Sunday, December 15, 2024

 बीड, परभणीच्या घटना गंभीर; सरकारची सविस्तर चर्चेची तयारी

संविधानचा अपमान सहन केला जाणार नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि.16:- बीड, परभणी येथील घडलेल्या दोन्ही  घटना गंभीर आहेत. या घटनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून संविधानचा अपमान सहन केला जाणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबांच्या संविधानानुसार अपेक्षित चर्चा सभागृहात झाली पाहिजे. संविधानाचा अपमान करणारा व्यक्ती मनोरुग्ण होता. विरोधी पक्षाने राजकारण न करता अशा घटना घडू नयेत यासाठी चांगल्या सूचना मांडाव्यात अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात मुद्दा  उपस्थित केला होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्ताव दरम्यान सविस्तर चर्चा करण्यात येईल असे स्पष्ट केले.
0000000000
राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना दिली पद व गोपनियतेची शपथ


ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधी सोहळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

नागपूर, दि.15 : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधीचा सोहळा पार पडला. समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची उपस्थिती होती.  

समारंभास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश नाईक, दादाजी भुसे, संजय राठोड, धनंजय मुंडे, मंगलप्रभात लोढा, उदय सामंत, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक ऊईके, शंभुराज देसाई, अँड.आशिष शेलार, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, शिवेंद्रसिंह भोसले, अँड.माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवाळ, संजय सावकारे, संजय सिरसाठ, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, मकरंद जाधव पाटील, नितेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबीटकर यांचा समावेश आहे.

सोबतच 6 सदस्यांना राज्यपालांनी राज्यमंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ दिली. त्यात माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर साकोरे, इंद्रनील नाईक, योगेश कदम यांचा समावेश आहे. शपथविधी सोहळ्याचे संचलन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केले. सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली. सोहळ्यास खासदार, आमदार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.
000000




#मंत्रिमंडळविस्तार

#शपथविधीसोहळा





















वृत्त क्र. 1199

नांदेडमध्ये राज्यस्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्न 

नांदेड दि. १५ डिसेंबर :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व राष्ट्रीय सेवा योजना, स्वा.रा.ती.मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व नेहरु युवा केंद्र, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर युवा महोत्सव सन 2024-25 (15 ते 29 वर्षाआतील युवक-युवती) चे आयोजन 12 ते 14 डिसेंबर, 2024 या कालावधीत कुसुम सभागृह, व्ही.आय.पी.रोड, नांदेड येथे संपन्न झाले.

​या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल या तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन पुणे विभागाचे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक युवराज नाईक व सहायक संचालक मिलींद दिक्षीत, सहाय्यक संचालक, हिंगोलीचे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे ,श्रीमती सान्वी जेठवाणी, अध्यक्ष सप्तरंग सेवाभावी संस्था,नांदेड आदि मान्यवर उपस्थित होते.

​या राज्यस्तरीय युवा महोत्सवाचा अंतिम निकाल खालीलप्रमाणे आहे.  

संकल्पना आधारीत स्पर्धा – प्रथम – पुष्यमित्र किशवराव जोशी  (छ.संभाजीनगर), द्वितीय – विश्वम्राज्ञी रामराजे माने (कोल्हापूर), तृतिय विभागून- सिध्दी संदिप पांडे, प्रणव गोपाळ बोरसे (मुंबई) व अनुराग राजेश पाटील (नाशिक)

समुह लोकनृत्य – प्रथम – मुंबई विभाग (दिवली नृत्य), द्वितीय- कोल्हापूर विभाग (लेझीम नृत्य), तृतीय- पुणे विभाग (कातकरी नृत्य)

वक्तृत्व स्पर्धा – प्रथम – अनुष्का बॅनर्जी (पुणे), द्वितीय- अंश राय (मुंबई), तृतीय विभागून- प्रेरणा राऊत (नागपूर) व अक्षरी मोरे (लातूर) ​​

काव्य लेखन – प्रथम – तनुजा अमित कंकडालवार (नागपूर), द्वितीय- रसिका मुकंद ढेपे (वाशिम), तृतिय- अथर्व विश्वास केळकर (नाशिक)

चित्रकला – प्रथम – कुणाल विष्णु जाधव (नाशिक विभाग), द्वितीय- प्रतिक हाणमंत तांदळे (पुणे), तृतिय विभागून- मुकेश राजेंद्र आढाव (नाशिक विभाग) व समय अजय चौधरी (अमरावती विभाग)

कथा लेखा- प्रथम – व्यंकटेश नारायण नेरकर (अमरावती विभाग), द्वितीय –अक्षता रविंद्र जाधव (कोल्हापूर विभाग), तृतिय विभागून– ऋषिता चंद्रशेखर पवार (लातूर विभाग) व साक्षी उध्दवराव खरात (छ.संभाजीनगर)

समुह लोकगीत– प्रथम – लातूर विभाग, द्वितीय- अमरावती विभाग, तृतीय विभागून- कोल्हापूर विभाग व नाशिक विभाग

​या युवा महोत्सवात उत्कृष्ट कामगीरी केलेल्या युवक-युवतींनी दिल्ली येथे 12 ते 16 जानेवारी,2025 दरम्यान संपन्न होणा-या राष्ट्रीय युवा महोत्सव 2024-25 करीता महाराष्ट्र राज्याच्या संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

या स्पर्धेकरीता परीक्षक म्हणुन

संकल्पना आधारीत स्पर्धा- प्रा.डॉ. मनिष देशपांडे (नांदेड), प्रा. डॉ. एन.आर.पवार  (यवतमाळ), प्रा.डॉ. आनंद आष्टुरकर (नांदेड), समुह लोकगीत करीता प्रा.डॉ. निखिलेश नलोडे (यवतमाळ), प्रा. डॉ. शिवराज शिंदे (नांदेड), मा. शाहीर संतोष साळुंखे (लातुर), संकेत राजपुत (मुंबई), राहुल तायडे (अमरावती), समुह लोकनृत्य - प्रा. डॉ. रवींद्र हरीदास (नागपूर), प्रा. डॉ. पंकज खेडकर (परभणी), प्रा.राजेंद्र गजानन संकपाळ (सातारा), मा. डॉ. सान्वी जेठवाणी (नांदेड), मा. श्री. संदेश हटकर (नांदेड), वकृत्व स्पर्धा- प्रा. डॉ. रमा नवले  (नांदेड), प्रा.डॉ. संदिप काळे (नांदेड), काव्य लेखन स्पर्धा - प्रा. डॉ. विश्वाधार देशमुख   (नांदेड), मा. श्री. बापु दासरी (नांदेड), प्रा. डॉ. संभाजी मनुरकर (नांदेड), चित्रकला स्पर्धा - प्रा. शेख जाहेद उमर (छ.संभाजीनगर), प्रा. सौ. कविता जोशी (नांदेड), प्रा. सिध्दार्थ नागठाणकर (परभणी), कथा लेखन स्पर्धा- प्रा. डॉ. पांडुरंग पांचाळ (कंधार-नांदेड), सुहास देशपांडे (नांदेड), डॉ. चंद्रशेखर दवणे (लातूर)

​ही स्पर्धा यशस्वी करणेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे मार्गदर्शनाखाली राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, श्रीमती शिवकांता देशमुख, राहुल श्रीरामवार (क्रीडा अधिकारी) विपुल दापके (क्रीडा अधिकारी), वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, डॉ.बालाजी पेनूरकर, फजल गफुरसाब मुल्ला, मकरंद पाटील, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे, व्यवस्थापक संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे 

000








  वृत्त क्र. 1198

नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न

विविध प्रकरणात 47 कोटी 29 लाख 33 हजार रक्कमेची तडजोड

11 हजार 977 प्रकरणे सामोपचाराने निकाली 

नांदेड दि. 15 डिसेंबर :- राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार 14 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील 11 हजार 977  प्रकरणे या लोकअदालतीत सामोपचाराने निकाली काढून विविध प्रकरणात 47 कोटी 29 लाख 33 हजार 584 रक्कमेबाबत तडजोड करण्यात आली. ही लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश तसेच पॅनलवरील न्यायाधीश व वकील सदस्य तसेच पॅनल सदस्य व सर्व विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. 

प्रत्येक तालुक्यासह कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालयात सुद्धा त्या-त्या न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात दिवाणी, फौजदारी, धनादेश अनादरित प्रकरणे, बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात, भूसंपादन, लोहमार्ग गुन्हा कबुली प्रकरणे, ग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणीपट्टीचे  प्रकरणे व इतर तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार, सहकार न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा व नांदेड वाघाळा महानगरपालिका, पंचायत समिती व ग्रामपंचायतीचे वसुली प्रकरणे, विविध बॅंकाचा तसेच विद्युत प्रकरणे, टेलिफोन, मोबाईल, ट्रॅफिक चालन यांचे दाखलपूर्व प्रकरणाचा समावेश होता. तसेच पाच दिवस घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत  648 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. 

विशेष म्हणजे या लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यातील पत्नी-पत्नीचे कौटुंबिक वादाची एकूण 21 प्रकरणे आपसात तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. यापैकी 8 वैवाहिक दांपत्यांनी आपसातील वाद संपवून पुन्हा एकत्र येवून संसाराची सुरवात करण्याचा निर्णय लोकअदालतीच्या माध्यमातून घेतला.

नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष, जिल्हा सरकारी वकिल तसेच जिल्ह्यातील सर्व विधिज्ञ आणि विविध विमा कंपनी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभाग अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, न्यायालयीन व्यवस्थापक, प्रबंधक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. ही लोकअदालत यशस्वी व जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढून लोकअदालत यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी विशेष प्रयत्न केले. जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश दलजीत कौर जज, मुख्यालयातील व तालुकास्तरावरील सर्व जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश यांनी विशेष प्रयत्न केले. न्यायाधीश दलजीत कौर जज यांनी लोकअदालत यशस्वी  झाल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. 

सर्व पक्षकार, न्यायाधीश, विधीज्ञ, न्यायालयीन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानून यापुढेही अशीच सहकार्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

00000



  वृत्त क्र. 1197

जिल्‍हयात आजपासून  ॲग्रिस्टॅक मोहिमेस सुरुवात

#१६ तालुक्‍यात लोकप्रतिनिधीं, वरीष्‍ठ अधिकारी यांच्‍या उपस्थितीत एकाच वेळी उदघाटन

नांदेड दि. १५ डिसेंबर : कृषि क्षेत्रात डिजीटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारकरित्या लाभ देणे सुलभ व्हावे यासाठी राज्यात ॲग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यात यासाठी उद्या 16 डिसेंबरपासून मोहिम राबविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोहिमेच्या दिवशी उपस्थित राहून आपला शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. 

शेतकरी ओळख क्रमांकामुळे शेतकऱ्यांना पीएम किसान ,पीककर्ज , पीक विमा, शेतीअनुदान इत्‍यादी विविध योजनांचा लाभ सुलभतेने मिळवता येणार आहे. सोमवार १६ डिसेंबर २०२४ रोजी जिल्‍हा भरात या मोहिमेस सुरुवात होणार आहे. प्रत्‍येक तालुक्‍यातील एका गावात स्‍थानिक लोकप्रतिनिधी, प्रभावशाली व्‍यक्‍ती व संबंधीत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपाधिक्षक भूमि अभिलेख व त्‍यांचे अधिनस्‍त कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. 

या योजनेच्‍या प्रभावी अंमलबजावणीसाठी गावनिहाय पथकांची निर्मिती करण्‍यात आली आहे. यात ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि ग्रामविकास अधिकारी (ग्रामसेवक)/ कृषी सहायक यांचा समावेश आहे. हे पथक त्‍यांना नेमून दिलेल्‍या गावांमध्‍ये तीन दिवस निवासी राहून अॅग्रीस्‍टॅक योजनेची प्रचार व प्रसिध्‍दी करेल आणि जास्‍तीत जास्‍त शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्‍याची कार्यवाही पुर्ण करेल.

तरी शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचे लाभ प्राप्त करुन घेण्यासाठी आपल्या गावात मोहिमेच्या दिवशी शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तालुका निहाय पुढील गावात दिनांक १६.१२.२०२४ रोजी होणार ॲग्रिस्टॅकमोहिमेचे उद्धाटन 

नांदेड तालुका दर्यापूर, किनवट- इस्‍लापूर, माहूर- सावरखेड, हिमायतनगर- करंजी, अर्धापूर- पार्डी म., मुदखेड- नागेली, भोकर- पोमनाळ, उमरी- करकाळा, धर्माबाद- नेरली, बिलोली- कोटग्‍याळ, नायगाव- शेळगाव, लोहा- कलंबर खु., कंधार- करताळा, मुखेड- दापका गुं. देगलूर- लख्‍खा व हदगाव तालुक्‍यातील तालंग.

00000

जिल्ह्यात वंधत्व व उशिरा गर्भधारणा समस्येवर 'फर्टिलिटी ओपीडी ' सुरू नागरिकांनी आरोग्य यंत्रणेच्या सुविधेचा लाभ घ्यावा

 जिल्ह्यात वंधत्व व उशिरा गर्भधारणा समस्येवर 'फर्टिलिटी ओपीडी ' सुरू   नागरिकांनी आरोग्य यंत्रणेच्या सुविधेचा लाभ घ्यावा  नांदेड दि....