Thursday, November 5, 2020

 

जलतरण तलाव स्विमींगपूल योगा प्रशिक्षण संस्‍था इन्‍डोअर हॉलमधील

खेळाच्‍या प्रकारास सिनेमा हॉल थिएटर मल्‍टीप्‍लेक्‍सेस सुरु ठेवण्यास परवानगी 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- जलतरण तलाव स्विमींगपूल, योगा प्रशिक्षण संस्‍था, इन्‍डोअर हॉलमधील  खेळाच्‍या प्रकारास, सिनेमा हॉल, थिएटर, मल्‍टीप्‍लेक्‍सेस इत्‍यादींना 5 नोव्हेंबर 2020 पासून सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहे. 

या आदेशात नमूद केले आहे की कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील जलतरण तलाव (स्विमींगपूल),योगा प्रशिक्षण संस्‍था, इन्‍डोअर हॉलमधील खेळाच्‍या प्रकारास, सिनेमा हॉल, थिएटर,मल्‍टीप्‍लेक्‍सेस इत्‍यादींना खालील अ‍टी व शर्ती च्‍या अधिन राहून 5नोव्हेंबर 2020 रोजी पासून परवानगी देण्‍यात येत आहे. जे जलतरण तलाव (स्विमींगपूल)राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्‍तरावरील खेळाडूंना प्रशिक्षण देण्‍याकरींता वापरले जातील असे जलतरण तलाव (स्विमींगपूल) दिनांक 5नोव्हेंबर 2020 रोजी पासून चालू ठेवण्‍यास परवानगी देण्‍यात येत आहे. योगा प्रशिक्षण संस्‍था 5नोव्हेंबर 2020 रोजी पासून चालू ठेवण्‍यास परवानगी देण्‍यात येत आहे. सर्व प्रकारचे इन डोअर गेम्‍स जसे बॅडमिंटन,टेनिस, स्क्वॅश, नेमबाजी, इत्‍यादींना शारिरीक अंतर व स्‍वच्‍छतेचे सर्व नियम पाळून 5 नोव्हेंबर 2020 रोजी पासून चालू ठेवण्‍यास परवानगी देण्‍यात येत आहे. सिनेमा हॉल/थिएटर/मल्‍टीप्‍लेक्‍सेस इ.त्‍यांच्‍या क्षमतेच्‍या 50 टक्के  क्षमतेसह 5नोव्हेंबर 2020  पासून चालू ठेवण्‍यास परवानगी देण्‍यात येत आहे. परंतु सिनेमा हॉल, थिएटर,मल्‍टीप्‍लेक्‍सेस इ. मध्‍ये प्रेक्षकांना खाद्य पदार्थ नेण्‍यास परवानगी राहणार असणार नाही. 

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 4 नोव्हेंबर रोजी निर्गमित केले आहे.

00000

 

 

कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे

नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात

नांदेड (जिमाका) दि. 5 :- जिल्हात जुलै ते ऑक्टोबर महिन्यामध्ये  बोंडअळी प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून आला आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये वातावरण गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक आहे. त्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील दिवसात गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

 

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भावासाठी कपाशी पिकाचे नियमित सर्वेक्षण करून खालील उपाययोजना कराव्यात. फेरोमन सापळ्याचा वापर करावा. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमोन सापळे लावावे.  सतत तीन दिवस या सापळ्यामध्ये आठ ते दहा पतंग आढळल्यास  गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावे. फुलावस्थेत दर आठवड्याने पिकामध्ये मजुरांच्या सहायाने डोमकळ्या (गुलाबी बोंडअळी ग्रस्त फुले) शोधून नष्ट कराव्या. ३. ५ टक्के निंबोळी  अर्क किंवा ॲझाँडिरेक्टीन ०.०३ (३०० पीपीएम ) ५० मिली किंवा ०.१५ टक्के (१५००पीपीएम ) २५ मिली  प्रति १० ली पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

प्रत्येक आठवड्याला एकरी शेतीचे प्रतिनिधीत्व करतील अशी २० झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील मध्य आकाराचे झालेले बाहेरुन किडके नसलेले एक बोंड असे २० बोंडे तोडून ते भुईमुगाच्या शेंगाप्रमाणे दगडाने टिचवून त्यामधील किडक बोंड व आळ्याची संख्या मोजून ती दोन किडक बोंड किंवा दोन पांढुरक्या, गुलाबी रंग धारण करीत असलेल्या अळ्या आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी (५ ते १० टक्के) समजून पुढील सांगितल्याप्रमाणे  रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी. थायोडीकार्ब ७५ टक्के WP २५ ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के एएफ २५ मिली किंवा क्लोरपायरीफॉस २५ टक्के प्रवाही २५ मिली किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्के ३० मिली किंवा इंडोक्साकार्ब १५.८ टक्के १० मिली किंवा डेल्टामेथ्रीन २.८ टक्के १० मिली या पैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती १० लिटर पाण्यातमिसळून फवारणी करावी. जेथे प्रादुर्भाव १० टक्केच्यावर आहे. अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये, म्हणून पुढील कोणत्याही एका मिश्र कीटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ट्रायझोफॉस ३५ टक्के अधिक डेल्टामेथ्रीन १ टक्के १७ मिली किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल ९.३ टक्के अधिक लॅब्डासायहॅलोथ्रीन ४.६ टक्के ५ लिली किंवा क्लोरपायरीफॉस ५० टक्के अधिक सायपरमेथ्रीन ५ टक्के २० मिली किंवा इंडोक्झाकार्ब १४.५ टक्के अधिक ॲसीटामाप्रिड ७.७ टक्के १० मिली याप्रमाणे पुढील दिवसात गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण अशा प्रकारे करावे, असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 

जिल्ह्यात 12 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे  12 डिसेंबर 2020 रोजी नांदेड येथील जिल्हा न्यायालय, जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे . या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे श्रीराम रा. जगताप, व न्यायाधीश जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. एस. रोटे यांनी केले आहे.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, मो.अ.दावा, भूसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज, तसेच बॅंकांची प्रकरणे इत्यादी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे या लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत. या लोक अदालतीत विद्युत कंपनी, विविध बॅंका, भारत संचार निगम यांचे थकीत बाकी येणे बाबतची दाखल पुर्व प्रकरणे तसेच, विविध मोबाईल कंपन्यांचीही थकित रकमेबाबतची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.  

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्हयातील सर्व विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे श्रीराम रा. जगताप व न्यायाधीश जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. एस. रोटे यांनी केले असुन सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सर्व संबंधित पक्षकारांनी 12 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवुन आलेल्या संधीचा लाभ घ्यावा असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

 

जिल्हाधिकारी कार्यालयात

मंगळवारी पेन्शन अदालत 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- जिल्हाधिकारी कार्यालयात माहे नोव्हेंबरच्या दुसऱ्या मंगळवारी 10 नोव्हेंबर 2020 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. 

जिल्ह्यामधील महसूल विभागातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 

59  बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

51 कोरोना बाधितांची भर  तर एकाचा मृत्यू 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 59 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 51 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 31 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 20 बाधित आले. 

आजच्या एकुण 926 अहवालापैकी  771 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता  19 हजार 337 एवढी झाली असून यातील  18  हजार 199 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 453 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 34 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

आज रोजी प्राप्त अहवालानुसार एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यशवंतनगर नांदेड येथील 65 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 519 झाली आहे.

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 19, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 16, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 5, खाजगी रुग्णालय 6, नायगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 7, बिलोली कोविड केअर सेटर व गृहविलगीकरण 2 असे एकूण 59 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.11 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 31 असे एकुण 31 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 12, हदगाव तालुक्यात 1, लातूर 3, नांदेड ग्रामीण 2, अर्धापूर तालुक्यात 2,  असे एकूण 20 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 453 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 75, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 33, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 41, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 140, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 4, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 24, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 10, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 7, लोहा कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 7, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 21, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 12, बारड अंतर्गत गृह विलगीकरण 1, धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, हिमायतनगर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3, कंधार तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, मांडवी अंतर्गत गृह विलगीकरण 1, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 15, मुदखेड तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 2, खाजगी रुग्णालय 52 आहेत.  

गुरुवार 5 नोव्हेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 139, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 71 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 18 हजार 803

निगेटिव्ह स्वॅब- 95 हजार 990

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 337

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 199

एकूण मृत्यू संख्या- 519

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.11 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 451

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 453

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले 34. 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

0000

 

निसर्गाच्या अन्न साखळीत मानवा इतकेच

पक्षांचेही योगदान महत्वाचे

-         उपवनसंरक्षक राजेश्वर सातेलीकर 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- कोणत्याही नदीचा काठ अथवा किनारा प्रत्येकाला आत्ममग्न होऊन चिंतन करायला लावल्या शिवाय सोडत नाही. येथील गोदावरीचा काठही त्याच भावविश्वाला वाहता करणारा. तुम्ही कोणत्याही वेळेत काठावर पोहचा, तीच ऊर्जा आपल्याला मिळेल. आज गोदावरीच्या काठावर नदीच्या ऊर्जेसह निसर्ग, प्राणी, पशू-पक्षी आणि विशेषत: पर्यावरणावर निस्सीम प्रेम करणाऱ्या नांदेडकरांचा गोतावळा जमल्याने एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली. निमित्त होते पक्षी सप्ताहाचे. या सप्ताहानिमित्त आयोजित पक्षी निरीक्षण उपक्रमानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपवनसंरक्षक राजेश्वर सातेलीकर, भा.व.से. च्या प्रोबेशनरी अधिकारी मधुमिता, आनंदीदास देशमुख, डॉ. देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, छायाचित्रकार विजय होकर्णे व निसर्गप्रेमी उपस्थितीत होते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पक्षी सप्ताहानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

 

महाराष्ट्रातील वन्यजीव विषयक साहित्य निर्मितीत आग्रणी असलेले साहित्यीक व सेवानिवृत्त वनअधिकारी मारोती चित्तमपल्ली यांचा जन्मदिवस तर याच सप्ताहात 12 नोव्हेंबरला भारतीय पक्षी विश्वाचा अभ्यास जागतिक पातळीवर नेऊन पोहचविणारे पद्मभुषण स्व. डॉ. सलीम अल्ली यांची 12 नोव्हेंबर रोजी असलेली जयंती. या दोन्ही दिग्गजांच्या जीवन कार्याला व त्यांनी पक्षी अभ्यासात दिलेल्या अमुल्य योगदानाचा गौरव म्हणून महाराष्ट्रात दि. 5 ते 12 नोव्हेंबर या सात दिवसांच्या कालावधी पक्षी सप्ताह म्हणून सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो.

 

इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नांदेड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संपन्नता व वनसंपदा लाभली आहे. या वनसंपदेत सर्व प्रकारचे पक्षी आपणास येथे आढळून येतात. पक्षांची ओळख करुन घेणे हे त्यांच्या अस्तीत्वाला समजून घेण्यासारखे आहे. अन्न साखळीत मानवाचे जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व पक्षांचे आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन उपवनसंरक्षक राजेश्वर सातेलीकर यांनी केले. या पक्षी सप्ताहात आपण नांदेड जिल्ह्यातील 12 वनपरिक्षेत्रात विविध उपक्रम राबवित असल्याचेही त्यांनी सांगितले. किनवट तालुक्यातील इस्लापूर परिक्षेत्रात भा.व.से. च्या प्रोबेशनरी अधिकारी मधुमिता यांनी आदर्श असे काम केले आहे. त्या परिक्षेत्रावर पक्षीप्रेमींनी आवर्जून भेट देऊन पाहणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. निसर्गाची साखळी पूर्ण करण्यात पक्षांचा खूप मोठा सहभाग आहे हे आपण विसरता कामा नये, असे मधुमिता यांनी सांगून त्यांच्या संवर्धनासाठी पुढे सरसावले पाहिजे, असे आवाहन केले. 

निसर्गाचे निरीक्षण हा ध्यानधारणेशी जवळीकता साधणारा मार्ग असून आपणही या निसर्गाचा, चराचराचा एक भाग आहोत याची प्रचिती होते. निसर्गाकडे जेंव्हा आपण नम्र होऊन जाऊन तेंव्हा प्रत्येकवेळी आपल्याला तो नवीन ऊर्जा देईल, असे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी सांगून नांदेड जिल्ह्यातील सर्व पक्षीमित्र, छायाचित्रकार व संयोजकांचे अभिनंदन केले. पक्षीमित्र व छायाचित्र संघटनेच्यावतीने छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी कार्यक्रमाचे समर्पक संचलन करुन सर्वांचे आभार मानले.   

00000






  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...