Wednesday, July 29, 2020


साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन  
नांदेड (जिमाका) दि. 29 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी गुणवंत विद्यार्थ्यांनी 9 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज करावीत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग, मातंग, मिनीमादीग, मांदीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादीगा व मादगी या 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी 2019-20 या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व 2020-21 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता दहावी, बारावी, पदवी पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमात विद्यार्थी, विद्यार्थींना सरासरी 60 टक्के किंवा ज्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असतील अशा गुणवंत विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात आली आहेत.
जेष्ठता व गुणक्रमांकानुसार 3 ते 5 विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमात विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, शाळेचा दाखला, गुणपत्रक, दोन फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इत्यादीसह दोन प्रतीत आपले पुर्ण पत्त्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड येथे मुदतीत 9 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज करता येतील, असेही आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
00000


भाऊरायापर्यंत राख्या पोहचण्यासाठी
बहिणींच्या मदतीला पोस्ट कार्यालय सज्ज
            नांदेड (जिमाका) दि. 29 :- राखीचा सण येत्या सोमवार 3 ऑगस्ट 2020 रोजी असल्यामुळे महाराष्ट्र पोस्टल सर्कलने रविवारी 2 ऑगस्ट रोजी पोस्ट कार्यालयांमध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था केली आहे. राख्या वेळेत भावापर्यंत पोहचण्यासाठी टपाल कार्यालयाच्या स्पीड पोस्ट सेवा तत्पर ठेवल्या असून लोकांनी या सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड डाक विभागाचे सहाय्यक अधिक्षक डॉ. बी. एच. नागरगोजे यांनी केले आहे.
राखी हा सण भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा उत्सव आहे ज्यात भावनिक ओढ आहे. दरवर्षी राखी टपाल हाताळण्यासाठी टपाल विभाग विशेष काळजी घेतो. यावर्षी देखील राख्यांचे टपाल पोस्ट ऑफिसवर बुक करावेत. राखी टपालाची प्राधान्यक्रमानुसार बुकिंग, प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था महाराष्ट्रातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये करण्यात आल आहे. राखी टपालाच्या वेगवान प्रक्रियेसाठी राखी टपाल सेंटर मुंबई व नवी मुंबई येथेही सुरू करण्यात आले आहेत.
यावर्षी कोविडची परिस्थिती लक्षात घेता टपाल विभागाने विशेष नियोजन केले आहे. त्याच शहरात राहणाऱ्या भावंडांना कोविड नियंत्रणासाठी असलेल्या व्यवस्थापनामुळे भेट घेणे जीकरीचे ठरेल. कंटेमेन्ट झोन किंवा सीलबंद इमारतींमध्ये कोणाचे भाऊ-बहिणी रहात असतील तर त्यांच्या भावनिक भावबंधाचा विचार करुन पोस्ट ऑफिसचे सर्व कर्मचारी सेवेसाठी तत्पर झाले आहेत.
या कोविड काळात, पोस्ट विभागाने राखी टपालाचे संकलन, प्रसार आणि वितरण यास सर्वात जास्त प्राधान्य दिले आहे. स्पीड पोस्ट राखीच्या वितरणामुळे या कठीण काळात लोकांच्या जीवनात होईल आनंद अशी घोषणा घेऊन पोस्ट ऑफिस तत्पर असल्याचेही सहाय्यक अधिक्षक डॉ. नागरगोजे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.  
000000



दहावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांसह
शिक्षक व पालकांचा केला गौरव
नांदेड (जिमाका) दि. 29 :- दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज लागला असून यंदाही नांदेड जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 92.99 टक्के असून मुलांचे प्रमाण 86.48 टक्के एवढे आहे. मार्च-2019 च्या परीक्षेच्या तुलनेत यंदाच्या निकालात देखील नांदेड जिल्ह्याची टक्केवारी वाढली असून मार्च-2019 मध्ये 68.13 टक्के निकाल लागला होता. त्यातुलनेत यंदाचा निकाल 89.53 टक्के लागला. म्हणजे यंदाच्या निकालात 21.40 टक्क्यांची वाढ ही विद्यार्थ्यांच्या परिश्रमासमवेतच शिक्षक आणि पालकांनी घेतलेल्या कष्टाचेच द्योतक आहे या शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण  यांनी गौरव केला. या परीक्षेत ज्यांना यश मिळाले नाही त्या विद्यार्थी मित्रांनी नैराश्य झटकून पुन्हा विश्वासाने अभ्यासाकडे वळावे, असे आवाहनही त्यांनी केले.
000000


कोरोनातून आज 20 व्यक्ती बरे 
जिल्ह्यात 40 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू 
नांदेड (जिमाका) दि. 29 :-  जिल्ह्यात आज 29  जुलै रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 20 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 40 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 242 अहवालापैकी 179 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 1 हजार 568 एवढी झाली असून यातील 790 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 693 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 15 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 7 महिला व 8 पुरुषांचा समावेश आहे.
सोमवार 27 जुलै रोजी दिपनगर नांदेड येथील 58 वर्षाचा एक पुरुष, मंगळवार 28 जुलै रोजी किनवट कलारी येथील 54 वर्षाचा एक मजुर, शेतमजूरवाडी तामसा येथील 25 वर्षाच्या एका महिलेचा डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत पावली. तर बुधवार 29 जुलै रोजी सराफा गल्ली येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत पावला. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 74 एवढी झाली आहे.  
आज बरे झालेल्या 20 बाधितांमध्ये पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 9, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 1, खाजगी रुग्णालयातील 10 बाधितांचा  समावेश आहे. आतापर्यंत एकुण 790 बाधित व्यक्तींना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे.  
आरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन बाधितांमध्ये श्रीनगर नांदेड येथील 63 वर्षाची 1 महिला, फारुकनगर नांदेड येथील 44 वर्षाचा 1 पुरुष, जवाहरनगर नांदेड येथील 32 वर्षाचा 1 पुरुष, शिवकल्याणनगर नांदेड येथील 65 वर्षाचा 1 पुरुष, दिलीपसिंग कॉलनी गोवर्धन घाट नांदेड येथील 7,10, 12,30,31,33 वर्षाचे 6 पुरुष व 26 वर्षाची 1 महिला, मगनपुरा नांदेड येथील 33 वर्षाचा 1 पुरुष, वसंतनगर नांदेड येथील 34,37,46 वर्षाचे 3 पुरुष, शिवाजीनगर नांदेड येथील 16 वर्षाचा 1 पुरुष व 60 वर्षाची 1 महिला, दिपकनगर नांदेड येथील 68 वर्षाचा 1 पुरुष, वजिराबाद नांदेड येथील 50 वर्षाचा 1 पुरुष, पाठक गल्ली नांदेड येथील 20,21 वर्षाचे 2 पुरुष, किनवट येथील 48 वर्षाचा 1 पुरुष, कलारी किनवट येथील 65 वर्षाचा 1 पुरुष, एसव्हीएम कॉलनी किनवट येथील 52,60 वर्षाचे 2 पुरुष, आंध्र बस स्टँड धर्माबाद येथील 70,75 वर्षाच्या 2 महिला, करिम कॉलनी आर्धापूर येथील 60 वर्षाचा 1 पुरुष, शेतमजूर वाडी तामसा हदगाव येथील 25 वर्षाची 1 महिला, हेतेपूर कंधार येथील 36,42 वर्षाच्या 2 महिला, नवीन मोंढा परभणी येथील 18 वर्षाची 1 महिला, हिंगोली येथील 40 वर्षाचा 1 पुरुष, कळमनूरी हिंगोली येथील 57 वर्षाचा 1 पुरुष, पुसद यवतमाळ येथील 38 वर्षाच्या एका  पुरुषाचा यात समावेश आहे. तर अँटिजेन तपासणीद्वारे भाग्यनगर नांदेड येथील 21,28 वर्षाचे 2 पुरुष, कौसरनगर चुनाभट्टी नांदेड येथील 23 वर्षाचा 1 पुरुष, बोरबन वजिराबाद नांदेड येथील 44 वर्षाच्या एका पुरुषाचा यात समावेश आहे.   
जिल्ह्यात 693 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेडयेथे 117, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 249, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 27, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 15, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 14, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 106, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 56, उमरी कोविड केअर सेंटर 10, लोहा कोविड केअर सेंटर येथे 5, हदगाव कोविड केअर सेंटर 13, भोकर कोविड केअर सेंटर 2, कंधार कोविड केअर सेंटर येथे 10, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 17, किनवट कोविड केअर सेंटर येथे 3, खाजगी रुग्णालयात 43 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 4 बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे 1 बाधित तर मुंबई येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत. 
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
सर्वेक्षण- 1 लाख 48 हजार 648,
घेतलेले स्वॅब- 13 हजार 400,
निगेटिव्ह स्वॅब- 10 हजार 419,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 40,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 हजार 568,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 8,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 14,
मृत्यू संख्या- 74,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 790,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 693,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 482. 
प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   
00000




प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 
शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे
नांदेड (जिमाका) दि. 29 :- शासनाने खरीप हंगाम 2020 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्हयांत राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आलेली असून योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2020 मध्ये सहभाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक 31 जुलै 2020 अशी आहे.
         या योजनेत सहभागी होण्यासाठी बँक व आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी) यांचे मार्फत विमा अर्ज स्विकारण्यात येत आहेत. बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर शेवटच्या दिवशी गर्दी झाल्यामुळे अंतिम मुदतीच्या पुर्वी ऑनलाईन अर्ज भरता न आल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार नाही. योजनेत सहभागी होण्याची अंतीम मुदत वाढविणे केंद्र शासनाच्या योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अशक्य असल्याने शा स्वरुपाच्या कोणत्याही चर्चेवर विश्वास न ठेवता नोंदणीसाठी नजीकच्या बँक अथवा आपले सरकार केंद्रामध्ये दिनांक 31 जुलै, 2020 पर्यन्त विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा. 
         राज्यातील वनहक्क जमिनधारक शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी सविस्तर सुचना कृषि विभागामार्फत जिल्हास्तरावर व संबंधित विमा कंपनींना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. योजनेतील सहभागासाठी तात्काळ नजीकच्या विभागीय कृषि सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजिकच्या बँक, आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
000000


कोरोना सर्वेक्षणात जिल्हावासियांनी स्वत:हून पुढे यावे
- जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर
सेवाभावी संस्थांनी सर्व्हेक्षण टीमला करावे सहकार्य
नांदेड दि. 29 (जिमाका) :-  कोविड रुग्णाच्या संपर्कात आलेले व ज्यांचे वय 50 वर्षापेक्षा जास्त आहे तसेच ज्यांनी विदेशातून, इतर राज्यातून किंवा इतर जिल्ह्यातून प्रवास केला आहे अशा सर्व व्यक्तींची तपासणी मोहिम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. या मोहिमेत निर्देशित केलेल्या व्यक्तींनी तपासणीसाठी स्वतःहून पुढे यावे व तपासणी पथकाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी केले आहे. 
कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ट्रेस, टेस्ट व ट्रिट या त्रिसुत्रीचा वापर करुन जिल्हा प्रशासनातर्फे युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे.  यासाठी तालुका स्तरावर सर्वेक्षण अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांच्यामार्फत हे सर्वेक्षण सुरु आहे. या सर्वेक्षणामध्ये इन्फ्लूएन्झा influenza सदृश्य आजार अशी व्यक्ती, कोविड-19 ची प्राथमिक लक्षणे असतील अशी व्यक्ती किंवा विदेशातून प्रवास करुन आलेली व्यक्तींची मोबाईल व्हॉनद्वारे जलद अँटिजेन टेस्टींग Rapid antigen testing तपासणी करण्यात येईल. या तपासणी दरम्यान ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये तात्काळ उपचार सुरु केले जातील. तसेच ज्यांचे निगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत परंतू प्राथमिकदृष्ट्या कोविड लक्षणे दिसून येत आहे अशा नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येईल.
कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मिशन ब्रेक द चेन ही मोहिम नांदेड जिल्हा प्रशासनाने हाती घेतली असल्याचे डॉ यांनी सांगितले. कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन अशा व्यक्तींची कोविड विषाणू संसर्गाची तपासणी आरोग्य विभागाचे डॉक्टर, आशा वर्कर व एएनएम यांच्यामार्फत केली जात आहे.
कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. सद्यस्थितीत कार्यरत मनुष्यबळ लक्षात घेता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, राजकिय पक्षाचे प्रतिनिधी, विविध संघटना, सामाजिक संस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करतांना आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी संयुक्तरित्या दिलेल्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेने सर्वेक्षणामध्ये इन्फ्लूएन्झा influenza सदृश्य आजार असणारी व्यक्ती, कोविड-19 ची प्राथमिक लक्षणे असतील अशा व्यक्ती किंवा विदेशातून प्रवास करुन आलेली व्यक्ती असतील अशांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या पुढील https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfMaWXSpUH5QA2Ys4yGrRWu9bI2wzzmfSZjB7-s-dMHzMsEeg/viewform फॉरमॅटवर भरावी आणि वैयक्तिकरित्या कोणाला कोविड-19 सदृश लक्षणे आढळल्यास त्यांनी या लिंकवर वैयक्तिकरित्या माहिती भरावी. असेही  नांदेड जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.
000000

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...