Wednesday, March 10, 2021

 

कोविड-19 च्या अनुषंगाने महाशिवरात्री निमित्त मार्गदर्शक सूचना

नांदेड (जिमाका) दि. 10 :- शासनाने कोव्हिड-19 च्‍या अनुषंगाने यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्‍सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्‍यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्‍या राज्‍यात तसेच मोठया शहरांमध्‍ये रूग्‍णांच्‍या संख्‍येत पुन्‍हा वाढ होताना दिसत आहे. त्‍यामुळे उद्भवलेल्‍या परिस्थितीचा विचार करता यावर्षी गुरुवार 11 मार्च 2021 रोजी महाशिवरात्री हा उत्‍सव अत्‍यंत साधेपणाने साजरा करणे आवश्‍यक असल्‍याने शासनाने पुढील सात मागर्दशक सूचनेनुसार कार्यवाही करण्‍याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 नुसार संपूर्ण नांदेड जिल्ह्याच्या हद्दीत गुरुवार 11 मार्च 2021 रोजी महाशिवरात्री या उत्‍सव संदर्भात पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत. 

महाशिवरात्री हा भारतातील पवित्र उत्‍सवांपैकी एक मोठा उत्‍सव मानला जातो. देशभरात हिंदू धर्मीय लोक महाशिवरात्री मोठया उत्‍साहाने साजरी करतात. नांदेड जिल्‍ह्यातील काळेश्‍वर, गंगनबीड, शिवमंदिर चैतन्‍यनगर नांदेड, मरळक व इतर विविध ठिकाणी असलेल्‍या शिवमंदिरात दरवर्षी संपूर्ण नांदेड जिल्‍ह्यातून शिवभक्‍त दर्शनाकरिता मोठया प्रमाणात गर्दी करीत असतात. परंतू यावर्षी कोविड-19 च्‍या संसर्गजन्‍य परिस्थितीचा विचार करता महाशिवरात्री उत्‍सव अत्‍यंत साधेपणाने साजरा करणे आवश्‍यक आहे. त्‍या अनुषंगाने सर्व मंदीर विश्‍वस्‍त / व्यवस्‍थापक यांनी मंदिरात देवदर्शनासाठी गर्दी होणार नाही व सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन होईल याकडे विशेष लक्ष देणे बंधनकारक राहील. 

दरवर्षी महाशिवरात्रीच्‍या निमित्‍ताने शिवमंदिरात मोठया प्रमाणात पुजाअर्चा केली जाते व दर्शनासाठी अनेक भाविक त्‍याठिकाणी गर्दी करीत असतात. परंतू यावर्षी कोविड-19 च्‍या संसर्गजन्‍य परिस्थितीचा विचार करता भाविकांनी घराबाहेर न पडता शक्‍यतो घरात राहूनच पूजाअर्चा करावी, यासाठी प्रशासनाकडून स्‍थानिक लोकप्रतिनिधी तसेच स्‍वंयसेवी संस्‍था यांच्‍या सहाय्याने प्रतिबंधात्‍मक उपाययोजना व जनजागृती करावी.    

कोविड-19 चा संसर्ग टाळण्‍यासाठी प्रत्‍येक शिवमंदिराच्‍या आतील बाजूस सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन होण्‍याच्‍या दृष्‍टीने एकावेळी फक्‍त 50 भाविक दर्शन घेतील, यादृष्‍टीने संबंधित विश्‍वस्‍त अथवा व्‍यवस्‍थापक यांनी योग्‍य त्‍या उपाययोजना कराव्‍यात. तसेच मंदिर व्‍यवस्‍थापनाने आजूबाजूच्‍या परिसरात निर्जंतुकीकरणाची व्‍यवस्‍था, सोशल डिस्‍टन्सिंग व स्‍वच्‍छतेचे नियम (मास्‍क, सॅनीटायझर इत्यादी) चे पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे.  

महाशिवरात्रीच्‍या दिवशी मंदिराच्‍या परिसरात हार व फुले विक्रेते यांची गर्दी होणार नाही तसेच सोशल डिस्‍टन्सींगच्‍या नियमाचे तंतोतंत पालन होईल याकडे मंदीराचे व्‍यवस्‍थापक व स्‍थानिक प्रशासन यांनी विशेष लक्ष द्यावे. त्‍याचप्रमाणे महाशिवरात्री उत्‍सवाच्‍या निमित्ताने संबंधित स्‍थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्‍वरूपाचे मंडप उभारावेत. 

प्रत्‍यक्ष मंदिरात येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी स्‍वतःहून मास्‍कचा वापर व सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन करावे. जेष्‍ठ नागरीक व लहान मुलांना मंदिरात दर्शनाकरीता आणू नये. महाशिवरात्री निमित्‍त शिवमंदिरातील व्‍यवस्‍थापक यांनी दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्‍यादीद्वारे उपलब्‍ध करून द्यावी. कोवीड-19 च्‍या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाच्‍या मदत व पुनर्वसन, आरोग्‍य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्‍थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्‍या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्‍यक्ष सण सुरू होण्‍याच्‍या मधल्‍या  कालावधीत अजून काही सूचना  प्रसिध्‍द झाल्‍यास त्‍यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील. 

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्‍काळ कार्यवाही करण्‍यात यावी. आदेशाचे पालन  न करणाऱ्या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्‍या कृत्‍यासाठी कोणत्‍याही अधिकारी, कर्मचारी यांचेविरुध्‍द कार्यवाही केली जाणार नाही, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 10 मार्च 2021 रोजी निर्गमीत केले आहेत.

00000

 

दुष्काळग्रस्त / टंचाईग्रस्त भागातील इयत्ता दहावी व बारावीच्या

विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती योजनेबाबत आवाहन    

नांदेड (जिमाका) दि. 10 :- सन 2017-18 व 2018-19 मधील खरीप हंगामातील / दुष्काळग्रस्त भागातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा शुल्क माफीस पात्र तथापि अद्याप परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती झालेली नाही अशा विद्यार्थ्यांनी स्वत:च्या / पालकाच्या आधार संलग्न बॅक खात्याच्या माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.   

तसेच सन 2019-20 मधील अवेळी पावसामुळे बाधित क्षेत्रातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या कार्यवाहीसाठी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित करण्यात आले आहे. संबंधितांनी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा. याबाबतची तपशीलवार माहिती मंडळाच्या http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर इयत्ता दहावीसाठी http://feerefund.mh-ssc.ac.in व इयत्ता बारावीसाठी http://feerafund.mh-hsc.ac.in या लिंकवर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असेही आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

0000

 

शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल सुरु

विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 10, (जिमाका) :- भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क तसेच व्यावयासिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजनेंतर्गत शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल सुरु झाले आहे. महाडिबीटी पोर्टलवर अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 आहे. जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत महाविद्यालयाचे प्राचार्य व महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे. 

सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील ज्या महाविद्यालयातील प्रवेशीत विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज अद्यापपर्यंत www.mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज भरावेत. आवश्यक त्या कागदपत्रासह हे अर्ज आपल्या महाविद्यालयात सादर करावे. महाविद्यालयानी आपल्या महाविद्यालयातील सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत आपल्या स्तरावरुन विद्यार्थ्यांना तात्काळ कळवावे. तसेच महाडिबीटी पोर्टलवर अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 31 मार्च 2021 हा आहे. 

सन 2019-20 व 2020-21 या शैक्षणिक वर्षात ज्या महाविद्यालयातील प्रवेशीत विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले आहे त्या महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सदर विद्यार्थी पात्र असल्याची खात्री करुन सर्व आवश्यक कागदपत्राची पडताळणी करुन पुढील कार्यवाही तात्काळ करावी. हे पात्र अर्ज कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयाच्या लॉगीनवर प्रलंबित ठेवू नयेत, असे झाल्यास विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहिल, असेही आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजश माळवदकर यांनी केले आहे.

00000

 

नांदेड जिल्ह्यात 219 व्यक्ती कोरोना बाधित तर

1 हजार 360 अहवालापैकी 1 हजार 132 निगेटिव्ह

नांदेड (जिमाका) दि. 10 :- बुधवार 10 मार्च 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 219 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 56 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 163 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 80  कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

 

आजच्या 1 हजार 360 अहवालापैकी 1 हजार 132 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 25 हजार 190 एवढी झाली असून यातील 23 हजार 121 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 247 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 32 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 607 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 23, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 41, किनवट कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 15 असे एकूण 80 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 91.78 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 30,  किनवट तालुक्यात 6, माहूर 2, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 6, लोहा 1, मुदखेड 10 असे एकूण 56 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 127, अर्धापूर तालुक्यात 5, देगलूर 1, हदगाव 6, लोहा 4, मुखेड 5, परभणी 1, नांदेड ग्रामीण 2, भोकर 2, धर्माबाद 3, किनवट 4, माहूर 1, यवतमाळ 1, नागपूर 1 असे एकूण 163 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 1 हजार 247 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 53, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 80, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 57, किनवट कोविड रुग्णालयात 31, मुखेड कोविड रुग्णालय 21, हदगाव कोविड रुग्णालय 9, महसूल कोविड केअर सेंटर 68, देगलूर कोविड रुग्णालय 5, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 589, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 225, खाजगी रुग्णालय 109 आहेत.

 

बुधवार 10 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 135, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 16 एवढी आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 43 हजार 902

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 14 हजार 185

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 25 हजार 190

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 23 हजार 121

एकुण मृत्यू संख्या-607

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 91.78 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-07

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-270

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-1 हजार 247

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-32.

0000

 

महाशिवरात्री निमित्त शेतकरी ते ग्राहक थेट फळ विक्री महोत्सवाचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 10 :-  राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत विकेल ते पिकेल धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत महाशिवरात्री निमित्त फळे विक्रीचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकताच करण्यात आला. या महोत्सवाला ग्राहकांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत असून येथे फळांची विक्री मोठया प्रमाणावर होत आहे.  

जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरु असलेल्या शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्रात सुमारे दहा शेतकरी गटांनी विविध प्रकारची फळे थेट विक्रीसाठी ठेवली आहेत. हा महोत्सव 9 ते 12 मार्च 2021 या कालावधीत सकाळी 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत सुरु रहाणार आहे. याठिकाणी टरबूज, खरबूज, पपई, चिकू, मोसंबी, स्ट्रॉबेरी, पेरु, रताळी इत्यादी उत्पादने विक्रीसाठी शेतकऱ्यांनी ठेवली आहेत. 

या फळे विक्री शुभारंभ प्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, कृषि उपसंचालक श्रीमती माधुरी सोनवणे, उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव, नांदेड तालुका कृषि अधिकारी एस. बी. मोकळे, अर्धापूर तालुका कृषि अधिकारी अर्धापूर ए. एन. शिरफुले, हदगाव तालुका कृषि अधिकारी आर. डी. रणवीर, तालुका लोहा कृषि अधिकारी ए. जी. घुमनवाड, मंडळ कृषि अधिकारी एस. एम. सावंत, लिंबगाव मंडळ कृषि अधिकारी पी. एस. पाटील, आत्माअंतर्गत सर्व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन, कृषि सहाय्यक व शेतकरी गटाचे सदस्य उपस्थित होते.  

00000



  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...