Thursday, June 21, 2018


उत्तर प्रदेश वरिष्ठ न्यायीक सेवा
भरती ऑनलाईन पद्धतीने
नांदेड दि. 21 :- प्रबंधक (ज्युडीशिअल) उच्च न्यायालय अलाहाबाद यांचे पत्रान्वये उत्तर प्रदेश वरिष्ठ न्यायीक सेवेतील थेट नियुक्तीची 48 पदे भरण्याच्या अनुषंगाने उच्च न्यायालय अलाहाबाद यांचेमार्फत "उत्तर प्रदेश वरिष्ठ न्यायीक सेवा-2018" ही पदभरती ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. याबाबतचा अधिक तपशील उच्च न्यायालयाच्या www.allahabadhighcourt.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.   पदभरतीबाबत न्यायीक तसेच अर्धन्यायीक कार्यालयातील बार असोसिएशन्स यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.   
00000


 राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत
निळा, अर्धापूरला 31 तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही
नांदेड दि. 21 :- तंबाखू नियंत्रण कायदा म्हणजेच कोटपा कायदानुसार सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणे व बाळगणे हा गुन्हा आहे. जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने निळा व अर्धापूर येथे अचानक धाडी टाकण्यात आल्या. कायद्यातील तरतुदीनुसार पथकामार्फत 31 तंबाखू विक्रेते यांच्याकडून 11 हजार 500 रुपये इतका दंड आकारण्यात आला.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली. या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, जिल्हा समन्वयक डॉ. प्रदीप बोरसे, समुपदेशक सदाशिव सुवर्णकार, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, दंत आरोग्य तज्ञ सय्यद इस्लाह्हुद्दिन व स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस उपनिरीक्षक दिनेश काशीद, समीर अहमद, बजरंग बोडके व योगेश शहाणे होते.
याअनुषंगाने नांदेड जिल्ह्याअंतर्गत कोणत्याही शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास 1800 110456 या टोलफ्री क्रमांकावर अथवा जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखूमुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांनी केले आहे.
0000000


आंतरराष्ट्रीय योग दिनास खेळाडुंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड दि. 21 :- संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस "आंतरराष्ट्रीय योग दिन" म्हणून घोषीत केला आहे. पाच हजार वर्षाहून अधिक परंपरा असणारी योग विद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. व्यक्तीच्या शारीरिक आणि आत्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभूत आहे. म्हणून 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासन व आंतरराष्ट्रीय योग दिन समिती नांदेड, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नेहरु युवा केंद्र, जिल्हा स्काऊट गाईड व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन श्री गुरुग्रंथ साहिब भवन, गुरुद्वारा परीसर नांदेड येथे करण्यात आले.
या कार्यक्रमास शहरातील अंदाजे पाचशे खेळाडू मुले-मुली, जेष्ठ नागरीक, महिला, विविध संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस पतंजलीचे योग प्रशिक्षक पुज्य स्वामी आनंददेवजी महाराज, हरिद्वार मुळ प्रयाग अलाहाबाद यांचे स्वागत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. तसेच जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  यावेळी व्यासपिठावर अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, अशोक देवकरे, नांदेड गुरुद्वारा बोर्डाचे डी. पी. सिंघ, गुरुविंदरसिंघ वाधवा, शिवाजी शिंदे, पतंजली योग समितीचे श्री साजणे, पी. डी. जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.  
तसेच क्रीडा अधिकारी सय्यद साजीद, मारोती सोनकांबळे, प्रवीण कोंडेकर, क्रीडा मार्गदर्शक अनिल बंदेल, शिवकांता देशमुख, आनंद गायकवाड, आनंद सुरेकर, नेहरु युवा केंद्राचे कुलदीपसिंघ शाहू, स्काउट गाईडचे संघटक दिगंबर करंडे, दिपाली मुधोळकर, जि. प. अधीक्षक श्री येदपूलवार, जेष्ठ क्रीडा शिक्षक आर. जी. जाधव, कराटे असोसिएशनचे सचिव गजानन फुलारी, तायक्वॉदो असोसिएशन सचिव बालाजी जोगदंड, आर्चरी असोसिएशन सचिव श्रीमती वृषाली पाटील जोगदंड, वंदना खोकले, जयदिप कहाळेकर, के. यु. वानखेडे, सर्व सभासद, टेबलटेनिसचे सर्व खेळाडू यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात पतंजलीचे योग प्रशिक्षक पुज्य स्वामी आनंददेवजी महाराज, हिरद्वार मुळ प्रयाग अलाहाबाद व त्यांचे सहकारी यांनी उपस्थितांना योगासन, प्राणायाम, ध्यानचे प्रात्यक्षिक करुन दाखविले व उपस्थितांकडून करुन घेतले. त्याचबरोबर योगाचे महत्व उपस्थितांना पटवून दिले. अतिशय उत्स्फुर्त आणि उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले तर आभार दिगंबर करंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी संजय चव्हाण, आनंद जोंधळे, मोहन पवार, धम्मानंद काबळे, विद्यानंद भालेराव, सोनबा ओव्हाळ आदींनी परिश्रम घेतले, असे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी कळविले आहे.
0000000


















मधमाशा पालन उद्योग वाढीसाठी प्रशिक्षण
नांदेड दि. 21 :- जिल्ह्यात मधमाशा पालन उद्योगात वाढ होऊन शेतकऱ्यांना मधमाशा पालन उद्योगाचे महत्व अवगत व्हावे परागभवनासाठी जिल्हा कृषी कार्यालयामार्फत आत्मा योजनेअंतर्गत मधमाशा पालन उद्योगाकरीता प्रात्यक्षिकासाठी निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून शेतकऱ्यांना सातेरी / मेलीफेरा मधमाशाची प्रात्यक्षिकासाठी मधपेटी उपलब्ध करुन मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेणेसाठी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ  उद्योग भवन तळ मजला कार्यालय नांदेड येथे  संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.                                                 
00000


एकात्मीक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत
शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी 30 जूनची मुदतवाढ
नांदेड दि. 21 :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत समाविष्ट प्रकल्प आधारित विनाप्रकल्प आधारित या दोन्ही घटकासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्जाची www.hortnet.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्यास शनिवार 30 जुन 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी सन 2017-18 मध्ये काही बाबीसाठी अर्ज केले आहेत, तथापि त्यांना पूर्व संमती मिळाली नाही तसेच 1 जुन 2018 पुर्वी ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत, अशा शेतकऱ्यांनी सन 2018-19 मध्ये पुन:श्च अर्ज करणे आवश्यक आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत समाविष्ट घटकांसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज स्विकारण्याकरिता राज्यासन 2017 पासून हॉर्टनेट ही संगणकीय प्रणाली कार्यान्वित आहे. सन 2018-19 या आर्थिक वर्षाएकात्मीक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत एकात्मीक पॅक हाऊस, शितखोली, पुर्वशीतकरणगृह, शीतगृह, एकात्मीक शीतसाखळी, रेफर व्हॅन, रायपनिंग चेंबर, एकात्मिक पुर्व शितकरणगृह शितखोली (सोलार पॉवरसह), प्राथमिक प्रक्रिया केंद्र, कांदाचाळ उभारणी, मधुमक्षिक पालन-बी-ब्रिडरकडुन मधुमक्षिका वसाहतीचे उत्पादन करणे, मधुमक्षिका वसाहत संचवाटप या प्रकल्प आधारित फुलपिके, मसालापिके-हळद (रोपवाटीका), आळींबी उत्पादन प्रकल्प, सामुहीक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, संरक्षित शेती-हरीतगृह, शेडनेट हाऊस, हरीतगृहातील उच्च प्रतीची भाजीपाला लागवड, हरीतगृहातील उच्च प्रतीची फुल पिके लागवड प्लास्टीक मल्चींग, ट्रॅक्टर 20 अश्वशक्तीपर्यंत, पीक संरक्षण उपकरणे मॅन्युअल स्प्रेअर- ) नॅपसॅक / फुट स्प्रेअर ) पॉवर नॅपसॅक स्प्रेअर / पॉवर ऑपरेटेड तैवान स्प्रेअर (क्षमता 8-12 लिटर) या विनाप्रकल्प आधारित घटकांचा समावेश आहे. या घटकाचा लाभ घेण्यासाठी Hortnet प्रणाली नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच एक शेतकरी एक किंवा अधिक घटकांची निवड करु शकतो.
लाभार्थ्यांने अभियानांतर्गत घटकांसाठी नोंदणी करत असताना पासपोर्ट साईज फोटो, सात/बारा उतारा, आठ- उतारा, बँक पासबुकाची प्रथम पृष्ठाची छायांकित प्रत, आधार कार्ड, अनुसुचीत जाती / जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचे संवर्ग प्रमाणपत्राचे छायांकित प्रत हमीपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. घटकनिहाय अर्जाचा हमीपत्राचा नमूना संकेतस्थळावर Application form & Hamipatra या सदराखाली हॉर्टनेटच्या महाराष्ट्र राज्याच्या होमपेजवर उपलब्ध आहे. योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.
000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...