Wednesday, May 12, 2021

 

रमजान ईद घरच्या घरी साध्या पद्धतीने साजरी करावी

जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शक सूचना

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  जिल्ह्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी ब्रेक द चेन आदेशान्‍वये कडक निर्बंध लागू करण्‍यात आले आहेत. जिल्ह्यात जमावबंदी व संचारबंदी असून कोणत्‍याही सामाजिक, धार्मिक, राज‍कीय किंवा सांस्‍कृतिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्‍यास मज्‍जाव करण्‍यात आला आहे. दिनांक 13 किंवा 14 मे 2021 (चंद्रदर्शनावर अवलंबून) रोजी रमजान ईद (ईद उल फित्र) साजरी केली जाणार आहे. त्याअनुषंगाने कोरोना  विषाणूंचा संसर्ग टाळण्‍यासाठी पवित्र रमजान ईदसाठी मुस्लिम बांधवांनी नियमीत नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्‍ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपपल्‍या घरातच साजरे करावेत, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने पुढीलप्रमाणे मागर्दशक सूचना निर्गमित केल्या आहेत.

 

कोरोना  विषाणूंचा संसर्ग टाळण्‍यासाठी पवित्र रमजान ईदसाठी मुस्लिम बांधवांनी नियमीत नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्‍ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपपल्‍या घरातच साजरे करुन ब्रेक द चेन आदेशाचे काटेकोर पालन करावे. नमाज पठणाकरीता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये. रमजान ईद निमित्‍ताने प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असून त्‍याचे तंतोतंत पालन करण्‍यात यावे.  त्‍यावेळेव्‍यतिरिक्‍त बाजारामध्‍ये सामान खरेदीकरिता गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये. कोविड-19 या विषाणूच्‍या वाढत्‍या संसर्गास प्रतिबंध करण्‍याच्‍या अनुषंगाने जिल्ह्यात कलम 144 लागू आहे.  तसेच रात्रीची संचारबंदी असल्‍यामुळे संचारबंदीच्‍या कालावधीत फेरीवाल्‍यांनी रस्‍त्‍यावर स्‍टॉल लावू नयेत. तसेच नागरिकांनी विनाकारण रस्‍त्‍यावर फिरू नये. रमजान ईद निमित्‍ताने कोणत्‍याही प्रकारे मिरवणूका, धार्मिक, सामाजिक, सांस्‍कृतीक अ‍थवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात येऊ नये.

 

धार्मिक स्‍थळे बंद असल्‍याने मुस्‍लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्‍वयंसेवी संस्‍थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरा करण्‍याच्‍या अनुषंगाने जनजागृती करावी. रमजान ईदच्‍या दिवशी सोशल डिस्‍टन्सिंगच्‍या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.  तसेच  मास्‍क व सॅनिटायझरचा वापर करण्‍याबाबत काळजी घेणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. कोवीड-19 च्‍या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाच्‍या मदत व पुनर्वसन, आरोग्‍य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्‍थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्‍या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्‍यक्ष  रमजान ईदच्‍या मधल्‍या कालावधीत शासनस्‍तरावरून आणखी काही मार्गदर्शक सूचना प्रसिध्‍द झाल्‍यास त्‍यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील. 

 

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्‍यात यावी. तसेच आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्‍या कृत्‍यासाठी कोणत्‍याही अधिकारी, कर्मचारी यांचे विरुध्‍द कार्यवाही केली जाणार नाही असेही आदेशात नमूद केले आहे.  

00000

No comments:

Post a Comment

निवडणुकीच्या लगबगीत माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे नांदेड लोकसभापोटनिवडणुकीत निवडणूक ...