Thursday, May 22, 2025

 नागरिकांनी ‘दामिनी’ अँप वापरावे: विभागीय आयुक्त दिलीप गावडे

छत्रपती संभाजीनगर, दि.22:- मान्सून कालावधीत विशेषत: जून व जुलै या महिन्यात वीज पडण्याचे प्रमाण लक्षात घेता जीवितहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून "दामिनी " अँप वापरण्याचे आवाहन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.

सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, कृषिसेवक, कोतवाल, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत संगणक परिचालक आणि नागरिकांनी अॅपचा वापर करावा.

"दामिनी" अॅप गुगल प्लेस्टोअरवर https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini या लिंकवरुन डाऊनलोड करता येईल. या ॲपमध्ये जीपीएस स्थळाद्वारे वीज पडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी स्थिती दर्शविण्यात येते. अॅपमध्ये आपल्या सभोवतालीच्या परिसरात वीज पडण्याची सूचना प्राप्त होताच त्या ठिकाणापासून सुरक्षित स्थळी स्थालंतरीत व्हावे. यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये.

गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्राप्त सुचनेनुसार गावातील नागरिकांना पूर्वसूचना द्यावी आणि होणारी जीवितहानी टाळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

## वीज पडण्याची शक्यता असल्यास घ्यावयाची काळजी

काय करावे:

विजा चमकत असताना शक्यतो घरात किंवा सुरक्षित बंदिस्त जागेत आसरा घ्या. इमारत, गुहा, खड्डा हे सुरक्षित ठिकाण असू शकतात.

घरात असाल तर दारं-खिडक्या बंद करा, त्यापासून लांब राहा.

विद्युत उपकरणे (टीव्ही, फ्रिज, मिक्सर, हेअर ड्रायर, रेझर) बंद करा आणि प्लगमधून काढा.

पाण्यापासून, धातूच्या वस्तूंपासून आणि उंच झाडांपासून दूर राहा.

बाहेर असाल तर झाडाखाली किंवा उंच जागी उभे राहू नका; शक्यतो सुरक्षित आसरा मिळवा.

शेतात असाल तर दोन्ही पाय गुडघ्याजवळ घेऊन खाली बसा, कानावर हात ठेवा आणि जमिनीशी कमीतकमी संपर्क ठेवा.

पाण्यात असाल तर त्वरित बाहेर या.

विजेचा प्रभार जाणवला (केस उभे राहणे, त्वचेला मुंग्या येणे) तर त्वरित जमिनीवर ओणवे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा.

मुलं आणि पाळीव प्राणी घरात आहेत याची खात्री करा.

काय करू नये:

विजा चमकत असताना घराबाहेर जाऊ नका, प्रवास टाळा.

मोठ्या झाडाखाली किंवा उंच जागी उभे राहू नका.

धातूच्या वस्तू, लोखंड, तांबे जवळ ठेवू नका किंवा त्यांना स्पर्श करू नका.

टेलिफोन, मोबाईल चार्जिंग, किंवा इतर विद्युत उपकरणांचा वापर टाळा.

वाहत्या पाण्यात किंवा ओल्या भिंतींना, धातूच्या नळांना स्पर्श करू नका.

अफवांवर विश्वास ठेवू नका; अधिकृत माहितीच ग्राह्य धरा.

वीज पडल्यानंतर:

व्यक्तीवर वीज पडल्यास श्वास व हृदयाचे ठोके तपासा, कृत्रिम श्वास किंवा कार्डिआक कॉम्प्रेशन द्या, आणि त्वरित रुग्णालयात घेऊन जा.

**

No comments:

Post a Comment

  मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियान जास्तीत जास्त नागरिकांपर्यत पोहचवा - पालकमंत्री अतुल सावे मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र विशेष मोहिमेचे पालक...