Thursday, June 6, 2024

वृत्त क्र. 468

बियाणे, खते व किटकनाशकांची अनधिकृत विक्री व साठा केल्यास सक्त कारवाई : जिल्हाधिकारी

· खरीप हंगामासाठी कृषी विभागाची तयारी पूर्ण

· शेतकऱ्यांनी एकाच प्रतीच्या बियाणांचा आग्रह धरु नये

· जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या शुभेच्छा

नांदेड दि 6 जून : जिल्ह्यात खरीप हंगामाची पूर्व तयारी सुरु झाली असून पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे.  जिल्ह्यात खते, बियाणे, किटकनाशके मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने तयारी पूर्ण केली आहे. या अनुषंगाने बाजारात जर बियाणे, खते व किटकनाशके बोगस किंवा अनधिकृत विक्री व साठा केल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. 

खरीप हंगाम पूर्व तयारीबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय बेत्तीवार,  तहसिलदार, गटविकास अधिकारी, मोहिम अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती , रासायनिक खत पुरवठा कंपनी प्रतिनिधी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, बियाणे पुरवठादार कंपनीचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.

सर्व कृषी केंद्रावर कृषी सहाय्यकांची नेमणूक करावी. जिल्ह्यात कुठेही बियांणाची साठेबाजी व अनधिकृत बियाणाची विक्री होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कृषी विभागाला दिल्या. याबाबत जिल्ह्यात भरारी पथकाची नेमणूक केली आहे. त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यास तात्काळ कारवाई करण्याचे, निर्देश त्यांनी यावेळी दिले.

तसेच शेतकऱ्यांनी एकाच प्रतीच्या वाणाचा आग्रह धरु नये. रासायनिक खतांचा वापर मर्यादित स्वरुपात करावा. तसेच सोयाबीनचे बियाणे घरघुती वापरताना त्यांची उगवण क्षमता तपासून घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.  शेवटी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या शुभेच्छा दिल्या.

सुरवातीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील उपलब्ध निविष्ठा बाबत माहिती सांगितली. सर्वानी सोयाबिन पेरणीबाबत बीबीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी विकास अधिकारी  विजय बेत्तीवार यांनी जिल्ह्यातील उपलब्ध खतसाठा, कंपनीनिहाय कापूस बियाणांची उपलब्धता याबाबत माहिती दिली. जिल्ह्याच्या एकूण मागणीच्या ८० टक्के कापूस बियाणे उपलब्ध असल्याबाबत माहिती दिली.

०००००



इलेक्ट्रॉनिक माध्यमासाठी चित्रफीत




No comments:

Post a Comment