Tuesday, May 5, 2026

वृत्त क्रमांक 

मधाचे गाव भंडारवाडी प्रशिक्षण दिलेल्या मधपाळाना साहित्यांचे वाटप

नांदेड दि. 5 मे :- नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मधाचे गाव भंडारवाडी येथे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 30 मधपाळ लाभार्थ्यांना आग्या मधमाशा मधसंकलन (बी हन्टर्स) किट व सातेरी वसाहती संगोपनासाठी मधपेट्या वाटपाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबईचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) रवींद्र साठे व मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार डांगर यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. 

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता श्रीराम पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी संजय सारंगधर, प्रमुख पाहुणे म्हणून भंडारवाडीचे सरपंच अभिमान गादेवाड, ज्ञानेश्वर जेवलेवाड, ग्रामसेवक प्रियंका डुडुळे, औद्योगिक पर्यवेक्षक रमेश यादव यांच्यासह गावकरी व प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती होती. 

गावातील प्रशिक्षित लाभार्थी यांनी आग्या मधमाशा मध संकलन शास्त्रोक्त पध्दतीने मध गोळा करण्याचे काम मोठया प्रमाणात सुरु केले आहे. उत्पादित झालेला मध विविध शासकीय मेळावे, कृषी प्रदर्शन तसेच मुंबई येथील महालक्ष्मी सरस मधाचे स्टॉलवर मधाचे गाव भंडारवाडी या ब्रँडचा मध बॉटलिंग लेबलिंग पॅकीग करुन विक्री करण्यात येत आहे. या गावातील लोकांना आग्या माशा किट 6 व सातेरी मधपेट्या 60 असे एकूण 4 लाख 79 हजार 213 एवढया रकमेचे 90 टक्के अनुदानावर साहित्य वाटप करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी योजनेची विस्तृत माहिती दिली. तसेच सामाईक सुविधा केंद्र बांधकामास सुरुवात करण्यात आली अशा प्रकारे कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

00000

वृत्त क्रमांक 

नांदेड जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणासाठी ५१.५८ कोटींचा कृती आराखडा 

पाणी टंचाई निवारणासाठी प्रशासन सज्ज

नांदेड, दि. 5 मे — जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन सन 2025-26 या कालावधीसाठी व्यापक कृती आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला असून, जानेवारी ते मार्च 2026 आणि एप्रिल ते जून 2026 या कालावधीसाठी एकूण सुमारे ५१.५८ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

जिल्ह्यात पाणी टंचाई उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

जिल्हास्तरावर पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ग्रामीण व शहरी भागासाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानुसार ग्रामीण भागासाठी 24.17 दलघमी, नांदेड महानगरपालिका क्षेत्रासाठी 49.04 दलघमी, तर नगर परिषद क्षेत्रासाठी 26.761 दलघमी असे एकूण 99.971 दलघमी पाणी विविध धरणे व जलाशयांमध्ये आरक्षित करण्यात आले आहे.

पाणी टंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांनाही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये 271 नळयोजना विशेष दुरुस्ती, 104 तात्पुरत्या पूरक नळयोजना, 534 नवीन विंधण विहिरी, तसेच 13 विहिरींचे खोलकरण व गाळ काढण्याच्या कामांचा समावेश आहे. अशा एकूण 922 उपाययोजना मंजूर करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, 4 मे 2026 पर्यंत जिल्ह्यातील गावे, वाड्या व तांड्यांना 58 विहीर/बोअरवेल अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरू असून सध्या एकही टँकर सुरू करण्यात आलेला नाही.

प्रशासनाकडून पाणी टंचाई टाळण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना राबवण्यात येत असून, नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यावर भर दिला जात आहे.

०००००

 वृत्त क्रमांक 

जनगणनेसाठी नांदेड तहसील प्रशासन सज्ज

स्वगणना सुरू तर 16 मे ते 14 जूनपर्यत होणार घरांची नोंदणी

नांदेड दि. 5 मे:- भारत सरकारतर्फे भारताची जनगणना अंतर्गत जनगणना 2027 ही देशव्यापी महत्त्वपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना स्वगणना (Self Enumeration) तसेच प्रत्यक्ष घरभेटीद्वारे होणाऱ्या लोकसंख्या गणनेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे. 

जनगणना ही देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असून, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती, शासकीय योजना यांचे प्रभावी नियोजन यासाठी अचूक लोकसंख्येची माहिती आवश्यक असते.

स्वगणना (Self Enumeration) 

नागरिकांनी उपलब्ध करून देण्यात आलेल्या अधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे स्वतःची व कुटुंबाची माहिती अचूक व वेळेत भरावी. स्वगणना ही सोपी, सुरक्षित व वेळ वाचवणारी प्रक्रिया आहे. योग्य माहिती देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

भारताची जनगणना 2027 ची सुरुवात स्व जनगणनेद्वारे दिनांक 1 मे 2026 पासून सुरु झाली आहे. स्व जनगणना ही 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीमध्ये सर्वांनी करून घ्यावी. स्वगणना म्हणजे स्वतःच्या कुटुंबाची माहिती स्वतः नोंदविणे ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे यात आपण आपली व आपल्या कुटुंबाची अचूक माहिती नोंदवण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावी त्यासाठी जनगणना संचालनालयाने  https://se.census.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ तयार केले आहे. स्वगणनेचे टप्पे खालील प्रमाणे आहेत. 

वरील संकेतस्थळावर लॉग इन करा. आपले राज्य व आवश्यक माहिती भरा 2.कुटुंबप्रमुखाचा मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी नोंदवा. मोबाईल नंबर प्रत्येक कुटुंबासाठी वेगवेगळ्या वापरावा एकदा नोंदणी केलेला मोबाईल नंबर पुन्हा बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी. 3.आपल्या सोयीची भाषा निवडा आणि मोबाईलवर आलेला ओटीपी नमूद करा. 4.स्थानाबाबत जिल्हा तालुका शहर व स्थानिक माहिती अचूक भरा .

नकाशावर आपल्या घराचे अचूक स्थान मार्क करा .6 .प्रश्नावली भरा कुटुंब प्रमुख कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती व्यवस्थित भरा. 

भरलेली माहिती पुन्हा तपासा आणि आवश्यकता भासल्यास दुरुस्ती करा 8 फायनल सबमिट करा. त्यानंतर आपल्याला एक कोड नंबर प्राप्त होईल ज्याला आपण SE ID म्हणतो तो आपण जतन करून ठेवावा अथवा स्क्रीन शॉट काढून ठेवावा. तुम्हाला ई-मेलवर व टेक्स्ट मेसेज सुद्धा याचा प्राप्त होईल.

यानंतरच्या टप्प्यात दिनांक 16 मे नंतर जनगणना प्रगनक आपल्या घरी भेट देऊन माहितीशी पडताळणी करतील. त्यांना अचूक माहिती तुम्ही देणे आवश्यक आहे. त्यावेळी आपण त्यांना स्वगणना केल्यानंतर जो SE ID प्राप्त झाला आहे तो प्रगनकाला द्यावा. 

दिनांक 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीमध्ये घरांची  माहिती घर नोंदणी व निवास माहिती House Listing टप्पा पार पडणार आहे व फेब्रुवारी 2027 मध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या मोजणी होणार आहे. 

नांदेड तालुक्यामध्ये महानगरपालिका क्षेत्राची जनगणनाबाबत प्रक्रिया नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्यामार्फत राबविली जाणार आहे. नांदेड ग्रामीणची जनगणना नांदेड तहसील कार्यालयामार्फत राबविली जाणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण जनगणनेसाठी प्रशासकीय पूर्ण तयारी झाली आहे. नांदेड ग्रामीणमध्ये 275 प्रगनक व 50 पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे चार टप्प्यात प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. 

नागरिकांनी स्व जनगणना त्याचा लाभ 15 मे पर्यंत घ्यावा व 16 मे पासून प्रत्यक्ष प्रगनक आपल्या घरी आल्यावर आवश्यक ते सहकार्य त्यांना करावे असे आवाहन चार्ज अधिकारी तथा  तहसीलदार नांदेड संजय वारकड यांनी केले आहे.

000000

 वृत्त क्रमांक 

इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेचे

आवेदन पत्र भरण्याचे आवाहन

नांदेड दि. 5 मे :- इयत्ता बारावीची परीक्षा फेब्रु-मार्च 2026 परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुरवणी परीक्षा जून-जुलै 2026 मध्ये घेण्यात येणार आहे. इयत्ता 12 वी परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच (फेब्रु-मार्च 2026 परीक्षेस प्रविष्ठ न झालेले ) जून-जुलै 2026 नावनोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit  घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने इ. 12 वी साठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावेत, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी केले आहे.

शुल्क प्रकार विद्यार्थ्यांनी उच्च माध्य.शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत पुनर्परीक्षार्थी , यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (परीक्षेस प्रविष्ठ न झालेले) श्रेणी सुधार व तुरळक विषय घेवून प्रविष्ठ होणारे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit  घेणारे विद्यार्थी ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा, नियमित शुल्क मंगळवार 5 मे ते शुक्रवार 15 मे 2026  पर्यत आहेत. विलंब शुल्क शनिवार 16 मे ते बुधवार 20 मे 2026 असा आहे.

उच्च माध्यमिक शाळांनी/कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत आरटीजीएस व एनईएफटीद्वारे शुल्क भरावयाच्या तारखा, गुरुवार 21 मे 2026, उच्च माध्य.शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी आरटीजीएस व एनईएफटी पावती, चलनासह प्रीलीस्ट विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख सोमवार 25 मे 2026 अशी आहे.

या परीक्षेचे आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांची त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाइन आवेदनपत्रे भरण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल. श्रेणीनुसार विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अटी व शर्तीनुसार श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या फेब्रु-मार्च 2026 परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी जून- जुलै 2026, फेब्रुवारी-मार्च 2027 व जून-जुलै 2027 अशा लगतच्या तीन संधी उपलब्ध राहतील यांची नोंद घ्यावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ शाळा महाविद्यालयांनी मंडळाच्या अधिकृत वेबसाईट द्वारे प्राप्त ऑनलाइ्रन चलनावर नमूद केलेल्या आयसीआयसीआय बॅकेच्या र्व्हचुअल खात्यामध्ये कोणत्याही बँकेमधून आरटीजीएस व एनईएफटीद्वारे चलनाप्रमाणे अचूक शुल्क रकमेचा भरणा करण्यात यावा. यापूर्वी वापरात असणाऱ्या बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, ॲक्सीस बँक च्या जून्या चलनांचा वापर करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे मंडळात रोचा स्वरुपात शुल्क स्विकारले जाणार नाही. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी सादर केलेल्या सर्व आवेदनपत्रांचे विहित परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांची प्रवेशपत्रे उपलबध करुन दिली जाणार नाहीत. नियमित व विलंब शुल्काने आवेदनपत्रे ऑनलाइ्रन पध्दतीने सादर करावयाच्य तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. अति विलंब शुल्काने आवेदनपत्रे भरण्याच्या तारखा यथावकाश कळविण्यात येतील. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

वृत्त क्रमांक   जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत  नांदेड दि. 6 मे :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिक...