Sunday, March 8, 2026

 वृत्त क्रमांक  

राष्ट्रीय हळद बोर्ड व स्पायसेस बोर्ड इंडिया तर्फे नांदेड येथे हळद विषयक खरेदीदार–विक्रेता मेळाव्याचे आयोजन 

हळद शेतकऱ्यांसाठी निर्यात गुणवत्ता, एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) पद्धती आणि थेट बाजारपेठ जोडणीवर भर

नांदेड, दि. ८ मार्च :-हळद मूल्यसाखळी मजबूत करण्यासाठी आणि निर्याताभिमुख उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून, भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय हळद बोर्ड (NTB) व स्पायसेस बोर्ड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ०९ मार्च २०२६ रोजी हॉटेल VITS, नांदेड येथे हळद विषयक खरेदीदार–विक्रेता मेळावा (Buyer–Seller Meet – BSM) आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र हे भारतातील हळद उत्पादनासाठी महत्त्वाचे राज्य असून नांदेड, हिंगोली तसेच आसपासच्या जिल्ह्यांना उच्च दर्जाच्या हळदीसाठी राष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख प्राप्त झाली आहे. वायगाव, सांगली व वसमत या प्रसिद्ध GI-टॅग प्राप्त हळद प्रकारांमुळे या भागाला विशेष महत्त्व आहे. या खरेदीदार–विक्रेता मेळाव्याचा उद्देश शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs), निर्यातदार, व्यापारी, प्रक्रिया उद्योग प्रतिनिधी, वैज्ञानिक व धोरणकर्ते यांना एका व्यासपीठावर एकत्र आणून थेट बाजारपेठ जोडणी निर्माण करणे आणि जागतिक बाजारपेठेच्या निकषांनुसार दर्जेदार हळद उत्पादनाला प्रोत्साहन देणे हा आहे.

या कार्यक्रमास आमदार हेमंत पाटील, अध्यक्ष मा. बाळासाहेब ठाकरे हरीद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र, हिंगोली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच डॉ. इंद्रमणी, कुलगुरू – वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV), परभणी आणि जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या राष्ट्रीय दृष्टीकोनाला अधिक बळकटी देण्यासाठी श्रीमती एन. भवानी सचिव – राष्ट्रीय हळद बोर्ड, या प्रमुख भाषण (Keynote Address) देणार असून भारतातील हळद क्षेत्राच्या प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या धोरणात्मक उपक्रमांवर प्रकाश टाकणार आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी व उद्योग विभागातील वरिष्ठ अधिकारी व तज्ञही या कार्यक्रमात सहभागी होऊन हळद शेतकरी व कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांविषयी माहिती देतील.

या मेळाव्यातील तांत्रिक सत्रांमध्ये सेंद्रिय पद्धतीने हळद लागवड, एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM), निर्यात दर्जा निकष, अवशेष मर्यादा पालन (Residue Compliance), कापणीनंतरचे व्यवस्थापन (Post-Harvest Management) तसेच जागतिक बाजारपेठेतील नवीन संधी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांचे सादरीकरण होणार आहे. तसेच प्रगतिशील शेतकऱ्यांकडून त्यांच्या अनुभवांचे सादरीकरण करून शाश्वत शेती व बाजारपेठेतील सहभागाबाबत मार्गदर्शन दिले जाईल.

कार्यक्रमातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे खरेदीदार–विक्रेता संवाद सत्र, ज्यामध्ये निर्यातदार, व्यापारी, प्रक्रिया उद्योग प्रतिनिधी व शेतकरी उत्पादक कंपन्या थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून गुणवत्ता निकष, खरेदी संधी, किंमत निर्धारण आणि दीर्घकालीन पुरवठा व्यवस्था यावर चर्चा करतील.

या उपक्रमाद्वारे राष्ट्रीय हळद बोर्ड (NTB) हळद उत्पादनातील निर्यातमानकांबाबत जागरूकता वाढविणे, शेतकरी व उद्योग यांच्यातील संबंध अधिक मजबूत करणे तसेच महाराष्ट्रातील हळद उत्पादकांना मूल्यवर्धन व बाजारपेठ उपलब्ध करून देणे यासाठी प्रयत्नशील आहे. यामुळे भारताला उच्च दर्जाच्या मसाला निर्यातीमध्ये जागतिक नेतृत्व मिळविण्याच्या उद्दिष्टाला चालना मिळेल.

हा कार्यक्रम ०९ मार्च २०२६ रोजी सकाळी ०९:३० वाजता सुरू होणार असून हळद मूल्यसाखळीतील सर्व संबंधित घटकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

सिमांत सैकिया – उपसंचालक, स्पायसेस बोर्ड इंडिया, प्रादेशिक कार्यालय मुंबई

डॉ. ममता धनकुटे – सहाय्यक संचालक, स्पायसेस बोर्ड इंडिया, प्रादेशिक कार्यालय मुंबई

०००००

 वृत्त क्रमांक  

जागतिक महिला दिनानिमित्त बाल विकास प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम

उत्कृष्ट अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा प्रथमच गौरव

नांदेड, दि. ८ मार्च :- जागतिक महिला दिनानिमित्त बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी प्रकल्प (नांदेड शहर) यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 

यावर्षी प्रथमच प्रत्येक अंगणवाडी बीटमधून एक उत्कृष्ट सेविका व एक उत्कृष्ट मदतनीस यांची निवड करून सन २०२५–२६ च्या उत्कृष्ट सेविका व उत्कृष्ट मदतनीस पुरस्काराने गौरविण्यात आले.

या पुरस्काराचे स्वरूप शाल, प्रमाणपत्र व मानचिन्ह असे होते. पुरस्कारांचे वितरण ॲड. बियाणी मॅडम व बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. कैलास तिडके यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या ॲड. बियाणी मॅडम यांनी महिलांनी दैनंदिन जीवनात शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणे किती आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले. आज महिलांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले असून आत्मविश्वासाच्या बळावर त्या अशक्य वाटणारी कामेही समर्थपणे पार पाडत आहेत, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. कैलास तिडके यांनी पुरस्कार विजेत्या सर्व सेविका व मदतनीसांचे अभिनंदन करून अंगणवाडीतील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

त्यानंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत यावर्षात आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्या अंगणवाडीतील लाभार्थी व पालकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

हा कार्यक्रम बौद्ध विहार (देगाव चाळ), नांदेड येथे पार पडला. कार्यक्रमाला प्रकल्पातील सर्व सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे संचालन शततारका कातकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती गुंडारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती पेंदे, श्रीमती शिसोदे, श्रीमती राहेगावकर, श्रीमती खिराडे, श्रीमती ढोले, श्री आऊलवार, श्री बनसोडे व श्री खूपसे यांनी सहकार्य केले.

000000




  वृत्त क्रमांक  

8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिना निमीत्त "अस्मिता महिला लीग" स्पर्धेकरीता जिल्हयातील मुली व महिला खेळाडूंचा उत्सफुर्त प्रतिसाद " 

नांदेड दि. ८ मार्च:- भारत सरकार, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय (MYAS) यांचेकडून प्राप्त पत्रानुसार आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त "अस्मिता महिला लीग" आयोजनासंबंधी मानक कार्यपद्धती (SOP) निर्गमित करण्यात आली होती.

त्या अनुषंगाने भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI), फिट इंडिया, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, खेलो इंडिया, माय भारत, युवा कार्य, क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विदयमाने व सांयन्स कॉलेज,नांदेड यांच्या सहकार्याने दिनाक 08 मार्च,2026 रोजी “आंतरराष्ट्रीय महिला दिना निमीत्त” "अस्मिता महिला लीग" स्पर्धाचे आयोजन सांयन्स कॉलेज मैदान, नांदेड करण्यात आले होते.

याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन मा.डॉ.अश्विनी जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी (गृह) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन मा.श्री.जयकुमार टेंभरे, जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड, मा.श्रीमती चंदा रावळकर, जिल्हा युवा अधिकारी, माय भारत भारत सरकार, मा.श्री.प्रलोभ कुलकर्णी, नांदेड जिल्हा हौशी ॲथलेटिक संघटना, मा.श्रीमती शिवकांता देशमुख, राज्य क्रीडा मार्गदर्शक, मा.डॉ.अश्विन बोरीकर, क्रीडा संचालक, सांयन्स कालेज, नांदेड, मा.श्री.संजय बेतीवार, क्रीडा अधिकारी, मा.श्री.राहुल श्रीरामवार, क्रीडा अधिकारी, मा.श्री.नागनाथ डांगे, सेवानिवृत्त तहसिलदार धाराशिव आदी मान्यवर उपस्थित होते. तर विजेत्या खेळाडूंना मा.डॉ.एल.पी.शिंदे, प्राचार्य, सायंन्स कॉलेज,नांदेड यांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.

​उदघाटनीय कार्यक्रम मनोगत प्रसंगी डॉ.अश्विनी जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी (गृह) यांनी उपस्थित खेळाडूंना महिला हया प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असून शासनामार्फत प्रत्येक क्षेत्रामध्ये मुक्त व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्याप्रमाणे आपल्या सवयीमध्ये बदल करुन प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. 

​“आंतरराष्ट्रीय महिला दिना निमीत्त” "अस्मिता महिला लीग" यामध्ये जिल्हयातील 150 ते 200 मुली व महिला खेळाडूंनी सहभाग घेतला असून त्याचा अंतिम अंतिम निकाल खालीलप्रमाणे आहे.

13 वर्षाआतील -100 मी.धावने- प्रथम, सई बालाजी पतंगे- शाकुंतल इं.मे.स्कुल, नांदेड, द्वितीय- संगीता बबन मटके- जि.प.प्रा.शा.पार्डी ता.लोहा,  तृतीय- संधीती गजानन डिकळे- जि.प.प्रा.शा. पार्डी

200 मी.धावने- प्रथम- शुभश्री बळीराम पवार- जि.प.प्रा.शा.पार्डी, द्वितीय- सई बालाजी पतंगे- शाकुंतल इं.मे.स्कुल, नांदेड, तृतीय- कोमलकोट रामसिंग बावरे- अशोक प्र.विदयालय, विष्णुनगर, नांदेड

400 मी.धावने- प्रथम- वेदिका विश्वनाथ मोखले- जि.प.प्रा.शाळा,पार्डी, द्वितीय- कोमलकौर बावरी- अशोक प्रा. विदयालय, विष्णुनगर, नांदेड, तृतीय- जागृती मिलींग गजभारे- सचखंड पब्लिक स्कुल, नांदेड

13 ते 18 वर्षाआतील -100 मी.धावने- प्रथम, श्रेया संजय सुदेवाड-शासकीय आश्रमशाळा,दुधड ता.हि.नागर, द्वितीय- मुक्ताई परमेश्वर इजेपवार, शासकीय आश्रमशाळा,दुधड तृतीय- ओमीका किरण पाटील- पिपल्स हायस्कुल, नांदेड

200 मी.धावने- प्रथम- श्रेया संजय सुदेवाड-शासकीय आश्रमशाळा,दुधड ता.हि.नागर, द्वितीय- श्रृध्दा बालाजी कुलुपवार, के.आर.एम.ज्यु.कॉलज,नांदेड, तृतीय- आरती पवार- श्री संत गाडगे महा वि. लोहा

400 मी.धावने- प्रथम- श्रृध्दा बालाजी कुलुपवार, के.आर.एम.ज्यु.कॉलज,नांदेड, द्वितीय- श्रृध्दा परमेश्वर मुंडकर- पीएम श्री केंद्रीय विदयालय, नांदेड, तृतीय- वनिता संतोष कल्याणकर- जिल्हा परिषद हायस्कुल, बारड ता.मुदखेड

18 वर्षापुढील मुली व महिला -100 मी.धावने- प्रथम, तेजस्विनी संघरत्न कांबळे- सायंन्स कॉलेज, नांदेड द्वितीय- पालनवार प्रियंका संतोष, शांतीनिकेतन हाय, कुंटूर, तृतीय- प्रिती बालाजी- डी.बी.कॉलेज, भोकर ता.भोकर

200 मी.धावने- प्रथम- स्वाती रामभाडफ ठोंम्बरे- डी.एस.एम.कॉलेज, परभणी, द्वितीय- तेजस्विनी संघरत्न कांबळे- सायंन्स कॉलेज, नांदेड, तृतीय- विदया बालाजी खरबे, बळीराम पाटील विदयालय, पेणूर ता.लोहा

400 मी.धावने- प्रथम- अश्विनी लोकडोबा कस्तुरे, कृष्णा विदयालय, सिंधी ता.उमरी, द्वितीय- तेजस्विनी संघरत्न कांबळे- सायंन्स कॉलेज, नांदेड, तृतीय- कोमल विश्वनाथ गाडगे- सायंन्स कॉलेज, नांदेड

​या स्पर्धेकरीता पंच प्रमुख म्हणुन श्री.प्रलोभ कुलकर्णी हे होते तर पंच म्हणुन श्री.वैभव दोमकोंडवार, श्री.ज्ञानेश्वर सोनसळे, श्री. अजय राठोड, श्री.गणेश उदाडे आदीनी काम केले. तर कार्यक्रमाचे आभार डॉ.अश्विन बोरीकर यांनी मानले.

सदर कार्यक्रम यशस्वी करणेकरीता मा. जयकुमार टेंभरे, जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी श्री. विजय काकडे, क्रीडा अधिकारी श्री.संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, श्रीमती शिवकांता देशमुख, (क्रीडा अधिकारी) राहुल श्रीरामवार, विपुल दापके, श्रीमती रुपाली मुधोळकर, जिल्हा संघटक गाईड, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे, रोहीणी घंटेवाड संजय चव्हाण, सुभाष धोंगडे, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे, माय भारत, युवा कार्य, क्रीडा मंत्रालय, भारत सरकार चे अधिकारी/कर्मचारी, नांदेड जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेचे खेळाडू आदि सहकार्य केले असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी कळविले आहे.

००००००






 वृत्त क्रमांक  

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय 'एचपीव्ही' (HPV) लसीकरण मोहिमेचे उत्साहात उद्घाटन

नांदेड, दि.८ मार्च:- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणाऱ्या 'एचपीव्ही' (HPV) लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र, मुगट (ता. मुदखेड) येथे अत्यंत उत्साहात करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली  यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत आहे.

या विशेष मोहिमेचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी १४ ते १५ वयोगटातील किशोरवयीन मुलींना लस देऊन मोहिमेचा प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला गावातील नागरिक, महिला, विद्यार्थिनी, आरोग्य कर्मचारी आणि विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गैरसमज दूर करण्याचे आवाहन

उद्घाटनानंतर मार्गदर्शन करताना डॉ. संगीता देशमुख यांनी महिला व पालकांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की:

"HPV लस ही पूर्णपणे सुरक्षित असून मुलींचे भविष्य सशक्त बनवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पालकांनी कोणत्याही अफवा, अंधश्रद्धा किंवा गैरसमजांना बळी पडू नये. आपल्या मुलींच्या सुरक्षित आरोग्यासाठी ही लस घेण्यास पुढे यावे."

मोहिमेची ठळक वैशिष्ट्ये:

 * उद्दिष्ट: जिल्ह्यातील एकूण २७ हजार मुलींना ही लस देण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे.

 * वयोगट: १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींचे लसीकरण करण्यात येत आहे.

 * नियोजन: जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम गावपातळीवर राबवली जात आहे.

सहभाग आणि सत्कार

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुगट येथील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांनी विशेष परिश्रम घेतले. महिला दिनाचे औचित्य साधून उपस्थित महिला व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.


या मोहिमेमुळे जिल्ह्यातील हजारो मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळणार असून, आरोग्य विभागातर्फे हे एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

 ००००००



वृत्त क्रमांक  

तरुणाईत नवचैतन्य निर्माण करणारा क्रीडा महोत्सव-श्यामसुंदर कदम 

नांदेड येथील घटक कृषी तंत्र विद्यालय येथे जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव संपन्न

नांदेड, दि. 8 मार्च :-घटक कृषी तंत्र विद्यालय येथे करण्यात आले होते , या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलत असताना प्रमुख पाहुणे श्याम सुंदर कदम, संचालक गोविंदराव पोळ कृषी तंत्र विद्यालय, बन चिंचोली यांनी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ प्रा. इंद्रमनी, विद्यापीठाचे संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता कृषी डॉ. भगवान असेवार व विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता शिक्षण डॉ गजेंद्र लोंढे यांचे मनःपूर्वक ऋण व्यक्त करून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासात मदत करणारा व त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण करणारा क्रीडा महोत्सव नांदेडच्या मध्यवर्ती घटक कृषी तंत्र विद्यालय आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. प्रसंगी बोलत असताना त्यांनी पुढे सदर क्रीडा प्रकाराचे आयोजन हे शिक्षणासोबत अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ .शिवाजी शिंदे संयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य कृषी महाविद्यालय गोळेगाव हे होते तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी कुठल्या न कुठल्या खेळाची आवड जोपासणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत अध्यक्षीय समारोपात बोलत असताना व्यक्त केले. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य घटक कृषी तंत्र विद्यालय नांदेड डॉ .नरेश कुमार जायेवार यांनी केले. 

सदर प्रास्ताविकामध्ये क्रीडा महोत्सव आयोजित करण्यामागे असणारी  कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ इंद्रमणी सर, शिक्षण तथा अधिष्ठाता कृषी डॉ भगवान असेवार सर व सहयोगी अधिष्ठाता शिक्षण डॉ. गजेंद्र लोंढे यांची प्रेरणा व पार्श्वभूमी विषद केली. सदर कार्यक्रमासाठी नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र चे प्रभारी अधिकारी डॉ अरविंद पांडागळे तसेच केळी संशोधन केंद्र येथील सहाय्यक उद्यानविद्याविता डॉ.सुजाता धूतराज व अजगर अली अध्यक्ष कबड्डी असोसिएशन नांदेड हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते. या क्रीडा महोत्सवाची सुरुवात ही पतसंचलनाने करण्यात आली, जात एकूण नांदेड जिल्ह्यातील सात कृषी तंत्र विद्यालयाचे संघ सहभागी झाले होते. 

क्रीडा महोत्सवातील क्रीडा स्पर्धांची सुरुवात ही कबड्डी सामन्याने करण्यात आली या प्रकारात बन चिंचोली येथील संघ हा विजेता तर भोकर कृषी तंत्र विद्यालयाचा संघ उपविजेता ठरला यानंतर खो खो स्पर्धेचे सामने घेण्यात आले ज्यात कृषी तंत्र विद्यालय बंद चिंचोली हा संघ विजेता तर कृषी तंत्र विद्यालय नांदेड हा संघ उपविजेता ठरला यानंतर व्हॉलीबॉल चे सामने घेण्यात आले जात कृषी तंत्र विद्यालय भोकर चा संघ विजयी ठरला तर कृषी तंत्र विद्यालय लोहा चा संघ उपविजेता ठरला. मुलींच्या सांघिक स्पर्धेमध्ये रस्सीखेच या क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला होता ज्यात कृषी तंत्र विद्यालय नांदेड येथील संघ विजेता तर कृषी तंत्र विद्यालय वळग येथील संघ उपविजेता  ठरला. या क्रीडा स्पर्धेच्या सांघिक खेळानंतर दिनांक पाच मार्च 2026 रोजी संगीत रजनीचे देखील आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध कलागुणांचे सार्थ प्रदर्शन केले. यानंतर दिनांक 6 मार्च रोजी व्यक्तिगत क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते ज्यात 100 मीटर धावणे 200 मीटर धावणे गोळा फेक लांब उडी तसेच मुलींचे 100 मीटर धावणे 200 मीटर धावणे संगीत खुर्ची टिपक्याची रांगोळी ह्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या क्रीडा महोत्सवाचा समारोप पारितोषिक  वितरणाच्या कार्यक्रमाने करण्यात आला. दोन दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवामध्ये एकूण 250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री प्रकाश शिंगरवाड, वरिष्ठ संशोधन सहाय्यक कृषी तंत्र विद्यालय नांदेड, श्री.विजेश जाधव कनिष्ठ संशोधन सहाय्यक कृषी तंत्र विद्यालय नांदेड, स्वाती ताटपल्लेवार, वरिष्ठ लिपिक, श्रीमती महानंदा उत्तरवार वरिष्ठ लिपिक, कृषी तंत्र विद्यालय नांदेड यांनी विशेष प्रयत्न केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी महाविद्यालय नांदेड येथील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी कुमारी प्रणिता बल्लेवाड व पोकळे यांनी केले तर आभार प्राचार्य डॉक्टर नरेश कुमार जायवार यांनी मानले.

0000000









  वृत्त क्रमांक   दर्जा , ट्रेसेबिलिटी आणि मूल्यवर्धनावर भर दिल्यास निर्यात संधी अधिक वाढतील -   सचिव एन. भवानीश्री   शेतकऱ्यांना थेट बा...