Thursday, May 22, 2025

 वृत्त क्रमांक 525 

अंगणवाडी मदतनिस (मानधनी) पद भरतीची गुणवत्ता व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध 

नांदेड दि. 22 मे :- महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाचा शासन निर्णय 30 जानेवारी 20252 फेब्रुवारी 2023 नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर या कार्यालयातील अंगणवाडी मदतनिस (मानधनी) पद भरती-2025 ची अंतिम गुणवत्ता यादी व प्रतिक्षा यादि https://nanded.gov.in या संकेतस्थळावर व कार्यालयीन नोटिस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे आवाहन व्हि.एस. बोराटे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 524

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पुर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड दि. 22 मे :- महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 ही परीक्षा रविवार 1 जून 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील 37 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी कळवले आहे.  

नांदेड जिल्ह्यातील विविध 37  विद्यालय, महाविद्यालयातील केंद्रावर सकाळी  11 ते दुपारी 12  या कालावधीत परीक्षा होणार असून त्यासाठी  9 हजार 624 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरातील भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत च्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच परीक्षेच्य कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस कॅलक्यूलेटर, ट्रान्झिस्टर, रेडिओ, लॅपटॉप इ. तत्सम साहित्य परीक्षा केंद्राच्या 100 मीटर पर्यत परिसरात नेण्यास, वापरण्यास, जवळ बाळगण्यास तसेच परीक्षा केंद्रात नेण्यास प्रतिबंध केला आहे. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील  100  मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी आदेशात नमूद केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 523

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता  

हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना  

नांदेड, दि. २२ मे :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र , मुंबई यांनी 22 मे 2025 रोजी  दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 22 मे 2025 या एक दिवसासाठी ऑरेंज (Orange) अलर्ट जारी केलेला आहे. या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 50 ते 60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

या गोष्टी करा 

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. 

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000

 नागरिकांनी ‘दामिनी’ अँप वापरावे: विभागीय आयुक्त दिलीप गावडे

छत्रपती संभाजीनगर, दि.22:- मान्सून कालावधीत विशेषत: जून व जुलै या महिन्यात वीज पडण्याचे प्रमाण लक्षात घेता जीवितहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून "दामिनी " अँप वापरण्याचे आवाहन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.

सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, कृषिसेवक, कोतवाल, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत संगणक परिचालक आणि नागरिकांनी अॅपचा वापर करावा.

"दामिनी" अॅप गुगल प्लेस्टोअरवर https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini या लिंकवरुन डाऊनलोड करता येईल. या ॲपमध्ये जीपीएस स्थळाद्वारे वीज पडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी स्थिती दर्शविण्यात येते. अॅपमध्ये आपल्या सभोवतालीच्या परिसरात वीज पडण्याची सूचना प्राप्त होताच त्या ठिकाणापासून सुरक्षित स्थळी स्थालंतरीत व्हावे. यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये.

गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्राप्त सुचनेनुसार गावातील नागरिकांना पूर्वसूचना द्यावी आणि होणारी जीवितहानी टाळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

## वीज पडण्याची शक्यता असल्यास घ्यावयाची काळजी

काय करावे:

विजा चमकत असताना शक्यतो घरात किंवा सुरक्षित बंदिस्त जागेत आसरा घ्या. इमारत, गुहा, खड्डा हे सुरक्षित ठिकाण असू शकतात.

घरात असाल तर दारं-खिडक्या बंद करा, त्यापासून लांब राहा.

विद्युत उपकरणे (टीव्ही, फ्रिज, मिक्सर, हेअर ड्रायर, रेझर) बंद करा आणि प्लगमधून काढा.

पाण्यापासून, धातूच्या वस्तूंपासून आणि उंच झाडांपासून दूर राहा.

बाहेर असाल तर झाडाखाली किंवा उंच जागी उभे राहू नका; शक्यतो सुरक्षित आसरा मिळवा.

शेतात असाल तर दोन्ही पाय गुडघ्याजवळ घेऊन खाली बसा, कानावर हात ठेवा आणि जमिनीशी कमीतकमी संपर्क ठेवा.

पाण्यात असाल तर त्वरित बाहेर या.

विजेचा प्रभार जाणवला (केस उभे राहणे, त्वचेला मुंग्या येणे) तर त्वरित जमिनीवर ओणवे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा.

मुलं आणि पाळीव प्राणी घरात आहेत याची खात्री करा.

काय करू नये:

विजा चमकत असताना घराबाहेर जाऊ नका, प्रवास टाळा.

मोठ्या झाडाखाली किंवा उंच जागी उभे राहू नका.

धातूच्या वस्तू, लोखंड, तांबे जवळ ठेवू नका किंवा त्यांना स्पर्श करू नका.

टेलिफोन, मोबाईल चार्जिंग, किंवा इतर विद्युत उपकरणांचा वापर टाळा.

वाहत्या पाण्यात किंवा ओल्या भिंतींना, धातूच्या नळांना स्पर्श करू नका.

अफवांवर विश्वास ठेवू नका; अधिकृत माहितीच ग्राह्य धरा.

वीज पडल्यानंतर:

व्यक्तीवर वीज पडल्यास श्वास व हृदयाचे ठोके तपासा, कृत्रिम श्वास किंवा कार्डिआक कॉम्प्रेशन द्या, आणि त्वरित रुग्णालयात घेऊन जा.

**

वृत्त क्रमांक 522

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष 

नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा नांदेड दौरा

नांदेड दि. 22 मे :- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मर्यादित मुंबईचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शुक्रवार 23 मे रोजी धाराशीव येथून सायं 5 वा. नांदेडसाठी रवाना व शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम. शनिवार 24 मे रोजी सकाळी 9.30 वा . श्रीमती चंद्रकला घोडजकर 48-शाहूनगर नांदेड येथे सदिच्छा भेट. दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पत्रकार परिषदेस उपस्थिती. दुपारी 3 वा. सोलापूरकडे प्रयाण करतील.

0000

पत्रकार परिषद निमंत्रण

प्रति ,

मा. संपादक / प्रतिनिधी

मुद्रीत / इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यम,    

नांदेड  

महोदय,

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष मा. श्री. नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे महामंडळाच्या सद्यस्थितीत अंमलात असलेल्या योजनांबाबत माहिती देण्यासाठी शनिवार, 24 मे 2025 रोजी दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

कृपया, आपण या पत्रकार परिषदेस उपस्थित रहावे, ही विनंती. 

 

पत्रकार परिषद दिनांक        :-  24 मे 2025

वेळ                           :-   दुपारी 12. 30 वा.

स्थळ                         :- शासकीय विश्रामगृह, नांदेड


प्र. जिल्हा माहिती अधिकारी,

           नांदेड

वृत्त क्रमांक 521

महाराष्ट्र विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते 

अंबादास दानवे यांचा नांदेड दौरा

नांदेड दि. 22 मे :- महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

गुरूवार 22 मे रोजी लातूर येथून मोटारीने रात्री 12 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन व राखीव. शुक्रवार 23 मे रोजी सकाळी 10.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा व भेट. सकाळी 11.30 वा. नांदेड येथून मोटारीने परभणीकडे प्रयाण करतील.

0000

वृत्त क्र. 645     पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्ह्यातील 7 पंचायत समित्यांना शासकीय वाहनां चे वितरण   नांदेड 20 जून - न...