Wednesday, January 10, 2024

 वृत्त क्र.  34

 

माळेगाव यात्रेस उत्साहात प्रारंभ

 

·         देवस्वारी व पालखी पूजनाला भक्तांची अलोट गर्दी

·         यावर्षी प्रथमच यात्रेत सिसिटीव्हीद्वारे नियंत्रण व प्लास्टीक मुक्त करण्याचा संकल्प

·         अतिक्रमणातील रस्ते मोकळे झाल्याने भाविकांमध्ये आनंद  

 

नांदेड (जिमाका), दि. 10 :- तीन शतकापेक्षा अधिक समृध्द वारसा असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेला आज पासून उत्साहात प्रारंभ झाला. आमदार श्यामसुंदर शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी श्री खंडोबाचे दर्शन घेवून भाविकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, माळेगावच्या सरपंच कमलाबाई रुस्तुमराव धुळगंडेप्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, पशुवैद्यकिय विभागाचे उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर  व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

 

गत 50 वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून माळेगावची यात्रा पशु पालकांसह पक्षीप्राणी यांच्या खरेदी-विक्रीचेही एक आदर्श ठिकाण म्हणून उदयास आले आहे. ग्रामीण भागातील यात्रेचा हा आदर्श मापदंड जिल्हा परिषदेच्या संयुक्त सहभागातून कृषि व पशुपालन साक्षरतेसाठी महत्वाचा ठरला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून याठिकाणी आयोजित केले जाणारे भव्य पशुप्रदर्शन हे शासकीय योजनांच्या साक्षरतेसह जातीवंत जनावरांच्या पालन पोषणाला चालना देणारे आहे. तसेच गाईम्हशी व पशु यांच्या उत्तम प्रतीच्या प्रजातीचे जतनपशुपालकांना मार्गदर्शनपशु व्यवसायाबाबत जागृतीलसीकरण हे या प्रदर्शनाचा हेतू आहे.

 

अतिक्रमणात अडकलेले रस्ते मोकळे झाल्याने भाविकांना दर्शनासाठी सहज वावर करणे शक्य झाले. याचबरोबर यावर्षी सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून अधिक सुरक्षितता घेतली जात असल्यामुळे व पशुपालकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले मैदान अधिक स्वच्छ व पुरेशा पाण्याच्या व्यवस्थेने परिपूर्ण केल्यामुळे पशुपालक व भाविकांनी आनंद व्यक्त केला. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यातून आलेल्या भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. खंडोबाच्‍या व मानकऱ्यांच्‍या पालखीचे प्रतिवर्षाप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने मानाचा फेटा, शाल श्रीफळ व मानधन देवून स्‍वागत करण्‍यात आले.

 

प्रारंभी सकाळी शासकीय पुजा करण्‍यात आली. त्‍यानंतर दुपारी पालखी पुजनानंतर देव स्‍वारी काढण्‍यात आली. यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे, जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, माळेगावच्या सरपंच कमलबाई रुस्तुमराव धुळगंडे व अन्य अधिक-यांची उपस्थिती होती.

पालखीचे मानकरी गणपतराव मल्‍हारी नाईक (रिसनगाव), गोविंदराव नागेशराव महाराज (कुरुळा), व्‍यंकटराव मारोतीराव पांडागळे (शिराढोण), खुशाल भगवानराव भोसीकर (पानभोसी), गोविंदराव बाबाराव नाईकवाडे (पानभोसी), पांडुरंग नारायणराव पाटील (माळेगाव), मल्‍हारी रावसाहेब पाटील (माळेगाव), विजयकुमार शंकरराव कनकदंडे (आष्टुर) या मानक-यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने फेटा बांधून गौरव करण्‍यात आला. यावेळी पालखी सोहळ्यात पारंपारीक पध्‍दतीने कवड्याच्‍या माळी, लांब हळदीचा मळभट, हातापायावर चाबकाचे फटके मारत वाघ्‍या मुरळी सहभागी झाले होते. त्यांना पाहण्‍यासाठी हजारो भाविकांनी एकच गर्दी केली होती.

 

यात्रेत पाळीव पशु, घोडे, गाढव विक्रीसाठी दाखल झाले आहेत. तसेच तमाशा मंडळ, आकाश पाळणे, घोंगडी, चादरी, बैल, गाय व प्राण्यांना सहजवणारे साहित्य, प्राण्यांच्या गळ्यातील घुंगरांचे पट्टे, स्वेटर, प्रसादाचे दुकान, ताडपत्री यांच्यासह विविध प्रकारच्या व्यवसायिक यात्रेत डेरेदाखल झाले आहेत. उद्या 11 रोजी सकाळी 11 वा. अश्व, श्वान, कुकुट प्रदर्शन व विविध स्पर्धा होणार आहेत.

00000

सर्व छायाचित्र : ज्ञानेश्वर सुनेगावकर, नांदेड 
























No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...