Sunday, September 17, 2023

 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त

समाज कल्याण कार्यालयात विद्युत रोषणाई करुन ध्वजारोहण उत्साहात साजरा 

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,नांदेड यांचे वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डॉ.बाबासाहेब सामाजिक न्याय भवन इमातीवर विद्युत रोषनाई करण्यात आली होती. अपर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा जात पडताळणी समिती सुनिल महिंद्रकर यांचे हस्ते ध्वजारोहण आज करण्यात आले.

या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिनगिरे व कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी,  जिल्हा जात पडताळणी कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी तसेच विविध महामंडळाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.  ध्वजारोहणानंतर, राष्ट्रगीत, सामुहिक संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन,  मराठवाडा प्रतिज्ञा, राज्य गीत आणि मराठवाडा गौरव गिताचे गायन केले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 15 ते 17 सप्टेंबर 2023 कालावधीत कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी नांदेड यांच्या निर्देशानुसार विविध कार्यक्रम संपन्न झाले.

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिनगिरे,  यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त मनोगत व्यक्त करुन उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या . तसेच  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात आदरणीय प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. तद्नंतर वाहन चालक दिनानिमित्त कार्यालयातील वाहन चालक अनिल कंधारे यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

 

या अंतर्गत  विशेष स्वच्‍छता मोहिम  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये  तसेच नांदेड जिल्हातील समाज कल्याण कार्यालय अधिनस्त कार्यरत वसतिगृह व अनु.जाती निवासी शाळा मध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. दिनांक 15 सप्टेंबर 2023 पासुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवानातील सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालयाच्या इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली , विविध योजनांची माहिती अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून कर्मचाऱ्या मार्फत लाभार्थ्यांना देण्यात आली. तसेच संध्याछाया वृध्दाश्रमात ज्येष्ठ नागरीकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले  तसेच विद्यार्थ्यांची नाटय स्पर्धा , चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा , वृक्षरोपण असे विविध कार्यक्रम शासकिय वसतिगृह व निवासी शाळेमध्ये राबविण्यात आले.

0000




 कुरुंदकर स्मारकाच्या कामाला गती देऊ

-         पालकमंत्री गिरीश महाजन

 

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- महाराष्ट्राच्या विचारवंतात प्राचार्य नरहर कुरुंदकर यांचे नांव आजही आदराचे आहे. महाराष्ट्राला त्यांनी पूर्वग्रहमुक्त व असांप्रदायिक विचार पध्दती दिली. साहित्य, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, धर्म, तत्त्वज्ञान, भाषा, सौंदर्यशास्त्र, संगीत अशा अनेक विषयांमध्ये त्यांनी केलेले तत्त्वचिंतन मोलाचे आहे. त्यांच्या स्मारकाच्या पुढील टप्यातील कामासाठी आम्ही सकारात्मक असून मंत्रालय पातळीवर तात्काळ त्याला गती देऊन प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले

 

नांदेड येथील नरहर कुरुंदकर प्रतिष्ठाणला त्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार  प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, डॉ. व्यंकटेश काब्दे, प्रा. दत्ता भगत, श्यामल पत्की, दीपनाथ पत्की, लक्ष्मण संगेवार आदि मान्यवर उपस्थित होते.

 

नरहर कुरुंदकर यांच्या जीवन कार्याला अधिकाधिक लोकाभिमूख करण्यासाठी येथील ग्रंथालय व इतर सोयीसुविधांना भक्कम केले पाहीजे. याचबरोबर वर्षातून एकवेळा अखिल भारतीय पातळीवरील परिसंवाद व इतर उपक्रम हाती घेता येऊ शकतील असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सुचविले. यावेळी छोटेखानी समारंभात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समयोचित भाषण झाले.  


0000

 (छाया- सदा वडजे)



 मराठवाडा मुक्तिसाठी स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान

भारताच्या अखंडतेच्या दृष्टीने अनमोल

-         पालकमंत्री गिरीश महाजन

 

·         उमेद च्या माध्यमातून ग्रामीण महिला सक्षमीकरणावर भर

·         छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत नांदेड जिल्ह्यासाठी अनेक विकासात्मक कामांना चालना

·         पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम हा भारताच्या अखंड सार्वभौमत्वाला सिद्ध करणारा आहे. निझामाच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान संपूर्ण भारताच्या अखंडतेच्या दृष्टीने अत्यंत अनमोल असल्याचेप्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलेमराठवाडा मुक्ति संग्राम दिनाच्या 75 वा वर्धापन दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

 

मराठवाडा मुक्तिदिन समारंभात माता गुजरीजी विसावा उद्यान येथे  हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास पालकमंत्री गिरीश महाजन व मान्यवरांच्या हस्ते  मानवंदना व पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.  यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरआमदार राम पाटील रातोळीकरआमदार राजेश पवारआमदार बालाजी कल्याणकरविशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकरजिल्हाधिकारी अभिजीत राऊतजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवालजिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटेमनपाचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे व ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी उपस्थित होते.

 

भारतीय स्वातंत्र्य चळवळीनेमराठवाडा मुक्तिसंग्रामाने लोकशाहीच्या मूल्यांसह जो समृध्द वारसा दिला आहे तो नव्या पिढीपर्यंत पोहचावा यादृष्टीने आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासह मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा करीत आहोत. हा समृध्द वारसा पुढे नेण्यासह भारतातील शेती, शेतकरी व सर्वसामान्यांच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी अनेक लोकाभिमुख निर्णय घेवून विकासाला गती दिली आहे. जी-20 परिषदेचे अत्यंत समर्थपणे आयोजन करून जगातील सर्व देश प्रमुखांनी भारताला प्रधानमंत्री मोदीजींच्या स्वरुपात एका समर्थ नेतृत्वाची अनुभूती घेतल्याचे त्यांनी सांगितले.  

 

मराठवाडा मुक्ती दिनाच्या औचित्याने विविध विकास कामाचे लोकार्पण

मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज विसावा उद्यान येथील मुख्य शासकीय समारोहात प्रातिनिधीक स्वरुपात लोकार्पण करण्यात आले. यात अर्धापूर आणि भोकर येथील पोलीस स्टेशनच्या नुतन इमारत, नांदेड जिल्हा रुग्णालय येथील डायलेसीस सेंटर, आयपीएचएल प्रयोगशाळा, नांदेड येथील कोषागार कार्यालय सुरक्षा कक्ष नुतन इमारतीचे लोकार्पण झाल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जाहिर केले. याचबरोबर क्रिडांगण व डिजीटल क्लासरुमचे भूमीपूजन,  इंडियन स्वच्छता लिग 2.0 अंतर्गत विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. जिल्हा क्रीडा विभागाअंतर्गत पंडित दिनदयाल उपाध्याय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन झाल्याचे त्यांनी जाहिर केले.

जिल्हा माहिती कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या

विशेष कॉफीटेबल बुक व स्मृतिदर्शिकेचे प्रकाशन

 

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विशेष कॉफीटेबल बुक व स्मृतिदर्शिकेचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या मराठवाडा मुक्तिसंग्रामाबाबत आधारित या विशेष कॉफीटेबल बुकचे संपादन जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, डॉ. सुरेश सावंत, संजीव कुळकर्णी व शंतनु डोईफोडे यांनी केले आहे. यात माजी कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे, ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. प्रभाकर देव, ज्येष्ठ संपादक निशिकांत भालेराव, जयप्रकाश दगडे, डॉ. महेश जोशी, डॉ. संपदा कुलकर्णी यांचे लेख आहेत. स्मृतिदर्शिकेत नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्रामातील महत्वपूर्ण घटनांवर प्रख्यात चित्रकार राजु बाविस्कर यांच्या रेखाटनासह संक्षिप्त माहिती देण्यात आली आहे.

 

शेतकऱ्यांसाठी भरीव आर्थिक मदत

 

गतवर्षीच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांच्या मदतीला शासन खंबीरपणे उभे राहिले. शेतकऱ्यांना यातून सावरण्यासाठी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली. सुमारे 8.89 लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत 472 कोटी रुपये नुकसान भरपाई वाटप करण्यात आले. या खरीप हंगामासाठी 1 हजार 812.14 कोटी रुपये पीक कर्ज वाटप केले. यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेती पिकाच्या नुकसानीसाठी 420 कोटी रुपये लवकरच देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.   

 

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 अंतर्गत 15 सप्टेंबर 2023 अखेरपर्यत 31 हजार 181 शेतकऱ्यांना 117.61 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ शासनामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. मार्च व एप्रिल 2023 या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या 42 हजार 793 बाधित शेतकऱ्यांना 34 कोटी 21 लाख 68 हजार 863 रुपये  इतका निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्‍यावर वितरीत करण्‍यात आला. पी.एम.किसान योजनेअंतर्गत जिल्ह्यात 4 लाख 32 हजार 587 इतके पात्र शेतकरी असून त्‍यांना आजपर्यत एकूण रूपये 1 हजार 147 कोटी 1 लाख इतकी मदत वितरीत झाली आहे असेही पालकमंत्री महाजन यांनी यावेळी नमूद केले.

 

केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठी आपण विविध योजना राबवित आहोत. याला राज्य शासनानेही जोड दिली आहे. नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत मनरेगाच्या माध्यमातून वैयक्तिक विहीर योजनेवर जिल्हा परिषदेने विशेष भर दिला आहे. नांदेड जिल्ह्यातील बालकांच्या सुपोषणासाठी आयआयटी पवई यांच्या विद्यमानातून विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळा दत्तक योजनाबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेतला आहे. देणगीच्या माध्यमातून ही दत्तक योजना कार्यान्वित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  

जिल्ह्यातील आरोग्याच्या सुविधेत नवीन भर

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसाठी 4 ठिकाणी सिटी स्कॅन यंत्रणा, 6 ठिकाणी डायलेसीस यंत्रणा, 15 ठिकाणी मॉड्युलर शस्त्रक्रिया कक्ष, टुडी ईको तपासणी, 16 ठिकाणी ब्लड स्टोरेज युनिट या सर्व सुविधा आरोग्याच्यादृष्टिने जिल्ह्यात वाढविल्या आहेत. राज्यातील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी “तीर्थक्षेत्र विकास योजना” राबविण्याचा मानस असून त्या योजनेच्या माध्यमातून माहूर तीर्थक्षेत्र विकासासाठी सुमारे 7 कोटी एवढा निधी उपलब्ध करून दिला आहे. याव्यतिरिक्त नांदेड जिल्ह्यातील इतर पर्यटन क्षेत्राचाही विकास करण्यात येणार असल्याचे म्हणाले.

 

ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी  1 हजार 76  कोटींची वाढीव तरतूद

उमेदच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी  1 हजार 76  कोटींची वाढीव तरतूद करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्रामध्ये एकूण 6 लाख 8 हजार  स्वयंसहाय्यता गटांची स्थापना करून साधारण 60 लाखापेक्षा जास्त महिलांना या कार्यक्रमात सामावून घेतलेले आहे.  यापैकी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये 1 लाख 24 हजार स्वयंसहाय्यता गटांमध्ये साधारणपणे 12 लाख 23 हजार  महिलांचा समावेश आहे.  

 

महाराष्ट्र शासन मराठा आरक्षणासाठी कटिबध्द

महाराष्ट्र शासन मराठा आरक्षणासाठी कटिबध्द आहे. मुख्यमंत्री व संपूर्ण मंत्रीमंडळ मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहे. सर्व पातळीवर आरक्षणाचा निर्णय टिकलाच पाहिजे यादृष्टिने शासनाची भूमिका असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना जिल्ह्यातील अंतवरली येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडले. त्यांच्यासह संपूर्ण समाजाला त्यांनी विश्वास दिला आहे.  

 

छत्रपती संभाजी नगर येथील मंत्रिमंडळ बैठकीत नांदेडसाठी भरीव तरतूद

सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील बाभळी येथील मध्यम प्रकल्पासाठी 771 कोटी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले. या प्रकल्पामुळे 1 हजार 600 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. जिल्ह्यातील उनकेश्वर (ता. किनवट) येथील उच्च पातळी बंधारा प्रकल्पाच्या 232 कोटी 71 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. यातून किनवट   तालुक्यातील   1 हजार 90  हेक्टर आणि यवतमाळ  जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील 370 हेक्टर असे एकूण 1 हजार 460 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी 14 हजार 40 कोटीची योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातील विविध स्मारके व मंदिराच्या विकास कार्यक्रमात होट्टल मंदिराचाही समावेश केलेला आहे. मराठवाड्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वत:च्या कार्यालयासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षात 180 कोटी रुपये दिले जाणार आहेत. निझामकालीन शाळांची दुरूस्ती व पुर्नबांधणीसाठी 20 टक्के लोकसहभागाची अट शिथील केली आहे. नांदेड शहरात सुरक्षिततेच्यादृष्टिने 100 कोटी रुपयांचे सीसीटीव्हीचे जाळे निर्माण केले जाणार आहे. नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या मलनि:स्सारण प्रकल्पासाठी 329 कोटी 16 लाख रुपये, माहूर नगरपरिषदेसाठी 24 कोटी 62 लाख रुपये, माहूर येथे वनविश्रामगृह, साबरमती घाटाप्रमाणे नांदेडच्या गोदावरी घाटाचे सौंदर्यीकरण, रिव्हर फंडसाठी 100 कोटी रुपयांचे सीसीटीव्हीचे जाळे निर्माण केले जाणार आहे. नांदेड येथे स्वयंमचलित चाचणी पथप्रकल्प, घनकचरा प्रकल्पासाठी 8 कोटी 7 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहेअसे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.  

 

 या विशेष समारंभात पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मराठवाडा गौरव गीताचे गीतकार लक्ष्मीकांत तांबोळी यांचा सत्कार करण्यात आला. जागतिक दिव्यांग बॅडमिंटन खेळाडू लता उमरेकर यांना 2 लक्ष रुपयांचा धनादेश त्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. याचबरोबर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सभामंडपात असलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींची आस्थेवाईक विचारपूस करुन भेट घेतली. जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाने राष्ट्रगीतासह महाराष्ट्र गीत, व मराठवाडा गीत सादर केले. पालकमंत्री यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणाच्या अगोदर प्रतिज्ञा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले.

0000

(छाया- सदा वडजे)



















  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...