Thursday, July 23, 2026

वृत्त क्रमांक 

मतदारांनी गणना पत्र विहित मुदतीत बीएलओंकडे जमा करावे - डॉ. सचिन खल्लाळ

‘विशेष सखोल पुनर्निरक्षण’ (SIR) अनुषंगाने राजकीय पक्षाचे प्रतिनिधीसोबत सोबत बैठक 

नांदेड, दि. 23 जुलै :- भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनर्निरक्षण (Special Intensive Revision-SIR) कार्यक्रमांतर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी 22 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली.

बैठकीत आतापर्यंत बीएलओंमार्फत वितरित करण्यात आलेले गणना पत्र (Enumeration Form), प्राप्त झालेले गणना पत्र तसेच डिजिटायझेशनच्या प्रगतीची माहिती उपस्थित प्रतिनिधींना देण्यात आली.

मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सांगितले की, मतदारसंघात आजअखेर गणना पत्र वाटपाचे 86 टक्के, डिजिटायझेशनचे 67 टक्के काम पूर्ण झाले असून, एकूण 72 टक्के प्रगती झाली आहे.

ज्या मतदारांना बीएलओंकडून गणना पत्र प्राप्त झाले आहे, त्यांनी भरलेले व स्वाक्षरी केलेले गणना पत्र विहित मुदतीत संबंधित बीएलओंकडे जमा करावे. गणना पत्र वेळेत जमा करणाऱ्या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील. मात्र, विहित मुदतीत गणना पत्र जमा न करणाऱ्या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काही मतदारांची नावे Anomaly मध्ये दर्शविण्यात आली आहेत किंवा त्यांची नावे 2002 च्या मतदार यादीत उपलब्ध नसल्याने अशा मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशा मतदारांनी कोणतीही भीती न बाळगता गणना पत्र भरून द्यावे. त्यांच्या प्रकरणांची 8 ऑगस्ट 2026 नंतर संबंधित सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे सुनावणी घेण्यात येणार असून, भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या 12 पुराव्यांपैकी कोणताही एक वैध पुरावा सादर करण्याची संधी त्यांना दिली जाईल. वैध पुरावा सादर करणाऱ्या मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील.

तसेच, 8 ऑगस्टनंतर नवीन मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू होणार असून, सदर कार्यक्रमा अंतर्गत नवमतदारांनी या यादीत नाव नोंदवावे व या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. पत्त्यात बदल करावयाचा असल्यास संबंधित मतदारांनी प्रथम सध्याच्या पत्त्यावर गणना पत्र भरून जमा करणे आवश्यक असून, त्यानंतर फॉर्म क्रमांक 8 द्वारे पत्त्यात दुरुस्ती करता येईल, अशी माहिती डॉ. खल्लाळ यांनी दिली.

बैठकीस सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार संजय वारकड, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा नायब तहसीलदार (निवडणूक) नितेशकुमार बोलोलु, नायब तहसीलदार संजय नागमवाड तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

00000




वृत्त क्रमांक 

नांदेड दक्षिण मतदारसंघात 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान अभियान' 

शिबिरास अमृत संस्थेच्या स्टॉलला लाभार्थ्यांची गर्दी

नांदेड, दि. २३ जुलै : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून उपविभागीय कार्यालयाच्या वतीने काल 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान अभियान' अंतर्गत विशेष शासकीय सेवा शिबिराचे आयोजन ओम गार्डन, कौठा (नांदेड दक्षिण मतदारसंघ) येथे करण्यात आले.

या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांचे माहिती व सेवा स्टॉल उभारण्यात आले होते. नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय योजनांची माहिती, अर्ज भरण्याची सुविधा आणि योजनांचा लाभ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

या महत्त्वपूर्ण शिबिरासाठी अमृत संस्थेला विशेष निमंत्रण देण्यात आले होते. अमृत संस्थेच्या स्टॉलद्वारे अमृत च्या विविध योजना, स्वयंरोजगाराच्या संधी तसेच विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यात आली. यासोबतच डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून अमृत संस्थेच्या विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

आमदार हेमंत पाटील, नांदेड दक्षिणचे आमदार आनंद बोंढारकर, महापौर कविता मुळे, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ , तहसीलदार संजय वारकड यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सौरभ कुलकर्णी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच अमृत संस्थेच्या EDP प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करून गौरविण्यात आले.

शिबिरादरम्यान उपस्थित मान्यवरांनी अमृत संस्थेच्या स्टॉलला भेट देऊन संस्थेच्या कार्याची माहिती जाणून घेतली. स्टॉलवर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी भेट देत विविध योजनांची माहिती घेतली, अनेक लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली तसेच विविध योजनांचे अर्जही भरून घेण्यात आले.

या कार्यक्रमात अमृत नांदेड टीमचे जिल्हा व्यवस्थापक सौरभ कुलकर्णी, जिल्हा उपव्यवस्थापक(DEO) विश्वेश्वर जोशी, अमृत सखी श्रीमती मनीषा कुणसावळीकर, संगणक सखी ऋतिका, संजना तसेच आशिष पांडे आणि चिन्मय पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रम अत्यंत यशस्वी व उत्स्फूर्त वातावरणात पार पडला. या माध्यमातून अमृत संस्थेच्या विविध योजना, प्रशिक्षण उपक्रम आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मोठ्या प्रमाणावर नागरिकांपर्यंत पोहोचली आणि लाभार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळाला.

000000






वृत्त क्रमांक 

जिल्ह्यातील सोयाबीन बियाणे उगवण तक्रारी व अप्रमाणित नमुने प्रकरणी

सहा कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल

नांदेड, दि. 23 जुलै :- खरीप हंगाम 2026 साठी जिल्ह्यात 4 लाख 56 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे नियोजन प्रस्तावित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्ह्यातील बियाणे निरीक्षकांना सोयाबीन बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

या अनुषंगाने जिल्ह्यातील बियाणे निरीक्षकांनी सोयाबीनचे 751 नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अप्रमाणित नमुन्यांच्या अहवालांच्या आधारे तसेच बियाणे उगवण न झाल्याबाबत प्राप्त तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीमार्फत पाहणी करण्यात आली. या पाहणीत बियाण्यांमध्ये दोष आढळून आल्याने संबंधित बियाणे उत्पादक व पुरवठादार कंपन्यांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955, बियाणे अधिनियम, 1966 मधील कलम 6, 7, 19, 21, बियाणे नियम, 1968 मधील नियम 23 तसेच भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 318(2) अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुन्हे दाखल करण्यात आलेल्या कंपन्याची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 

बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रा. लि., गेवराई बाजार, ता. बदनापूर, जि. जालना, पार्श्व जेनेटिक्स इंडिया, पेटलावाड, जि. झाबुआ (मध्य प्रदेश), रवी सीड्स अँड रिसर्च प्रा. लि., इंदौर (मध्य प्रदेश), एस.के.बी. सीड्स प्रा. लि., जानकी नगर, इंदूर (मध्य प्रदेश),  एशियन सीड्स प्रा. लि., इंदौर, दप्तरी ॲग्रो प्रा. लि., ता. सेलू, जि. वर्धा या कंपन्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे जिल्हा परिषदेचे कृषि अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे यांनी दिली आहे. 

ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, कृषी संचालक (निरीक्षण व गुणवत्ता नियंत्रण) श्री. बोरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड सचिन कपाळे आणि जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अमोल पेकम यांनी सहकार्य केले असून संबंधित तालुका बियाणे निरीक्षकांनी ही कारवाई केली आहे.

00000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६


 

वृत्त क्रमांक 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

पात्र लाभार्थ्यांच्या याद्या लवकरच प्रसिद्ध होणार
लाभार्थ्यांनी नाव, कर्ज तपशील तपासून आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 23 जुलै :- महाराष्ट्र शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६” अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांच्या याद्या लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
या अनुषंगाने जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, संबंधित याद्या गाव चावडी, ग्रामपंचायत, बँकांच्या शाखा, आपले सरकार सेवा केंद्र तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्था येथे उपलब्ध करून देण्यात येतील. याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांनी त्यामध्ये आपले नाव समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच कर्जखाते क्रमांक व कर्जाची रक्कम यासह सर्व तपशील अचूक असल्याची पडताळणी करावी.
यादीतील विशिष्ट क्रमांक घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जावे. तेथे केंद्र चालकास हा क्रमांक देऊन आधार प्रमाणीकरण (बायोमेट्रिक) करून घ्यावे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅक (AgriStack) नोंदणी पूर्ण केलेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी.
लाभार्थी यादीतील आधार क्रमांक, कर्जखाते क्रमांक व कर्जाची रक्कम याबाबत सहमती दर्शविल्यानंतर बायोमेट्रिक पद्धतीने प्रमाणीकरण करावे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मंजूर लाभाची रक्कम संबंधित बँकेच्या कर्ज खात्यात जमा करण्यात येईल.
जिल्ह्यातील पात्र व लाभार्थी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांनी केले आहे.
०००००

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

वृत्त क्रमांक   मतदारांनी गणना पत्र विहित मुदतीत बीएलओंकडे जमा करावे - डॉ. सचिन खल्लाळ ‘विशेष सखोल पुनर्निरक्षण’ (SIR) अनुषंगाने राजकीय पक्ष...