Sunday, September 17, 2023

 कुरुंदकर स्मारकाच्या कामाला गती देऊ

-         पालकमंत्री गिरीश महाजन

 

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- महाराष्ट्राच्या विचारवंतात प्राचार्य नरहर कुरुंदकर यांचे नांव आजही आदराचे आहे. महाराष्ट्राला त्यांनी पूर्वग्रहमुक्त व असांप्रदायिक विचार पध्दती दिली. साहित्य, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, धर्म, तत्त्वज्ञान, भाषा, सौंदर्यशास्त्र, संगीत अशा अनेक विषयांमध्ये त्यांनी केलेले तत्त्वचिंतन मोलाचे आहे. त्यांच्या स्मारकाच्या पुढील टप्यातील कामासाठी आम्ही सकारात्मक असून मंत्रालय पातळीवर तात्काळ त्याला गती देऊन प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले

 

नांदेड येथील नरहर कुरुंदकर प्रतिष्ठाणला त्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार  प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, डॉ. व्यंकटेश काब्दे, प्रा. दत्ता भगत, श्यामल पत्की, दीपनाथ पत्की, लक्ष्मण संगेवार आदि मान्यवर उपस्थित होते.

 

नरहर कुरुंदकर यांच्या जीवन कार्याला अधिकाधिक लोकाभिमूख करण्यासाठी येथील ग्रंथालय व इतर सोयीसुविधांना भक्कम केले पाहीजे. याचबरोबर वर्षातून एकवेळा अखिल भारतीय पातळीवरील परिसंवाद व इतर उपक्रम हाती घेता येऊ शकतील असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सुचविले. यावेळी छोटेखानी समारंभात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समयोचित भाषण झाले.  


0000

 (छाया- सदा वडजे)



No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...