Saturday, December 12, 2020

 

राष्ट्रीय लोकअदालतीत 2 हजार 81 प्रकरणे सामोपचाराने निकाली 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- न्यायालयीन प्रकरणात सामोपचाराने आपआपसातील वाद, तंटे मिटावेत या उद्देशाने जिल्ह्यात आज राष्ट्रीय लोकअदालत संपन्न झाली. यात तब्बल 2 हजार 81  प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली. यातील आर्थीक व्यवहाराशी निगडीत असलेल्या प्रकरणात 9 कोटी 32 लाख 6 हजार 551 एवढ्या रक्कमेची तडजोड झाली. तडजोड झालेल्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये दिवाणी, फौजदारी, एन.आय.अॅक्ट., बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात, भूसंपादन, ग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणीपट्टीचे  प्रकरणे इतर, तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालयाच्या प्रकरणांचा, विविध बॅंकाचा तसेच विद्युत प्रकरणे, टेलिफोन, मोबाईल यांचे दाखलपूर्व प्रकरणांचा यात समावेश होता. 

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय नांदेडचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम आर. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात आज राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. ही लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हयातील सर्व न्यायाधीश, पॅनलवरील न्यायाधीश, वकिल, पॅनल सदस्य व सर्व विधिज्ञ यांनी जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक तालुक्यासह कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय येथे त्या-त्या न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष, जिल्हा सरकारी वकिल तसेच जिल्हयातील सर्व विधिज्ञ आणि विविध विमा कंपनी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभाग अधिकारी तसेच जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

लोकअदालत यशस्वी व जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम आर. जगताप व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. एस. रोटे यांनी विशेष प्रयत्न केले. प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम आर. जगताप यांनी लोकअदालत यशस्वी झाल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आर. एस. रोटे यांनी उपस्थित सर्व पक्षकार तसेच सर्व न्यायाधीश, विधीज्ञ, सर्व न्यायालयीन कर्मचारी, लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानून यापुढे अशीच सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

00000

 

शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा

निबंध सादर करण्याची 15 जानेवारी मुदत 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- राज्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी शिक्षण मंडळाने सन 2020-21 या वर्षाकरिता निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. मंडळाकडे निबंध सादर करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2021 अशी आहे. राज्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे. 

निबंध स्पर्धेसाठी तंत्रस्नेही शिक्षक-काळाची गरज, वाचनसमृद्धी- शिक्षकांसाठी अपरिहार्य, उपक्रमशीलता आणि शिक्षक, विद्यार्थी व शिक्षक- शरीर / मन: स्वास्थ्य, नवीन शैक्षणिक धोरण आणि माझी भूमिका हे पाच विषय देण्यात आली आहेत. राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी मुख्याध्यापक, प्राचार्यांमार्फत आपले निबंध मा. सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, भांबुर्डा, बालचित्रवाणी शेजारी शिवाजीनगर पुणे-411004 किंवा विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण विभागीय मंडळ या पत्त्यावर 15 जानेवारी 2021 अखेर पोहोचतील अशारितीने समक्ष सादर करावेत किंवा पोष्टाने पाठवावेत. पाकिटावर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा सन 2020-21 असा ठळक उल्लेख करावा. 

मंडळाकडे निबंध सादर करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2021 अशी आहे. यानंतर प्राप्त झालेले निबंध विचारात घेतले जाणार नाहीत. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेसंबंधीचे हे निवेदन राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणू दयावे तसेच त्यांना स्पर्धेत सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित करावे, असेही आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000

 

58 कोरोना बाधितांची भर तर तिघांचा मृत्यू

52 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी  

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  शनिवार 12 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 58 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 37 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 21 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 52 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या 900 अहवालापैकी 831 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 829 एवढी झाली असून यातील 19 हजार 751 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 324 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 18 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. गुरुवार 10 डिसेंबर रोजी किनवट तालुक्यातील बोधडी येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे तर शनिवार 12 डिसेंबर रोजी माहूर तालुक्यातील वाईबाजार येथील 40 वर्षाच्या पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर यशवंतनगर नांदेड येथील 83 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 559 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.    

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 10, किनवट कोविड रुग्णालय 4, भोकर कोविड रुग्णालय 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 7, मुखेड कोविड रुग्णालय 14, खाजगी रुग्णालय 5 असे एकूण 52 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.82 टक्के आहे.  

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 26, भोकर तालुक्यात 4, हदगाव 1, हिंगोली 1, लोहा 1, माहूर 2, नायगाव 1, परभणी 1 असे एकुण 37 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 4, अर्धापूर तालुक्यात 1, देगलूर 4, मुखेड 2, किनवट 1, नांदेड ग्रामीण 2, भोकर 1, कंधार 1, माहूर 5 असे एकुण 21 बाधित आढळले.  

जिल्ह्यात 324 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 26, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 30, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 19, मुखेड कोविड रुग्णालय 6, देगलूर कोविड रुग्णालय 5, हदगाव कोविड रुग्णालय 6, किनवट कोविड रुग्णालय 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 178, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 32, खाजगी रुग्णालय 19 आहेत.  

शनिवार 12 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 169, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 67 एवढी आहे.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 63 हजार 29

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 38 हजार 205

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 829

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 751

एकुण मृत्यू संख्या-559

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.82 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-5

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-434

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-324

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-18. 

000000

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...