Tuesday, September 6, 2016

लोकशाही दिनातील अर्ज त्वरेने निकाली काढावेत
-       जिल्हाधिकारी काकाणी यांचे निर्देश 
नांदेड, दि. 6 :- लोकशाही दिनात दाखल झालेल्या अर्जांवर संबंधित विभागाने कार्यवाही करुन त्वरेने अर्ज निकाली काढावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले.  
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये आज नव्याने 40 अर्ज दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील बचत भवन येथे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन संपन्न झाला.   
लोकशाही दिनास पोलीस अधीक्षक संजय ऐनपुरे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल काळभोर, जिल्हा वनसंरक्षक सुजय डोडल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, पशूसंवर्धन उपायुक्त पी. पी. घुले, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्री. कोकणे , जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक बी. यु. वाघमारे, कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लोकशाही दिनात आज दाखल झालेल्या अर्जाची संख्या विभागनिहाय पुढील प्रमाणे आहे. महसूल- 12, जिल्हा अग्रणी बँक-13, जिल्हा परिषद-10, पोलीस अधीक्षक, नांदेड महानगरपालिका, भुमिअभिलेख, सार्वजनिक बांधकाम,  महावितरण, नांदेड पाटबंधारे प्रत्येकी एक याप्रमाणे आहेत.
लोकशाही दिनातील अर्जाच्या आढाव्यानंतर जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी लोकशाही दिनात दाखल होणाऱ्या अर्जांबाबत वेळेत कार्यवाही झाली पाहिजे. दिर्घकाळ प्रलंबीत असणारे अर्जही संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरेने निकाली काढली पाहिजेत, असेही निर्देश त्यांनी दिले.

0000000
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन वर्धापन दिनाच्या
समारंभ पूर्वतयारीची आढावा बैठक संपन्न
नांदेड, दि. 6 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 68 वा वर्धापन दिन समारंभ शनिवार 17 सप्टेंबर 2016 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. हुतात्मा स्मृती स्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम आणि मुख्य शासकीय ध्वजवंदन माता गुजरीजी विसावा उद्यानात होणार आहे. या समारंभासाठीची पूर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील बचत भवन येथे झालेल्या या बैठकीस पोलीस अधीक्षक संजय ऐनपुरे, अप्पर जिल्हाधिकारी  संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल काळभोर, जिल्हा वनसंरक्षक सुजय डोडल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, जिल्हा सहकार उपनिबंधक वसंत निकम, पशूसंवर्धन उपायुक्त पी. पी. घुले, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्री. कोकणे , जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक बी. यु. वाघमारे, कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यांची उपस्थिती होती.
मुक्ती संग्राम दिनाचा हा वर्धापन दिन उत्साहात साजरा व्हावा यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी दिले. शनिवार 17 सप्टेंबर रोजी 8.30 वा. हुतात्मा स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना देण्यात येईल. त्यानंतर  सकाळी 9 वा. ध्वजवंदन होणार आहे. या मुख्‍य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमास जास्तीतजास्त नागरिकांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय आणि संस्था यांनी त्यांचे ध्वजवंदनाचे कार्यक्रम सकाळी 8.15 पूर्वी किंवा सकाळी 9.30 नंतर आयोजित करावेत. भारतीय राष्ट्रध्वज संहितेनुसार ध्वजवंदन करण्यात यावे. तसेच राष्ट्रध्वजाच्या उचीत सन्मानाबाबतचे गृह विभागाच्या परिपत्रकानुसार प्लॉस्टिकचे ध्वज वापरले जाऊ नयेत. यासाठी सर्वच यंत्रणांनी दक्ष रहावे, अशाही सूचना बैठकीत देण्यात आल्या. मुक्ती संग्राम दिनाच्या माता गुजरीजी विसावा उद्यानातील विविध व्यवस्थांबाबत संबंधीत यंत्रणांना वेळेत कार्यवाहीचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले.
मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात यावा. या कार्यक्रमानंतर शासनाच्या चारा टंचाई, पाणी टंचाई, रोजगार हमी योजना, जलयुक्त शिवार सारख्या विविध योजनांची उत्कृष्टरित्या अंमलबजावणी  करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरवही करण्याचा विचार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी  शासनाच्या विविध विभागाने उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करुन ठेवावी, असे सांगितले.

00000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...