Thursday, June 6, 2024

वृत्त क्र. 468

बियाणे, खते व किटकनाशकांची अनधिकृत विक्री व साठा केल्यास सक्त कारवाई : जिल्हाधिकारी

· खरीप हंगामासाठी कृषी विभागाची तयारी पूर्ण

· शेतकऱ्यांनी एकाच प्रतीच्या बियाणांचा आग्रह धरु नये

· जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या शुभेच्छा

नांदेड दि 6 जून : जिल्ह्यात खरीप हंगामाची पूर्व तयारी सुरु झाली असून पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे.  जिल्ह्यात खते, बियाणे, किटकनाशके मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने तयारी पूर्ण केली आहे. या अनुषंगाने बाजारात जर बियाणे, खते व किटकनाशके बोगस किंवा अनधिकृत विक्री व साठा केल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. 

खरीप हंगाम पूर्व तयारीबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय बेत्तीवार,  तहसिलदार, गटविकास अधिकारी, मोहिम अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती , रासायनिक खत पुरवठा कंपनी प्रतिनिधी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, बियाणे पुरवठादार कंपनीचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.

सर्व कृषी केंद्रावर कृषी सहाय्यकांची नेमणूक करावी. जिल्ह्यात कुठेही बियांणाची साठेबाजी व अनधिकृत बियाणाची विक्री होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कृषी विभागाला दिल्या. याबाबत जिल्ह्यात भरारी पथकाची नेमणूक केली आहे. त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यास तात्काळ कारवाई करण्याचे, निर्देश त्यांनी यावेळी दिले.

तसेच शेतकऱ्यांनी एकाच प्रतीच्या वाणाचा आग्रह धरु नये. रासायनिक खतांचा वापर मर्यादित स्वरुपात करावा. तसेच सोयाबीनचे बियाणे घरघुती वापरताना त्यांची उगवण क्षमता तपासून घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.  शेवटी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या शुभेच्छा दिल्या.

सुरवातीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील उपलब्ध निविष्ठा बाबत माहिती सांगितली. सर्वानी सोयाबिन पेरणीबाबत बीबीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी विकास अधिकारी  विजय बेत्तीवार यांनी जिल्ह्यातील उपलब्ध खतसाठा, कंपनीनिहाय कापूस बियाणांची उपलब्धता याबाबत माहिती दिली. जिल्ह्याच्या एकूण मागणीच्या ८० टक्के कापूस बियाणे उपलब्ध असल्याबाबत माहिती दिली.

०००००



इलेक्ट्रॉनिक माध्यमासाठी चित्रफीत




 वृत्त क्र. 469

नांदेड जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी 

विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता 

नांदेड दि 6 जून : नांदेड जिल्ह्यासाठी 6 ते 8 जूनपर्यंत या तीन दिवसासाठी येलो अलर्ट हवामान शास्त्र विभागाने जाहीर केला आहे. या तीन दिवसांत  विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 6 जून 2024 रोजी दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 6 ते 8 जून 2024 या तीन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे. 

या दरम्यान जिल्ह्यात तूरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या गोष्टी करा :

१)विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

२)आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.

३)आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.

४)तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.

५)पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: 

१)आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

२)विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.

३)उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.

४)धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.

५)जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

00000

 वृत्त क्र. 467

शिवस्वराज्य दिनाच्या आयोजनातून नव्या पिढीला नवी दृष्टी व नवचेतना मिळते

- पालकमंत्री गिरीश महाजन यांचा संदेश

·         जिल्‍हा परिषदेत शिवस्‍वराज्‍य दिन मोठया उत्‍साहात साजरा

·         भगव्या ध्वजासह उभारली शिवशक राजदंड स्‍वराज्‍यगुढी

नांदेड दि. 6 :- नांदेड जिल्हा परिषदेत सहा जून या ऐतिहासिक पर्वावर शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. राज्य शासनाने शिवस्वराज्य दिनाच्या पर्वावर शिवचरित्राचे स्मरण नव्या पिढीला करण्याची दिशा दिली आहे . शिवस्वराज दिनाच्या आयोजनातून नव्या पिढीला नव चेतना मिळते असा पालकमंत्री गिरीश महाजन यांचा संदेश यावेळी प्रसूत करण्यात आला.

शिवराज्याभिषेक हा 6 जून 1674 रोजी झाला. शिवछत्रपतीनी तत्कालीन प्रस्थापित सत्तेला पालथे करून स्वताच्या सार्वभौम स्वराजाचा पवित्र असा मंगलकलश जनतेला अर्पण करून रयतेची झोळी सुख समृद्धीने भरली. म्हणून हा दिवस" शिवस्वराज्य दिवस" म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने सन 2021 मध्ये घेतला. तेव्हापासून आपण हा दिवस " शिवस्वराज्य दिवस साजरा" करतो.

नांदेड जिल्हा परिषदेच्‍यावतीने आज शिवस्वराज्य दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेत केले आहे. या सोहळ्याचे आयोजन प्रेरणादायी असून या नियोजनाद्वारे आपल्या अजरामर अशा इतिहासातून नव्या पिढीला नवी दृष्टी व नवचेतना मिळते असे गौरवोद्गार राज्याचे  ग्रामविकास व पंचायतराजपर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात काढले. शिवस्‍वराज्‍य दिनानिमित्त जिल्ह्यातील समस्त जनतेला पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शुभेच्छा दिल्या. 

नांदेड जिल्हा परिषदेच्‍यावतीने आज 6 जून रोजी 351 वा शिवस्वराज्य दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भगव्या ध्वजासह स्वराज्य गुढी उभारली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या अर्धाकृती पुतळयास पुष्‍पहार अर्पण करुन भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढीचे पूजन केले. यावेळी त्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावारअतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे,  जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प संचालक डॉ. संजय तुबाकलेमुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी शिवप्रसाद चन्‍नामहिला व बालकल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम कदमजल जिवन मिशनचे प्रकल्‍प संचालक तथा उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळनरेगाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी अमित राठोडजिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदेशिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगेसमाजकल्‍याण अधिकारी सत्‍येंद्र आऊलवारजिल्हा कृषी विकास अधिकारी व्‍ही.आर. बेतीवारजिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकरकार्यकारी अभियंता अे.आर. चितळे तसेच विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र गीत गायना राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्‍यात आली. यावेळी शाहीर प्रकाश दांडेकर तसेच शाहीर रमेश गिरी व त्‍यांच्‍या संचानी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा तसेच त्यांच्या जीवनावर गीतगायन केले. त्‍यानंतर किड्स किंग्डम पब्लिक स्कूल (श्रीचैतन्‍या टेक्‍नो स्‍कुल) येथील विद्यार्थ्‍यांनी बॅड पथकाव्‍दारे महाराष्‍ट्र गीते सादर केली. तर गुरुकुल पब्लिक स्‍कुलचे विद्याथी शिवस्वराज्‍य दिनानिमित्‍त छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांच्‍या वेशषभूषेत दाखल झाले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पद्दमाकर कुलकर्णी व प्रलोभ कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्‍हा परिषदेचे अधिकारी व कर्मचा-यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

०००००














  वृत्त क्र. 526   अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत   नांदेड दि. 25 :- जिल्ह्यात गत ...