Wednesday, January 10, 2024

 वृत्त क्र.  34

 

माळेगाव यात्रेस उत्साहात प्रारंभ

 

·         देवस्वारी व पालखी पूजनाला भक्तांची अलोट गर्दी

·         यावर्षी प्रथमच यात्रेत सिसिटीव्हीद्वारे नियंत्रण व प्लास्टीक मुक्त करण्याचा संकल्प

·         अतिक्रमणातील रस्ते मोकळे झाल्याने भाविकांमध्ये आनंद  

 

नांदेड (जिमाका), दि. 10 :- तीन शतकापेक्षा अधिक समृध्द वारसा असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेला आज पासून उत्साहात प्रारंभ झाला. आमदार श्यामसुंदर शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी श्री खंडोबाचे दर्शन घेवून भाविकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, माळेगावच्या सरपंच कमलाबाई रुस्तुमराव धुळगंडेप्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, पशुवैद्यकिय विभागाचे उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर  व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

 

गत 50 वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून माळेगावची यात्रा पशु पालकांसह पक्षीप्राणी यांच्या खरेदी-विक्रीचेही एक आदर्श ठिकाण म्हणून उदयास आले आहे. ग्रामीण भागातील यात्रेचा हा आदर्श मापदंड जिल्हा परिषदेच्या संयुक्त सहभागातून कृषि व पशुपालन साक्षरतेसाठी महत्वाचा ठरला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून याठिकाणी आयोजित केले जाणारे भव्य पशुप्रदर्शन हे शासकीय योजनांच्या साक्षरतेसह जातीवंत जनावरांच्या पालन पोषणाला चालना देणारे आहे. तसेच गाईम्हशी व पशु यांच्या उत्तम प्रतीच्या प्रजातीचे जतनपशुपालकांना मार्गदर्शनपशु व्यवसायाबाबत जागृतीलसीकरण हे या प्रदर्शनाचा हेतू आहे.

 

अतिक्रमणात अडकलेले रस्ते मोकळे झाल्याने भाविकांना दर्शनासाठी सहज वावर करणे शक्य झाले. याचबरोबर यावर्षी सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून अधिक सुरक्षितता घेतली जात असल्यामुळे व पशुपालकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले मैदान अधिक स्वच्छ व पुरेशा पाण्याच्या व्यवस्थेने परिपूर्ण केल्यामुळे पशुपालक व भाविकांनी आनंद व्यक्त केला. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यातून आलेल्या भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. खंडोबाच्‍या व मानकऱ्यांच्‍या पालखीचे प्रतिवर्षाप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने मानाचा फेटा, शाल श्रीफळ व मानधन देवून स्‍वागत करण्‍यात आले.

 

प्रारंभी सकाळी शासकीय पुजा करण्‍यात आली. त्‍यानंतर दुपारी पालखी पुजनानंतर देव स्‍वारी काढण्‍यात आली. यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे, जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, माळेगावच्या सरपंच कमलबाई रुस्तुमराव धुळगंडे व अन्य अधिक-यांची उपस्थिती होती.

पालखीचे मानकरी गणपतराव मल्‍हारी नाईक (रिसनगाव), गोविंदराव नागेशराव महाराज (कुरुळा), व्‍यंकटराव मारोतीराव पांडागळे (शिराढोण), खुशाल भगवानराव भोसीकर (पानभोसी), गोविंदराव बाबाराव नाईकवाडे (पानभोसी), पांडुरंग नारायणराव पाटील (माळेगाव), मल्‍हारी रावसाहेब पाटील (माळेगाव), विजयकुमार शंकरराव कनकदंडे (आष्टुर) या मानक-यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने फेटा बांधून गौरव करण्‍यात आला. यावेळी पालखी सोहळ्यात पारंपारीक पध्‍दतीने कवड्याच्‍या माळी, लांब हळदीचा मळभट, हातापायावर चाबकाचे फटके मारत वाघ्‍या मुरळी सहभागी झाले होते. त्यांना पाहण्‍यासाठी हजारो भाविकांनी एकच गर्दी केली होती.

 

यात्रेत पाळीव पशु, घोडे, गाढव विक्रीसाठी दाखल झाले आहेत. तसेच तमाशा मंडळ, आकाश पाळणे, घोंगडी, चादरी, बैल, गाय व प्राण्यांना सहजवणारे साहित्य, प्राण्यांच्या गळ्यातील घुंगरांचे पट्टे, स्वेटर, प्रसादाचे दुकान, ताडपत्री यांच्यासह विविध प्रकारच्या व्यवसायिक यात्रेत डेरेदाखल झाले आहेत. उद्या 11 रोजी सकाळी 11 वा. अश्व, श्वान, कुकुट प्रदर्शन व विविध स्पर्धा होणार आहेत.

00000

सर्व छायाचित्र : ज्ञानेश्वर सुनेगावकर, नांदेड 
























 वृत्त क्र.  33 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन व प्रस्थान

 

▪️जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा !

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री  तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा आज वाढदिवस असल्याचे समजताच त्यांनी या स्वागता पाठोपाठ अभिजीत राऊत यांना शुभेच्छाही दिल्या. आपल्या स्वागतापलीकडे असलेल्या राजशिष्टाचाराला बाजुला सारून त्यांनी वेळेवर समयसूचकता घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या शुभेच्छा या त्यांच्यातील सहृदयी मनाच्या प्रतिक ठरल्या. 

 

नियोजनाप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील पोफाळी व हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील कार्यक्रम आटोपून त्यांनी नांदेड येथून मुंबईकडे प्रयाण केले.

00000

(छाया : सदानंद वडजे, नांदेड)







  वृत्त क्र. 32


नांदेड जिल्ह्याला पर्यटनाच्या क्षेत्रात विकासाच्या मुबलक संधी

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

·         जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देश

·         200 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी

·         शिर्डीच्या धर्तीवर व्हावा नांदेड चा विकास

 

नांदेड (जिमाका)दि. 10 :- नांदेड जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी दडलेल्या आहेत. येथील शिख धर्मीयाचे श्रध्दास्थान असलेले हुजूर साहिब सचखंड गुरुद्वारासाडेतीन शक्ती पिठापैकी एक असलेले माहूर येथील रेणूका देवी मंदिर व दत्ताचे जागृत स्थानविस्तीर्ण गोदावरीमहानगरानजीक असलेला विष्णुपूरी प्रकल्पाचा जलाशय आदी ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. राज्यातील शिर्डीच्या धर्तीवर नांदेड येथे विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील असून विमानसेवा सुरु करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यात येईलअसे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केले.

 

नांदेड जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रमाणालीद्वारे राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीस नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवलेनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरव विजयविभागीय आयुक्त मधुकर राजेअर्दडनियोजन विभागाचे उपआयुक्त किरण गिरगावकर यांनी दूरदृष्यप्रमाणालीद्वारे तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊतमनपा आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडेजिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे व इतर विभागाचे अधिकारी यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती.

 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नांदेड जिल्ह्याच्या विविध विकास कामांचा सचित्र आढावा सादर केला. तसेच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2024-25 च्‍या रु. 426.00 कोटीच्या प्रारूप आराखडा राज्यस्तरीय समितीस मान्यतेसाठी सादर केला. नांदेड जिल्ह्याची असलेली व्याप्तीसोळा तालुकेदोन राज्याच्या असलेल्या सीमा लक्षात घेता विविध विभागाने विकास कामासाठी निधीची मागणी केली आहे. या विकास कामासाठी 200 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केली. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक विचार करु असे सांगितले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सचित्र सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या प्रगतीचा आढावा सादर केला.

0000






 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...