Thursday, November 30, 2017

मौखिक आरोग्य तपासणी
मोहिमेची रॅली उत्साहात संपन्न
नांदेड, दि. 30 :- मौखिक आरोग्य तपासणी मोहीम जिल्ह्यात 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेच्या उद्घाटनानिमित्त जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत रॅलीची सुरुवात महापौर श्रीमती शीलाताई भवरे व प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन करण्यात आली.
रॅली जिल्हा रुग्णालय ते गांधी पुतळा मार्ग पोलीस मुख्यालय पासून जिल्हा रुग्णालय येथे रॅलीचे समारोप करण्यात आला. रॅलीस जिल्हा रुग्णालय येथील शासकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी, तसेच यशवंत महाविद्यालय, पीपल्स महाविद्यालय येथील विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फुर्त सहभाग होता.

000000
शनिवारी दारु दुकाने बंद  
नांदेड, दि. 30 :- जिल्ह्यात व शहरात शनिवार 2 डिसेंबर 2017 रोजी मुस्लीम बांधवाच्यावतीने मोठ्या प्रमाणात ईद-ए-मिलादुन्नबी (हजरत मोहम्मद पैगंबर जयंती) साजरी करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी काढले आहेत.

उत्सवा दरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 142 (1) अन्वये शनिवार 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-4, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल/बीआर-2 व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्याअंतर्गत व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची त्यांनी नोंद घ्यावी, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.              
000000
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे
5 डिसेंबरला आयोजन
नांदेड , दि. 30 :- "उज्ज्वल नांदेड" या मोहिमेअतंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने मंगळवार 5 डिंसेबर 2017 रोजी सकाळी 9.30 ते सायं. 6.30 या वेळेत डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम परिसर, नांदेड या ठिकाणी एक दिवसीय स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
            अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या शिबिरात पुणे येथील प्रा. सचिन ढवळे हे एमपीएससी सी-सॅट व शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षेमधील अंकगणित, बुध्दिमत्ता चाचणी आणि आकलनक्षमता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी मनपा आयुक्त गणेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संबंधीतांनी मार्गदर्शनशिबिरास उपस्थित राहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.

00000
जागतिक एड्स दिनानिमित्त
रॅली उत्साहात संपन्न
नांदेड , दि. 30 :-जागतिक एड्स दिनानिमित्त राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग नांदेड श्री गुरुगोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयांतर्गत रॅलीचे आयोजन आज करण्यात आले होते. ही रॅली श्री गुरुगोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय येथुन गांधी पुतळा मार्गे- वजिराबाद-मुथा चौक- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-श्री गुरुगोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे सांगता झाली.
यावेळी महापौर शिलाताई भवरे व प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटुरकर यांचे हस्ते रॅलीस हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. रॅलीत नर्सिंग कॉलेज प्राचार्य श्रीमती एस. ए. गायकवाड व कर्मचारी वर्ग, प्रा. डॉ. डी. डी. पवार, प्रा. कांबळे, यशवंत महाविद्यालयाचे प्रा. बोकडे, पिपल्स महाविद्यालयाचे प्रा. मुनेश्वर, टी आय एफएसडब्ल्यु प्रकल्प, एमएसएम प्रकल्प, लिंकवर्कर  प्रकल्प, विविध कॉलेजचे एनएसएस प्रमुख, विद्यार्थी व विद्यार्थींनी, आरोग्य कर्मचारी, आयसीटीसी विभाग, सक्षम सेवाभावी संस्था सिडको व विविध सेवाभावी संस्थेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
यावेळी डॉ. गुंटूरकर यांनी  एचआयव्ही / एड्सबाबत माहिती देवून जागतिक एड्स दिनाचे महत्व स्पष्ट केले. सुत्रसंचालन श्रीनिवास अमिलकंठवार यांनी केले तर  माधव वायवळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन जिल्हा पर्यवेक्षक प्रवीण गुजर, श्रीनिवास अमिलकंठवार, मोगल मोईज बेग, अजय मवाडे यांनी केले.

0000
खेळाडुनी खेळात सर्वोत्कृष्ट योगदान द्यावे   
- अजित कुंभार
नांदेड, दि. 30:- खेळाडुनी खेळात आपल्यातील सर्वोत्कृष्ट योगदान द्यावे, असे आवाहन किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचा वार्षिक प्रकल्प स्तरीय क्रिडा स्पर्धेचा शुभारंभ सहाय्यक जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या हस्ते शासकीय आश्रमशाळा किनवट येथे संपन्न झाला. त्यावेळी खेळाडुंना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात सहस्त्रकुंड, बांधेडी, उमरी व सारखणी या केंद्रातंर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील  577 खेळाडुंच्या शानदार संचलनाने झाली.

या उद्घाटन सोहळ्यास नियोजन अधिकारी अर्जून झाडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासन), सुनिल बारसे, कार्यालयीन अधीक्षक श्री. बोंतावार, स.प्र.अ. शिक्षण रजनवलवार, श्री. शेगोकार, क.शि.वि.अ श्री. जगदाळे, श्री. चटलेवाड , श्रीमती गोरे , पंच कमिटी सदस्य श्री. पठाण , किनवट शाळेचे मुख्याध्यापक श्री. कराड आदिंची उपस्थिती होती.  प्रस्ताविक श्री. कराड यांनी तर आभार व्ही. आर. खांडरे यांनी मानले.  

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...