Friday, June 20, 2025

वृत्त क्र. 645   

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते

जिल्ह्यातील 7 पंचायत समित्यांना शासकीय वाहनांचे वितरण

 

नांदेड 20 जून - नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांना नवीन शासकीय वाहनांचे वितरण आज करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या वाहनांचा लोकार्पण समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. याप्रसंगी पालकमंत्री अतुल सावे यांनी हिरवा झेंडा दाखवून सदर वाहने संबंधित तालुक्यांकडे रवाना केली.

 

माहूर, हदगाव, कंधार, देगलूर, बिलोली, उमरी व नायगाव या सात पंचायत समित्यांना हे वाहन देण्यात आले आहेत. या वाहनांच्या माध्यमातून तालुकास्तरावरील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व परिणामकारक होईल, असा विश्वास पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

 

यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार रविंद्र चव्हाण, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर,  आमदार भिमराव केराम, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापुरकर, आमदार आनंदराव बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, सामान्‍य प्रशासन विभागाचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्‍कावार, पंचायत विभागाच्‍या उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख आणि संबंधित पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.

0000





 

वृत्त क्र. 644

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना 

विद्यार्थ्यांना 20 जुलै पर्यंत अर्ज करण्याची मुदत 

नांदेड दि. 20 जून :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी येत्या 20 जुलै 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपूर्ण कागदपत्रासोबत जिल्हा कार्यालयात संपर्क करावा. उशिरा मुदतीनंतर आलेले कागदपत्रे अर्जाचा जिल्हा कार्यालयामार्फत स्विकार करण्यात येणार नाही, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. 

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी गुण प्राप्त झाले असतील अशा उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना महामंडळाकडून ज्येष्ठता व जास्त गुण क्रमांकानुसार उपलब्ध निधीच्या अधीन राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. 

पुढीलप्रमाणे मुळ कागदपत्रे दोन प्रतीत आणावीत. मार्कशिट, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, आधारकार्ड, दोन फोटो, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकीटसह व जिल्हा व्यवस्थाकाच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज इत्यादी कागदपत्रासह संपर्क साधावा.

जिल्हा कार्यालयाचा पत्ता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेच्या समोर नांदेड दूरध्वनी 02462-220088 मो.नंबर 9309151060 हा आहे.    

0000

वृत्त क्र. 643

फळपिक विमा कंपनीकडे  

नुकसानीची तक्रार नोंदवा : कृषि कार्यालय 

नांदेड दि. 20 जून :- अर्धापूर तालुक्यात 9 जून रोजी झालेल्या वेगाचा वारा व पावसामुळे फळपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळपिक विमा कंपनीकडे नुकसानीची तक्रार नोंदवावी, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी अर्धापूर यांनी केले आहे. 

अर्धापूर तालुक्यातील फळपिक नुकसानग्रस्त शेतकरी बांधवाना पुर्व सूचना देण्यात आली आहे. आपण रब्बी हंगामातील फळपिक विमा भरला असेल व आपल्या (केळी पपई, आंबा-आंबिया बहार) या पिकाचे नुकसान वादळी वाऱ्याने झाले असल्यास wind speed वरील पर्याय निवडून पिक विमा कंपनीस पूर्व सूचना द्यावी. 

पूर्व सूचना दिल्याशिवाय स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत विमा मिळत नाही. आपण आपल्या पिकाच्या नुकसानीची पुर्व सूचना टोल फ्री नंबर 14447 वर फोन करून किंवा क्रॉप इन्सुरन्स अॅपद्वारे द्यावी. पिक नुकसानीची पूर्व सूचना ही पिकांचे नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत (3 दिवसाच्या आत) देणे गरजेचे आहे. पूर्व सुचना दिल्यानंतर उपलब्ध झालेला docket Id सांभाळून ठेवावा जेणे करून फळपिक विमा योजनेचा लाभ मिळणे सोयीचे होईल, असेही आवाहन तालुका कृषि अधिकारी अर्धापूर यांनी केले आहे.

000

वृत्त क्र. 642

राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा दौरा   

नांदेड दि. 20 जून :- राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर शनिवार 21 जून 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शनिवार 21 जून 2025 रोजी मुंबई येथून नंदिग्राम एक्सप्रेसने सकाळी 5 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 5.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 6 वा. 11 वा आंतरराष्ट्रीय भव्य योग दिन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- भक्ती लॉन्स मंगल कार्यालय मालेगाव रोड नांदेड. सकाळी 7 वा. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भव्य योग शिबीर स्थळ- श्री गुरूग्रंथ साहिब हॉल यात्री निवास नांदेड. सकाळी 9 वा. ब्रम्हकुमारी सद्भावना भवन 1/11/774 रुपा गेस्ट हॉऊस रोड वसंतनगर नांदेड येथे आगमन व राखीव. त्यानंतर सोयीनुसार परभणीकडे प्रयाण करतील. 

0000

कृपया सुधारित वृत्त घ्यावे ही विनंती (बातमीत दुरूस्ती- आदिवासी उपयोजनेसाठी 64 कोटी 20 लाख 20 हजार रुपये)

वृत्त क्र. 644

 

विविध विकासकामे वेळेत पूर्ण करण्यावर भर : पालकमंत्री अतुल सावे

 

·         सन 2025-26 साठी 815 कोटी 20 लाख 20 हजार मंजूर तरतूद

·         सन 2024-25 साठी 748 कोटी 99 लाख 95 हजार रुपये खर्चास मान्यता

·         पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधीची उपस्थिती

·         जिल्ह्यातील स्मशानभुमीसाठी प्रत्येक आमदारांना 1 कोटी रुपये निधी  

·         सर्व शासकीय कार्यालयावर सोलर पॅनल उभारणार

·         नुकसानग्रस्त फळपिक शेतकऱ्यांना लवकरच मदतीसाठी पाठपुरावा सुरू

·         महावितरण, परिवहन विभागाच्या कामाबाबत बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावू

 

 नांदेड, दि. 20 जून :- जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध विकास कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी भर देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवनाच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

 

यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणखासदार डॉ. अजित गोपछडेखासदार रविंद्र चव्हाणखासदार नागेश पाटील आष्टीकरखासदार डॉ. शिवाजीराव काळगेहरिद्रा संशोधन प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटीलआमदार विक्रम काळेआमदार प्रतापराव पाटील चिखलीकरआमदार भिमराव केरामआमदार बालाजी कल्याणकरआमदार आनंद बोंढारकरआमदार राजेश पवारआमदार जितेश अंतापूरकरआमदार बाबुराव कोहळीकरआमदार श्रीजया चव्हाणजिल्हाधिकारी राहुल कर्डिलेजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडेनिवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकरजिल्हा नियोजन अधिकारी अर्जून झाडे तसेच जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.

 

सुरवातीला 30 जानेवारी 2025 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या अनुपालनास मान्यता देण्यात आली. तसेच गेल्या वर्षी म्हणजेच सन 2024-25 मध्ये झालेल्या 748 कोटी 99 लाख 95 हजार रुपये खर्चास मान्यता खर्चास मंजूरी देण्यात आली.  जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना अशा एकत्रित जिल्हा वार्षिक योजनेच्या 2025-26  साठी आर्थिक तरतुदीच्या विनियोजनाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. 

 

सन 2025-26 साठी सर्वसाधारणसाठी 587 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 164 कोटी, आदिवासी उपयोजनेसाठी 64 कोटी 20 लाख 20 हजार रुपये याप्रमाणे एकुण 815 कोटी 20 लाख 20 हजार रुपये  मंजूर तरतूद आहे. याबाबत आढावा घेण्यात आला.

 

महावितरण-परिवहन विभागाची कामे लवकरच मार्गी

 

जिल्ह्यात सध्या महावितरणच्या कामाबाबत येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन याबाबत लवकरच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल. यात सर्व अडचणी सोडविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली. यासोबतच परिवहन विभागाबाबत ज्या काही लोकांच्या समस्या आहेत त्याबाबतही लवकरच बैठक घेवून हा प्रश्न निकाल काढण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

 

स्मशानभुमीसाठी प्रत्येक आमदारांना 1 कोटी रुपये निधी  

 

जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील निधी अभावी प्रलंबित व प्रगतीपथावर असलेल्या कामांबाबतची माहिती पालकमंत्री अतुल सावे यांना दिलीयावेळी लोकप्रतिनिधींनी काही गावांमध्ये स्मशानभूमीबाबत मागणी केलीत्यावर प्रत्येक आमदारांना स्मशानभूमीसाठी 1 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे पालकमंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले.

 

शासकीय कार्यालयावर सोलार पॅनल

येत्या डिसेंबरपर्यत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयावर सोलर पॅनल उभारणार असल्याची माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी यावेळी दिलीयामध्ये कार्यालयाच्या वीज बिलाची बचत होवून विजेच्या बिलापासून मुक्ती मिळणार आहे.

 

शेतकऱ्यांना मदतीसाठी पाठपुरावा

जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे केळी आणि पपई पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे होऊन त्याबाबतचा अहवाल शासनास सादर केला आहे. याबाबत शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी या बैठकीत सांगितले.

 

डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयास ईटपी म्हणजेच प्रयोगशाळेत जे रसायने वापरले जातात त्यांना शुद्धीकरण करुन ते नाल्यात सोडणे कामासाठी 75 लाख रुपये मंजूर केले आहे. दिव्यांगाचा जो निधी आहे तो निधी खर्च करण्यावर भर देऊ असेही त्यांनी सांगितले. जलजीवन मिशन कामांचा आढावा घेऊन त्यांनी संबंधितांना उपयुक्त सूचना दिल्या.

 

यावेळी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीनी आपआपल्या मतदार संघातील कामाचा माहितीप्रश्नअडचणी पालकमंत्री अतुल सावे यांच्यासमोर मांडल्या.  या सर्व समस्यांची सोडवणूक  करण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे पालकमंत्री अतुल सावे यांनी यावेळी यंत्रणाना सांगितले.  तसेच जिल्ह्यातील काही भागात ड्रग्जसअवैध धंदे, अंमली पदार्थाची वाहतुकीच्या तक्रारी आहेत. पोलिसांनी याकडे लक्ष वेधण्याचे त्यांनी सांगितले.

0000



















  वृत्त क्र. 706 खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची 31 जुलै मुदत   नांदेड, दि. ८ जुलै :- खरीप हंगाम 2025 साठी पीक विमा भरण्याची अंतिम दिनांक ...