Friday, January 30, 2026

वृत्त क्र. 153

पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व विक्रीचे ४ ते ६ फेब्रुवारीदरम्यान आयोजन

लोकमान्य मंगल कार्यालयात सकाळी ११ ते सायं. ७ पर्यंत प्रदर्शन खुले

नांदेड, दि. ३० जानेवारी :- सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालयाच्या एमएसएमई विकास कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्यावतीने पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन नांदेड येथील लोकमान्य मंगल कार्यालय येथे दि. ४ ते ६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे.

हे प्रदर्शन व विक्री कार्यक्रम दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी लाभार्थ्यांकडे पीएम विश्वकर्मा आयडी असणे अनिवार्य असून, पात्र लाभार्थ्यांना मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या प्रदर्शन व विक्री उपक्रमातून १८ प्रकारच्या पारंपारिक कारागीर व शिल्पकारांना लाभ मिळणार आहे. यामध्ये कारपेंटर, नाव बनविणारे कारागीर, शस्त्र बनविणारे, मूर्तिकार, मोची, कुंभार, लोहार, कुलूप बनविणारे, हातोडा व टूलकिट तयार करणारे, सोनार, राजमिस्त्री, डाळ बनविणारे, चटई व झाडू बनविणारे, मालाकार, धोबी, टेलर, बाहुली व खेळणी बनविणारे तसेच मासोळीचे जाळे तयार करणारे कारागीर यांचा समावेश आहे. या कारागिरांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री येथे करण्यात येणार आहे.

या प्रदर्शनासाठी नागरिकांसाठी प्रवेश पूर्णतः मोफत असल्याची माहिती एमएसएमई विकास कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या माहिती शाखेने दिली आहे.

अधिक माहितीसाठी

गौरव यादव – ८६००८४२६०१,

नीरज कुमार देशपांडे – ७०५३१२५५९१,

के. जे. कांबळे – ८४२१५९२९९५,

राजकुमार – ८२९८६३२१४५

यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

0000




 वृत्त क्र. 152

शासकीय तंत्रनिकेतन येथे रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त परिसंवाद संपन्न

नांदेड, दि. ३० जानेवारी :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने शासकीय तंत्रनिकेतन येथे रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त परिसंवाद कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनुश्री केंद्रे, मोटार वाहन निरीक्षक हेमंत साळुंखे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रेणुका राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मार्गदर्शन सत्रात विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे महत्त्व, प्रशासकीय जबाबदाऱ्या तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्य करण्यासाठी आवश्यक कौशल्यांबाबत सखोल माहिती देण्यात आली. रस्ता सुरक्षा, नागरिकांशी संवाद, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रामाणिक प्रशासन यांचे महत्त्व अधिकाऱ्यांनी अधोरेखित केले.

तसेच स्पर्धा परीक्षा, प्रत्यक्ष कामातील अनुभव आणि भविष्यातील करिअर संधी यावरही विद्यार्थ्यांशी सविस्तर संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मार्गदर्शकांनी समाधानकारक उत्तरे दिली.

या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एल. कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. बैठक व्यवस्था प्रा. एस. जी. अन्नमवाड यांनी केली, तर सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. बी. बी. कपूर यांनी केले.

कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेल्या क्विझ स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना आरटीओ कार्यालयाकडून मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाच्या वतीने मार्गदर्शक अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

00000

जीस वैलनेस क्लब अंबरनाथ की पौलमी कुलकर्णी जी आप सभी को श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के ३५०वें शहीदी समागम के लिए आमंत्रित करती हैं। महाराष्...