Thursday, May 25, 2017

शेतकऱ्यांनी कृषि उत्पादन वाढविण्यासाठी नवनवीन
तंत्रज्ञानाचा अवलंब करावा - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 25 :- शेतकऱ्यांनी  कृषि उत्पादन वाढविण्यासाठी नवनवीन प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. शेतीला पशुसंवर्धनाची जोड दयावी. कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिकापालन, बकरी पालनासारखे शेतीपुरक व्यवसाय करावेत. यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनेचा अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज केले.
लोहा तालुक्यातील दापशेड येथे उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियान पंधरवाडयाच्या उदघाटन समारंभात जिल्हाधिकारी श्री. डोंगरे बोलत होते. या कार्यक्रमास आमदार प्रताप पाटील चिखलीकर, लोहा पंचायत समितीचे सभापती सतीश पाटील उमरेकर, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर भातलवंडे, लघू सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) डॉ. प्रविणकुमार घुले, लोहा तालुका कृषि अधिकारी विश्वंभर मंगनाळे, लोहाचे तहसिलदार उषाकिरण श्रृंगारे, जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. गायकवाड, जिल्हा परिषदेचे लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता महेश गुंडरे, गटविकास अधिकारी श्री. फांजेवाड आदी अधिकारी उपस्थित होते.
जलसंधारणाच्यादृष्टिने जलयुक्त शिवार अभियान महत्वाचे आहे. या अभियानामधील विविध कामांमुळे शाश्वत सिंचन निर्माण होण्यास मदत होते. सिंचनाच्या उपलब्धतेमुळे शेती उत्पादनात वाढ होईल. या अभियानात शेतक-यांनी सहभाग घ्यावा. लोकसहभागातून गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही मोहिम प्रभावीपणे राबवावी. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, यांत्रिकीकरण, फलोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेण्याबरोबर शेतीपुरक जोडधंदाकडेही लक्ष देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.  

महाराष्ट्र शासनाचा  उन्नत शेती-समृद्ध शेतकरी हा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम असुन त्यामध्ये अनेक योजनांचा समावेश आहे. या योजनांमुळे शेतक-यांचे उत्पन्न वाढण्यास निश्चित मदत होणार आहे. त्यामुळे जास्तीतजास्त शेतक-यांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले. लोहा-कंधार तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाची चांगली कामे केल्यामुळे प्रशासनाची त्यांनी स्तुती केली.
            जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे  यांनी खरीप पिकांच्या उत्पादन वाढीची सुत्रे सांगितली. घरच्या सोयाबीनाची उगवणशक्ती तपासुन ती 70 टक्याच्यावर आली तर बीजप्रक्रिया करुन घरचेच बियाणे वापरण्याचा सल्लाही त्यांनी दिला. कृषि यांत्रिकिकरण, पिक विमा, ठिबक सिंचन, मागेल त्याला शेततळे, गांडुळ खत, नाडेप, फलोत्पादन इत्यादी विषयांचीही त्यांनी माहिती दिली.
         
   या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार लोहा तालुका कृषि अधिकारी विश्वंभर मंगनाळे यांनी केले. या कार्यक्रमानंतर दापशेडमध्ये झालेल्या जलयुक्त शिवार अभियानाची पाहणी करण्यात आली. यावेळी कृषि संलग्न विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
0000000


     मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू 
नांदेड, दि. 25 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना प, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा  27 मे 2017 रोजी सकाळी 6 वाजेपासून 26 जून 2017 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. 
00000


संस्थाचालकांना ऑनलाईन
माहिती भरण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 25 :- नोंदणीकृत संस्थाचालकांनी ज्यावर्षी नोंद झाली त्यावर्षीची व दरवर्षी आपल्या संस्थेची माहिती http://charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करावी. धर्मादाय संस्थेअंतर्गत येणारे सर्व कलम निहाय बदल अर्ज संकेतस्थळावर नोंद करावेत. तसेच संस्था नोंदणीचे नवीन प्रस्ताव ऑनलाईन सादर करावेत. लेखा शाखेचे हिशोबपत्रके, कलम 41 क अंतर्गत तात्पुरते वर्गणी गोळा करण्याच्या परवाण्यासाठी देखील ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन धर्मादाय उपाआयुक्त नांदेड यांनी केले आहे.  

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...