गुणवंत
मुलामुलींना उच्च शिक्षण विभागाची शिष्यवृत्ती
शिष्यवृत्तीसाठी
ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड,
दि. 17: उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत राज्यातील खुल्या
प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण विभागाची शिष्यवृत्ती मिळणार
आहे. जे गुणवंत विद्यार्थी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका व पीएचडी
अभ्यासक्रमासाठी टीएचई (Times Higher Education) किंवा
क्युएस (Quacquarelli Symonds) रँकीग 200 च्या आतील विविध
देशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतील अशा 20 विद्यार्थ्यांना राज्य
शासनाकडून दरवर्षी शिष्यवृत्ती मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही योजना उच्च व
तंत्र शिक्षण विभागांतर्गत ‘गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी
शिष्यवृत्ती’ मंजूर करणे या नावाने शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून राबविण्यात येणार
आहे.
विविध शिक्षण
शाखेनुसार विद्यार्थ्यांची अभ्यासक्रमनिहाय विद्यार्थी संख्या कला शाखा- 2, वाणिज्य
शाखा- 2, विज्ञान शाखा-2, व्यवस्थापन शाखा-2, विधी अभ्यासक्रम-2, अभियांत्रिकी/वस्तू कला
शास्त्र -8 आणि औषधनिर्माणशास्त्र-2 अशी असून या प्रमाणे विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज
मागविण्यात येत आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरणे, आवश्यक
प्रमाणपत्रे/कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाशिवाय इतर
कोणत्याही पध्दतीने केलेला अर्ज विचारात घेण्यात येणार नाही.
संकेतस्थळावर
ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरणे आणि आवश्यक प्रमाणपत्र/कागदपत्र अर्जासोबत अपलोड करणे
यासाठी 15 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2018 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) मुदत देण्यात आली
आहे. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत, आवश्यक प्रमाणपत्र/कागदपत्रे
साक्षांकित प्रतीसोबत मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी संबंधित विभागीय
कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. कला, वाणिज्य, विज्ञान व विधी अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण विभागाचे विभागीय कार्यालय
तर व्यवस्थापन, अभियांत्रिकी/वास्तुकलाशास्त्र आणि औषधनिर्माणशास्त्र
अभ्यासक्रमासाठी तंत्र शिक्षणचे विभागीय कार्यालय यांना 19 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर
2018 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) जमा करणे आवश्यक
आहे.
विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे आई / वडील अथवा पालक भारताचे नागरिक तसेच
महाराष्ट्र राज्याचे अधिवास असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांस परदेशातील THE /
QS अद्ययावत वर्ल्ड रॅन्कींगमध्ये 200 च्या आत असलेल्या शैक्षणिक
संस्था / विद्यापीठामध्ये पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका किंवा पीएचडी
अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी गुणवत्तेनुसार शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये प्रवेश
मिळालेला असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचे / कुटुबांचे व विद्यार्थी
नोकरी करीत असल्यास त्याचे स्वत:चे उत्पन्न धरुन सर्व मार्गांनी मिळाणारे मागील
आर्थिक वर्षातील एकत्रित वार्षिक उत्पन्न 20 लाखापेखा जास्त नसावे. ऑनलाईन भरलेल्या
अर्जाची प्रत व आवश्यक प्रमाणपत्र व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसोबत सदर अर्ज
संबंधित विभागीय कार्यालयात वेळापत्रकानुसार मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी सादर
करावा.
अधिक माहिती सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in आणि संचालनालयाच्या www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याबरोबरच विभागीय कार्यालय, उच्च शिक्षण व विभागीय कार्यालय आणि तंत्र शिक्षण यांची यादी
संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नांदेड
विभागातील नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील
उच्च शिक्षित विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उच्च शिक्षण सहसंचालक
डॉ. शैला सारंग यांनी केले आहे.
000000