Sunday, March 8, 2026

 वृत्त क्रमांक  

राष्ट्रीय हळद बोर्ड व स्पायसेस बोर्ड इंडिया तर्फे नांदेड येथे हळद विषयक खरेदीदार–विक्रेता मेळाव्याचे आयोजन 

हळद शेतकऱ्यांसाठी निर्यात गुणवत्ता, एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) पद्धती आणि थेट बाजारपेठ जोडणीवर भर

नांदेड, दि. ८ मार्च :-हळद मूल्यसाखळी मजबूत करण्यासाठी आणि निर्याताभिमुख उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून, भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय हळद बोर्ड (NTB) व स्पायसेस बोर्ड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ०९ मार्च २०२६ रोजी हॉटेल VITS, नांदेड येथे हळद विषयक खरेदीदार–विक्रेता मेळावा (Buyer–Seller Meet – BSM) आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र हे भारतातील हळद उत्पादनासाठी महत्त्वाचे राज्य असून नांदेड, हिंगोली तसेच आसपासच्या जिल्ह्यांना उच्च दर्जाच्या हळदीसाठी राष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख प्राप्त झाली आहे. वायगाव, सांगली व वसमत या प्रसिद्ध GI-टॅग प्राप्त हळद प्रकारांमुळे या भागाला विशेष महत्त्व आहे. या खरेदीदार–विक्रेता मेळाव्याचा उद्देश शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs), निर्यातदार, व्यापारी, प्रक्रिया उद्योग प्रतिनिधी, वैज्ञानिक व धोरणकर्ते यांना एका व्यासपीठावर एकत्र आणून थेट बाजारपेठ जोडणी निर्माण करणे आणि जागतिक बाजारपेठेच्या निकषांनुसार दर्जेदार हळद उत्पादनाला प्रोत्साहन देणे हा आहे.

या कार्यक्रमास आमदार हेमंत पाटील, अध्यक्ष मा. बाळासाहेब ठाकरे हरीद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र, हिंगोली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच डॉ. इंद्रमणी, कुलगुरू – वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV), परभणी आणि जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या राष्ट्रीय दृष्टीकोनाला अधिक बळकटी देण्यासाठी श्रीमती एन. भवानी सचिव – राष्ट्रीय हळद बोर्ड, या प्रमुख भाषण (Keynote Address) देणार असून भारतातील हळद क्षेत्राच्या प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या धोरणात्मक उपक्रमांवर प्रकाश टाकणार आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी व उद्योग विभागातील वरिष्ठ अधिकारी व तज्ञही या कार्यक्रमात सहभागी होऊन हळद शेतकरी व कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांविषयी माहिती देतील.

या मेळाव्यातील तांत्रिक सत्रांमध्ये सेंद्रिय पद्धतीने हळद लागवड, एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM), निर्यात दर्जा निकष, अवशेष मर्यादा पालन (Residue Compliance), कापणीनंतरचे व्यवस्थापन (Post-Harvest Management) तसेच जागतिक बाजारपेठेतील नवीन संधी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांचे सादरीकरण होणार आहे. तसेच प्रगतिशील शेतकऱ्यांकडून त्यांच्या अनुभवांचे सादरीकरण करून शाश्वत शेती व बाजारपेठेतील सहभागाबाबत मार्गदर्शन दिले जाईल.

कार्यक्रमातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे खरेदीदार–विक्रेता संवाद सत्र, ज्यामध्ये निर्यातदार, व्यापारी, प्रक्रिया उद्योग प्रतिनिधी व शेतकरी उत्पादक कंपन्या थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून गुणवत्ता निकष, खरेदी संधी, किंमत निर्धारण आणि दीर्घकालीन पुरवठा व्यवस्था यावर चर्चा करतील.

या उपक्रमाद्वारे राष्ट्रीय हळद बोर्ड (NTB) हळद उत्पादनातील निर्यातमानकांबाबत जागरूकता वाढविणे, शेतकरी व उद्योग यांच्यातील संबंध अधिक मजबूत करणे तसेच महाराष्ट्रातील हळद उत्पादकांना मूल्यवर्धन व बाजारपेठ उपलब्ध करून देणे यासाठी प्रयत्नशील आहे. यामुळे भारताला उच्च दर्जाच्या मसाला निर्यातीमध्ये जागतिक नेतृत्व मिळविण्याच्या उद्दिष्टाला चालना मिळेल.

हा कार्यक्रम ०९ मार्च २०२६ रोजी सकाळी ०९:३० वाजता सुरू होणार असून हळद मूल्यसाखळीतील सर्व संबंधित घटकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

सिमांत सैकिया – उपसंचालक, स्पायसेस बोर्ड इंडिया, प्रादेशिक कार्यालय मुंबई

डॉ. ममता धनकुटे – सहाय्यक संचालक, स्पायसेस बोर्ड इंडिया, प्रादेशिक कार्यालय मुंबई

०००००

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   दर्जा , ट्रेसेबिलिटी आणि मूल्यवर्धनावर भर दिल्यास निर्यात संधी अधिक वाढतील -   सचिव एन. भवानीश्री   शेतकऱ्यांना थेट बा...