Friday, August 30, 2024

 वृत्त क्र. 783

भटक्या व विमुक्तांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग महत्वाचा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

सेवा देताना माणुसकी व कर्तव्याची भावना आवश्यक

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विविध प्रमाणपत्राचे वाटप

नांदेड दि. 30 ऑगस्ट :- रोजच्या जगण्यासाठी हातावर पोट घेवून संघर्ष करणाऱ्या भटक्या विमुक्तांना शासकीय योजनाचा लाभ मिळावा, त्यांना रहिवासी प्रमाणपत्रा सोबतच इतर सर्व प्रमाणपत्र मिळावेत यासाठी शासन- प्रशासन प्रयत्नशिल आहे. तसेच भटक्या विमुक्तांना शासकीय योजनांचा लाभ मिळून त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग खूप महत्वाचा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. 

आज महाराजस्व अभियानातर्गंत भटक्या व विमुक्त जातीतील लोकांना जातीचे प्रमाणपत्र, रहीवासी व शिधापत्रिका वाटपाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते तहसिल कार्यालयात झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार संजय वारकड, भटके व विमुक्त जाती जमातीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष देविदास हादवे, पारंपारिक वेशभुषा परिधान केलेले वासुदेव, गारुडी, मसणजोगी, जोशी, गोंधळी, पारधी, भोई समाजातील नागरिक आदीची उपस्थिती होती. 

भटक्या विमुक्त जातीतील लोकाकडे कुठलाच पुरावा नसतो. त्यामुळे त्यांना रहीवासी प्रमाणपत्र मिळत नाही. म्हणून ते योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता असते. यासाठी मागील काळात जिल्ह्यातील बळीरामपूर, चौफाळा, लोहा तालुक्यातील किवळा येथे शिबिराचे आयोजन करुन अनेक लोकांना रहीवासी प्रमाणपत्रासोबत इतर आवश्यक प्रमाणपत्राचे वितरण केले आहे. प्रमाणपत्राच्या उपलब्धीमुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येईल. त्यांना सर्व प्रकारचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी त्यांच्यापर्यत पोहोचून ते उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. आजच्या कार्यक्रमातही महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही भटक्या विमुक्तांना आवश्यक ते प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तत्परतेने केली याबाबतही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कौतुक केले.  तसेच सेवा देताना अधिकारी कर्मचारी यांनी माणुसकी आणि कर्तव्याच्या भावनेतून नागरिकांची प्राध्यान्याने कामे करण्यावर भर द्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

तसेच भटक्या विमुक्त जातीतील सुशिक्षित तरुणांनी समाजातील इतर लोकांची पुढे आणण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते 28 शिधापत्रिका, दोन उत्पनाचे प्रमाणपत्र, दोन जणांना रहीवासी प्रमाणपत्र, 9 जणांना जात प्रमाणपत्राचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आहे.    

भटक्या विमुक्त जातीतील लोकांना विविध योजनांचा लाभ मिळावा त्यांना समाजाच्या प्रवाहात येता यावे यासाठी विविध प्रमाणपत्र उपलब्ध होण्यासाठी भटके व विमुक्त जाती जमातीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष देविदास हादवे यांनी खूप परिश्रम घेतले. याबाबत प्रशासनाच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसिलदार संजय वारकड यांनी मनोगत व्यक्त केली.  

00000














 वृत्त क्र. 782

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन 

नांदेड दि. 30 ऑगस्ट :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिन सोमवार 2 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित केला आहे. 

 या दिवशी महसूल,  गृह,  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,  पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.

 लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली आहे.

00000

 वृत्त क्र. 781

नांदेड जिल्ह्यात ड्रोन कॅमेऱ्यासह
मानवनिर्मित वस्तू उडविण्यास प्रतिबंध
 
नांदेड दि. 30 ऑगस्ट :- जिल्ह्यात, शहरात, गुरुद्वारा परिसर व श्री गुरु गोविंदसिंहजी विमानतळाच्या परिसरात 2 सप्टेंबर  रोजी सकाळी 10 वाजेपासून ते 4 सप्टेंबर 2024 च्या मध्यरात्रीपर्यत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
 
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1)  नुसार ड्रोन कॅमेरा, ड्रोन सदृश्य वस्तु व हवेत उडविल्या जाणाऱ्या मानवनिर्मित वस्तू उडविण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे. 4 सप्टेंबर 2024 रोजी अतिमहत्वाच्या व्यक्ती हे नांदेड जिल्हा येथील कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टिने जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी याबाबतचा आदेश  निर्गमीत केला आहे.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...