Sunday, December 15, 2024

  वृत्त क्र. 1198

नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न

विविध प्रकरणात 47 कोटी 29 लाख 33 हजार रक्कमेची तडजोड

11 हजार 977 प्रकरणे सामोपचाराने निकाली 

नांदेड दि. 15 डिसेंबर :- राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार 14 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील 11 हजार 977  प्रकरणे या लोकअदालतीत सामोपचाराने निकाली काढून विविध प्रकरणात 47 कोटी 29 लाख 33 हजार 584 रक्कमेबाबत तडजोड करण्यात आली. ही लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश तसेच पॅनलवरील न्यायाधीश व वकील सदस्य तसेच पॅनल सदस्य व सर्व विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. 

प्रत्येक तालुक्यासह कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालयात सुद्धा त्या-त्या न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात दिवाणी, फौजदारी, धनादेश अनादरित प्रकरणे, बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात, भूसंपादन, लोहमार्ग गुन्हा कबुली प्रकरणे, ग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणीपट्टीचे  प्रकरणे व इतर तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार, सहकार न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा व नांदेड वाघाळा महानगरपालिका, पंचायत समिती व ग्रामपंचायतीचे वसुली प्रकरणे, विविध बॅंकाचा तसेच विद्युत प्रकरणे, टेलिफोन, मोबाईल, ट्रॅफिक चालन यांचे दाखलपूर्व प्रकरणाचा समावेश होता. तसेच पाच दिवस घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत  648 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. 

विशेष म्हणजे या लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यातील पत्नी-पत्नीचे कौटुंबिक वादाची एकूण 21 प्रकरणे आपसात तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. यापैकी 8 वैवाहिक दांपत्यांनी आपसातील वाद संपवून पुन्हा एकत्र येवून संसाराची सुरवात करण्याचा निर्णय लोकअदालतीच्या माध्यमातून घेतला.

नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष, जिल्हा सरकारी वकिल तसेच जिल्ह्यातील सर्व विधिज्ञ आणि विविध विमा कंपनी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभाग अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, न्यायालयीन व्यवस्थापक, प्रबंधक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. ही लोकअदालत यशस्वी व जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढून लोकअदालत यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी विशेष प्रयत्न केले. जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश दलजीत कौर जज, मुख्यालयातील व तालुकास्तरावरील सर्व जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश यांनी विशेष प्रयत्न केले. न्यायाधीश दलजीत कौर जज यांनी लोकअदालत यशस्वी  झाल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. 

सर्व पक्षकार, न्यायाधीश, विधीज्ञ, न्यायालयीन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानून यापुढेही अशीच सहकार्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

00000



No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 68 नांदेड जिल्ह्यातील 67 रेती घाटांची जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष पर्यावरणीय जन सुनावणी  स्थानिक रोजगाराला प्राधान्य देण्याचा स...