Wednesday, May 12, 2021

 

आज 45 वर्षांवरील लाभार्थ्यांनाच

कोविडशिल्डचा दुसरा डोस

प्रत्येक संस्थेसाठी 100 डोसेसची झाली उपलब्धता

लसीकरण कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्ह्यातील 45 वय वर्षांवरील नागरिकांसाठी कोविडशिल्डचा प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोसेस आज गुरुवार 13 मे रोजीच्या लसीकरणासाठी उपलब्ध झाले आहेत. हे कोविडशिल्डचे डोसेस ज्यांनी पहिल्यांदा घेतले आहेत व जे दुसऱ्या डोससाठी वाट पाहत आहेत अशा प्रत्येकी 100 व्यक्तींना प्रत्येक केंद्रनिहाय देण्याचे नियोजन आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेले आहे. लसीकरण केंद्रावर 18 ते 45 वयोगटातील युवक-नागरिकांनी गर्दी न करता आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे. 

नांदेड शहरात पुढीलप्रमाणे लसीकरण केंद्र आहेत. यात श्री गुरु गोविंदसिंघ जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा असे एकूण 7 केंद्र आहेत. शहरी हद्दीत सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय असे एकूण 16 केंद्र आहेत. ग्रामीण हद्दीत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरु असून एकूण 67 केंद्र आहेत. या प्रत्येक केंद्रावर आजच्यासाठी कोविडशिल्ड या लसीचे 100 डोस उपलब्ध मिळाले आहेत. लसीकरणाच्या या मोहिमेत नागरिकांनी सहकार्य करावे. नांदेड जिल्ह्यात 11 मे पर्यंत एकुण 3 लाख 78 हजार 166 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. 

0000

 

482 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड जिल्ह्यात 398 व्यक्ती कोरोना बाधित

16 जणांचा मागील तीन दिवसात मृत्यू

नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 688 अहवालापैकी 398 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 252 तर अँटिजेन तपासणीद्वारे 146 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 85 हजार 943 एवढी झाली असून यातील 79 हजार 257 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 4 हजार 591 रुग्ण उपचार घेत असून 170 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दिनांक 10, 11 व 12 मे 2021 या तीन दिवसांच्या कालावधीत 16 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 757 एवढी झाली आहे. दिनांक 10 मे 2021 रोजी रेणुका कोविड रुग्णालयात हदगाव तालुक्यातील तामसा येथील 57 वर्षाची महिला, दिनांक 11 मे रोजी शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे जिंदमनगर नांदेड येथील 60 वर्षाचा पुरुष, नायगाव येथील 70 वर्षाची महिला, 28 वर्षाचा पुरुष तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे भोकर येथील 58 वर्षाची महिला, देगलूरनाका नांदेड येथील 65 वर्षाची महिला, नांदेड तालुक्यातील नेरली येथील 30 वर्षाचा पुरुष, मुखेड कोविड रुग्णालय येथे येवती येथील 65 वर्षाची महिला, हदगाव कोविड रुग्णालय पिंपरखेड येथील 55 वर्षाचा पुरुष, मांडवी कोविड केअर सेंटर येथे पोलीस कॉलनी मांडवी येथील 53 वर्षाचा पुरुष, लोट्स कोविड रुग्णालय येथे हदगाव तालुक्यातील वायफना येथील 75 वर्षाचा पुरुष, अश्विनी कोविड रुग्णालय येथे शारदानगर नांदेड येथील 70 वर्षाची महिला, गोदावरी कोविड रुग्णालय येथे भोकर तालुक्यातील हस्सापूर 45 वर्षाचा पुरुष, धनवंतरी कोविड रुग्णालय येथे लोहा तालुक्यातील मोकलेवाडी येथील 65 वर्षाची महिला, सह्याद्री कोविड रुग्णालय येथे बालाजी मंदिर भोकर येथील 56 वर्षाचा पुरुष, दिनांक 12 मे रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे हदगाव तालुक्यातील शेवाळा येथील 55 वर्षाच्या महिलेचा यात समावेश आहे.      

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 88, देगलूर 10, कंधार 5, मुदखेड 3, हिंगोली 10, पुणे 1, नांदेड ग्रामीण 16, धर्माबाद 6, किनवट 17, मुखेड 6, परभणी 2, बिदर 1, अर्धापूर 7, हदगाव 13, लोहा 6, नायगाव 16, यवतमाळ 4, निजामाबाद 1, बिलोली 18, हिमायतनगर 9, माहूर 5, उमरी 7, नाशिक 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे मनपा नांदेड 21, धर्माबाद 2, किनवट 7, मुदखेड 7, यवतमाळ 2, नांदेड ग्रामीण 12, हदगाव 10, लोहा 2, नायगाव 4, लातूर 1, भोकर 6, हिमायतनगर 15, माहूर 9, उमरी 1 असे एकूण 398 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 482 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 12, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 150, मांडवी कोविड केअर सेंटर 6, देगलूर कोविड रुग्णालय 10, अर्धापूर तालुक्यांतर्गत 14, धर्माबाद तालुक्यांतर्गत 11, खाजगी रुग्णालय 101, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 6, मुखेड कोविड रुग्णालय 18, मुदखेड कोविड केअर सेंटर 32, किनवट कोविड रुग्णालय 8, कंधार तालुक्यांतर्गत 9, बिलोली तालुक्यांतर्गत 32, माहूर तालुक्यांतर्गत 8, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 5, भोकर तालुक्यांतर्गत 13, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 36, हदगाव कोविड रुग्णालय 3, लोहा तालुक्यांतर्गत 2, मालेगाव टिसीयू कोविड रुग्णालय 3, उमरी तालुक्यांतर्गत 3 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 4 हजार 591 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 144, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 77, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 93, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 32, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 69, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 71, देगलूर कोविड रुग्णालय 15, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 14, बिलोली कोविड केअर सेंटर 105, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 9, नायगाव कोविड केअर सेंटर 11, उमरी कोविड केअर सेंटर 12, माहूर कोविड केअर सेंटर 16, भोकर कोविड केअर सेंटर 2, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 29, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 25, कंधार कोविड केअर सेंटर 5, धर्माबाद कोविड केअर सेंटर 27, मुदखेड कोविड केअर सेंटर 7, अर्धापूर कोविड केअर सेंटर 14, बारड कोविड केअर सेंटर 30, मांडवी कोविड केअर सेंटर 3, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 7, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 17, एनआरआय कोविड केअर सेंटर 1, नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 1 हजार 418, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 1 हजार 476, खाजगी रुग्णालय 862 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 53, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 57, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 29 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 90 हजार 657

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 94 हजार 593

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 85 हजार 943

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 79 हजार 257

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 757

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.22 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-28

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-264

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 4 हजार 591

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-170

00000

 

सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडून

वसुलीबाबत थकबाकीदार पक्षकारांची नावे प्रसिद्ध

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  महालेखापाल नागपूर यांनी दुय्यम निबंधक कार्यालयाचे केलेल्या तपासणीत कमी मुद्रांक शुल्क दिलेल्या दस्ताबाबत आक्षेप घेतलेला आहे. त्यानुसार संबंधीत पक्षकारांना सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयाकडून वेळोवेळी कमी पडलेल्या थकीत महसुलाचे रक्कमेबाबत वसुलीच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. परंतू संबंधीत पक्षकारांनी महसुली रक्कम शासन जमा करण्याबाबत प्रतीसाद दिला नाही. थकबाकीदार पक्षकारांची नावे वसुली रक्कमेची माहितीमध्ये दस्त क्रमांक, दस्ताचे शिर्षक, पक्षकारांची नावे, थकबाकीची रक्कम न्युन मुद्रांक शुल्क दंड / शास्ती सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी नांदेड यांनी पुढीलप्रमाणे प्रसिद्धीस दिली आहेत. 

5387/ 2007 विक्रीखत- म.अ.जलील सिद्दीकी रफीयोद्दीन सिद्दीकी व इतर. फारुख सालेह शिबीबी सर्व रा चैतन्य नगर नांदेड 25 हजार 200 रुपये. दस्त निष्पादनाच्या दिनांकापासुन प्रती माह 2 टक्के व जास्तीत जास्त चारपट (कमी / न्युन मुद्रांक शुल्काच्या). 3677/2007 खरेदीखत- योगेश पि रामलींग बुराडे रा.जंगमगल्ली नांदेड व इतर,गोंविद पि सुरेश बुलबुले रा. वजिराबाद नांदेड, सुर्यकांत पि दत्तोपंत टणे रा.सिध्दनाथपुरी नांदेड, हेमंत पि श्रीराम पाटील रा. वर्कशॉप नांदेड, शामसुंदर पि बालासाहेब देशमुख रा. चाभरा ता हदगाव जि नांदेड 2 लाख 2 हजार 500 रुपये. 2477/2007 विक्रीखत- एजाज अहेमद पि अब्दुल रशिद व इतर, शेख रऊफ पि शेख पाशा,अब्दुल रहीम पि शेख घुडुसाब सर्व रा.देगलूरनाका रोड नांदेड 42 हजार 600 रुपये. 2476/2007 विक्रीखत- अल्ताफ अहेमद पि अ रशीद व इतर, शेख फाऊख पि शेख पाशा रा.देगलूरनाका रोड नांदेड 27 हजार 900 रुपये. 8647/2013 खरेदीखत- महंमदखॉन पि तुराबखॉन पठाण, सौ नसिमबेगम महमदखॉन पठान सर्व रा लेंबर कॉलनी नांदेड 2 लाख 73 हजार रुपये. 8405/2013 विकसन करारनामा- मे वर्धमान बिल्डर्स ऍॅन्ड डेव्हापर्सचे भागीदार संजय गोकुळ नारायण शर्मा व इतर भागीदार,निलेश कन्हेय्यालाल मुनोत, परेश कन्हेय्यालाल मुनोत, पारस ओेमप्रकाश पोकर्णा सर्व रा. पारसनगर नांदेड 6 लाख 98 हजार 300 रुपये. 5152/2013 भाडेप्ट्टा (लिज डिड)- मातोश्री प्रतिष्ठाणचे सचिव व्यंकटचारी ब्रम्हचारी व्रेग्लम रा खुपसरवाडी नांदेड 2 लाख 73 हजार रुपये. 5197/2014 कनव्हेन्सडीड- डॉ कैलास पि आनंदराव देशमुख रा फरांदेनगर वाडी बु नांदेड 1 लाख 16 हजार 860 रुपये न्युन मुद्रांक शुल्क आहे. दस्त निष्पादनाच्या दिनांकापासुन प्रती माह 2 टक्के व जास्तीतजास्त चारपट (कमी / न्युन मुद्रांक शुल्काच्या) दंड / शास्ती आहे. 

थकबाकीदारांनी थकबाकीची रक्कम (दंडासह) दिनांक 6 मे 2021 पासून 15 दिवसांत शासन जमा करावी अन्यथा महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम 46 नुसार स्थावर जंगम मालमत्तेवर टाच आणून वसुलीची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे वि. प्र. बोराळकर सह जिल्हा निबंधक वर्ग- 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 

 

शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा रास्त भावात

मिळण्यासाठी 17 भरारी पथकांची नियुक्ती

नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके गुणवत्तापूर्ण व रास्तभावात मिळण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.  कृषि विभागामार्फत जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर 16 असे एकूण 17 भरारी पथके, नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी काही तक्रारी असल्यास जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेचे कृषि अधिकारी  संतोष नादरे (मो. क्र. (8408933779 ) व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक बी.बी.गिरी मो.क्र.( 9403727393 )तालुका स्तरावर पंचायत समितीचे तालुका कृषि अधिकारी यांना सकाळी 9.45 ते सायं 6.15 या कालावधीत संपर्क करावा असे, आवाहन नांदेडच्या जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने केले आहे.   

या भरारी पथकांनी जिल्हा व तालुकास्तरावर वेळोवेळी कृषि निविष्ठा विक्री केंद्राना भेटी देवून तपासणी करावी. निविष्ठाकांची विक्री चढत्या भावाने होत नसल्याची खात्री करावी. नेमलेल्या भरारी पथकांनी रासायनिक खते व किटकनाशकाबाबत उगम प्रमाणपत्र तपासणीची व्यापक मोहिम राबवावी. कागदपत्रे आढळून न आल्यास विक्री बंद आदेश बजावावेत. वितरीत उत्पादक व विक्रेतेस्तरावर मुदतबाह्य निविष्ठांचा शोध घेऊन विक्री होणार नाही यांची दक्षता घ्यावी. इनव्हाईस बिल, विक्रीसाठी शिल्लक साठा, इ. पास वरील साठयांचा ताळमेळ तपासावा तफावत आढळल्यास तात्काळ कारवाई करावी. वितरकाने विक्रीसाठीच्या प्रत्येक बियाणांच्या लॉटचा किमान एम नमुना ठेवल्याची खात्री करावी. अप्रमाणित बोगस, अनाधिकृत साठयाचा शोध घेवून जप्तीची कारवाई करावी. तसेच ज्या शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते व निविष्ठा दुर्गम भागास पुरवठा करण्यात येतो. अशा कंपन्याच्या निविष्ठांचा नमुना प्राधान्याने दाखल करावा, असे निर्देश नियुक्त भरारी पथकांना देण्यात आले आहेत.

0000

 

रमजान ईद घरच्या घरी साध्या पद्धतीने साजरी करावी

जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शक सूचना

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  जिल्ह्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी ब्रेक द चेन आदेशान्‍वये कडक निर्बंध लागू करण्‍यात आले आहेत. जिल्ह्यात जमावबंदी व संचारबंदी असून कोणत्‍याही सामाजिक, धार्मिक, राज‍कीय किंवा सांस्‍कृतिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्‍यास मज्‍जाव करण्‍यात आला आहे. दिनांक 13 किंवा 14 मे 2021 (चंद्रदर्शनावर अवलंबून) रोजी रमजान ईद (ईद उल फित्र) साजरी केली जाणार आहे. त्याअनुषंगाने कोरोना  विषाणूंचा संसर्ग टाळण्‍यासाठी पवित्र रमजान ईदसाठी मुस्लिम बांधवांनी नियमीत नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्‍ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपपल्‍या घरातच साजरे करावेत, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने पुढीलप्रमाणे मागर्दशक सूचना निर्गमित केल्या आहेत.

 

कोरोना  विषाणूंचा संसर्ग टाळण्‍यासाठी पवित्र रमजान ईदसाठी मुस्लिम बांधवांनी नियमीत नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्‍ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपपल्‍या घरातच साजरे करुन ब्रेक द चेन आदेशाचे काटेकोर पालन करावे. नमाज पठणाकरीता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये. रमजान ईद निमित्‍ताने प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असून त्‍याचे तंतोतंत पालन करण्‍यात यावे.  त्‍यावेळेव्‍यतिरिक्‍त बाजारामध्‍ये सामान खरेदीकरिता गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये. कोविड-19 या विषाणूच्‍या वाढत्‍या संसर्गास प्रतिबंध करण्‍याच्‍या अनुषंगाने जिल्ह्यात कलम 144 लागू आहे.  तसेच रात्रीची संचारबंदी असल्‍यामुळे संचारबंदीच्‍या कालावधीत फेरीवाल्‍यांनी रस्‍त्‍यावर स्‍टॉल लावू नयेत. तसेच नागरिकांनी विनाकारण रस्‍त्‍यावर फिरू नये. रमजान ईद निमित्‍ताने कोणत्‍याही प्रकारे मिरवणूका, धार्मिक, सामाजिक, सांस्‍कृतीक अ‍थवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात येऊ नये.

 

धार्मिक स्‍थळे बंद असल्‍याने मुस्‍लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्‍वयंसेवी संस्‍थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरा करण्‍याच्‍या अनुषंगाने जनजागृती करावी. रमजान ईदच्‍या दिवशी सोशल डिस्‍टन्सिंगच्‍या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.  तसेच  मास्‍क व सॅनिटायझरचा वापर करण्‍याबाबत काळजी घेणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. कोवीड-19 च्‍या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाच्‍या मदत व पुनर्वसन, आरोग्‍य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्‍थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्‍या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्‍यक्ष  रमजान ईदच्‍या मधल्‍या कालावधीत शासनस्‍तरावरून आणखी काही मार्गदर्शक सूचना प्रसिध्‍द झाल्‍यास त्‍यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील. 

 

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्‍यात यावी. तसेच आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्‍या कृत्‍यासाठी कोणत्‍याही अधिकारी, कर्मचारी यांचे विरुध्‍द कार्यवाही केली जाणार नाही असेही आदेशात नमूद केले आहे.  

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...