विविध लढाया करून त्यांना सळो की पळो केले. भारतीय समाजावर चालवलेला अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या जिवाची पर्वा कधीच केली नाही. त्यांनी इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या राजगड किल्ल्यावर ७ मार्च १८५८ रोजी हल्ला केला. त्या लढाईत इंग्रज सैनिकांना पळवून तो किल्ला आपल्या ताब्यात घेतला. या घटनेनंतर इंग्रज कॅप्टन क्रिक्टन यांनी मोठ्या संख्येने इंग्रजी फौज पाठवली. पण त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी वीर बाबूराव शेडमाके तयारच होते. त्यांनी आपल्या जंगोम सेनेला लढण्यास प्रवृत्त केले. जंगोम सेनेनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालून आलेल्या इंग्रज सैनिकांचा १३ मार्च १८५८ रोजी नांदगाव घोसरीच्या जंगलात पराभव केला. हा पराभव इंग्रजांचा नामोहरण करणारा ठरला. म्हणून इतर इंग्रज अधिकारी वेगवेगळ्या तुकड्याच्या माध्यमातून जंगोम सेनेला पराभूत करण्यासाठी आणि वीर बाबुराव शेडमाके यांना पकडून फाशीची शिक्षा करण्यासाठी सरसावले. वैनगंगा नदीच्या खोऱ्यात इंग्रज अधिकारी 'गार्टले' आणि 'हॉल' यांच्या तुकड्यांना चिमूर आणि घोट येथे जंगोम सेनेने गनिमी काव्याने सळो की पळो करून सोडले.

वीर बाबुराव शेडमाके यांचा लढा केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी नव्हता. तो मागासलेल्या अत्याचाराच्या ओझ्याखाली झुकलेल्या आदिवासी सामाजाच्या अस्तित्वाचा लढा होता. इंग्रजांनी बनवलेल्या जुलमी जंगल कायद्यांमुळे आदिवासींचे जंगलातील अधिकार हिरावले जात होते. जंगोम सेनेने आदिवासींच्या 'जल-जंगल-जमीन' या नैसर्गिक हक्कांचे रक्षण करण्यासाठी उठवलेला लढा होता. इंग्रजांच्या जुलमी कराविरुद्ध उचललेला सामाजिक उठाव होता. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. हा त्यांचा विचार आजच्या समाजात रुजणे गरजेचे आहे. समाजात त्यांच्या विचाराची पेरणी होणे गरजेचे आहे. 

प्रत्येक वेळी वीर बाबुराव शेडमाके यांनी आणि त्यांच्या जंगोम सेनेपुढे इंग्रज सैनिक पराभूत होत होते. जंगोम सेनेची युद्धनीती ही जंगलात, नदीच्या परिसरात वेगवेगळ्या मार्गाने धूळ चारत होती. वीर बाबुराव यांना समोरासमोरील युद्धात पराभूत करणे इंग्रजांना अशक्य झाले होते. इंग्रजांनी शेवटी फितुरीचा मार्ग निवडला. पैशाला विकले जाणारे व्यक्ती शोधू लागले. त्याच उद्देशाने इंग्रज अधिकारी कॅप्टन क्रिक्टन याने त्यांच्यावर १,००० रुपयांचे बक्षीस ठेवले. अखेर अंतर्गत फितुरीतून त्यांचा घात झाला. अहेरीच्या तत्कालीन जमीनदार राणी लक्ष्मीबाई इंग्रजाच्या मोहाला बळी पडल्या. त्यांनी विश्वासघात करून फितुरीने १८ सप्टेंबर १८५८ रोजी वीर बाबूराव शेडमाके यांना भोपाळ पट्टणम येथून अटक करण्यात आली.

समाजाच्या हितासाठी अविरत लढा देणाऱ्या वीर महापुरुषास समाजातीलच लालची, फितूर लोकांकडूनच घात झाला. त्यांची चूक एकच झाली की, त्यांनी लोकांच्या समस्यासाठी लढताना लोकांवर उदार मनाने विश्वास ठेवला. त्यांच्या त्या अंध विश्वासाने लोकांकडूनच घात झाला. त्यांना साखळदंडात बांधून चंद्रपूरच्या तुरुंगात आणण्यात आले. भारतीय लोकांना एकजूट करून इंग्रजांविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून इंग्रजांच्या विशेष न्यायालयाने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवला. त्यांना भीती निर्माण झाली होती की, वीर बाबुराव शेडमाके यांना आपण जर जीवंत सोडले तर लोक हळूहळू विद्रोह करायला लागतील. शेवटी आपली सत्ता पोकळ करून पूर्णपणे ढासळेल. हे जर थांबवायचे असेल तर त्यांना खुलेआम फाशी द्यावी लागेल. असे केल्याने लोक परत इंग्रज सत्तेविरुद्ध विद्रोहाची हिम्मत करणार नाहीत. अखेर २१ ऑक्टोबर १८५८ रोजी वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी चंद्रपूर जिल्हा कारागृहाच्या बाहेरील एका पिंपळाच्या झाडावर त्यांना फाशी देण्यात आली.

आदिवासी समाजातील धगधगती आग शमवण्यास अखेर इंग्रज सरकारला यश आले. वंचिताची हिम्मत, निराधारांचा आधार, शोषितांचा आवाज, जुलमी यांचा कर्दनकाळ, इंग्रजांना स्वप्नातही भयभीत करणारा त्यांचा काळ आणि अन्यायाच्या विरोधात धगधगणारी मशाल अखेर विझली. पण आजही क्रांतिवीर बाबूराव पुल्लेसुर शेडमाके यांच्या कार्याचा परधान आणि गोंड संस्कृतीशी जोडलेल्या लोकगीतांमध्ये उल्लेख अत्यंत आदराने केला जातो. त्यांच्या शौर्यामुळे आदिवासी समाजाने त्यांना 'वीर' ही पदवी दिली. भारत सरकारनेही त्यांच्या शौर्याची दाखल घेवून १२ मार्च २००९ रोजी वीर बाबूराव शेडमाके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक विशेष टपाल तिकीट जारी केले. चंद्रपूर जिल्ह्याच्या तुरुंगासमोरील ज्या पिंपळाच्या झाडावर त्यांना फाशी दिली गेली. त्या ठिकाणी आजही पवित्र शहीद स्मारक म्हणून दरवर्षी १२ मार्च (जयंती) आणि २१ ऑक्टोबर (शहीद दिन) रोजी संपूर्ण आदिवासी बांधव एकत्र येऊन त्यांना आदरांजली वाहतात. परधान समाजातील लोकगीतांच्या माध्यमातून आजही वीर बाबूराव शेडमाके आणि जंगोम सेनेचा इतिहास पिढ्यानपिढ्या जिवंत ठेवला आहे. 

0000

  #भगवानबिरसामुंडा #आदिवासीविकास #महाराष्ट्रशासन #MahaDGIPR