Monday, January 30, 2017

जिल्हा परिषद, पंचायत समिती
 मतमोजणी केंद्र परिसरात 144 कलम लागू
नांदेड दि. 30 :-जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतमोजणीच्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्राच्या हद्दीपर्यंत गुरुवार 23 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत प्रतिबंधीत आदेश लागू करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी यादृष्टिने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी सुरेश काकाणी यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन गुरुवार 23 फेब्रुवारी 2017 रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरातील मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, मतमोजणीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, चिन्हांचे प्रदर्शन व मतमोजणीच्या कामाव्यवतीरिक्त व्यक्तीस प्रवेशास याद्वारे प्रतिबंधीत करण्यात आले आहे. 

00000000
जिल्हा परिषद, पंचायत समिती
मतदान केंद्र परिसरात 144 कलम लागू
नांदेड दि. 30 :-  जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतदान केंद्रावर गुरुवार 16 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. मतदान केंद्राच्या हद्दीपर्यंत मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत प्रतिबंधीत आदेश लागू करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून तसेच निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी यादृष्टिने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी सुरेश काकाणी यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन गुरुवार 16 फेब्रुवारी 2017 रोजी नांदेड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी मतदान होणार आहे अशा मतदान केंद्राच्या हद्दीपासून 200 मीटर परिसरातील मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, चिन्हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यवतीरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्याकरीता याद्वारे प्रतिबंधीत करण्यात आले आहे.  

000000
जिल्हा परिषदसाठी 59,
पंचायत समितीसाठी 50 नामनिर्देशपत्र दाखल
नांदेड दि. 30 :- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यात आज सोमवार 30 जानेवारी 2017 रोजी जिल्हा परिषद गटासाठी एकूण- 59 व पंचायत समिती गणासाठी एकूण- 50 नामनिर्देशनपत्रे दाखल झालेली आहेत. त्यांची तालुका निहाय माहिती पुढील प्रमाणे आहे.
माहूर- जि.प.-2 व पं. स.- 1 ,  किनवट- जि.प.-7 व पं. स.- 5 , हिमायतनगर- जि.प.-3 व पं. स.-4. हदगाव- जि.प.-8 व  पं.स.-5, अर्धापूर- जि.प.-2 व पं.स.-1, नांदेड- जि.प.-1 व पं. स.-2, मुदखेड- जि.प.- 1 व पं. स.- निरंक, भोकर- जि.प.-3 व पं. स.-निरंक, बिलोली- जि.प.-11 व पं.स.-15, नायगाव- जि.प.- 8 व पं. स.-7, लोहा- जि.प.-2 व पं. स.-1, मुखेड- जि.प.-5 व पं.स. -2, देगलूर- जि.प.-6 व पं.स.-7. तर उमरी, धर्माबाद आणि कंधार या तीनही तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज एकही नमानिर्देशनपत्रे दाखल झालेली नाहीत.

0000000
जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज
 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
नांदेड दि. 30 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मंगळवार 31 जानेवारी 2017 रोजी सकाळी 9.30 ते सायं.5.30 या वेळे डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे एक दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 
या शिबिराचे द्घाटन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांचे हस्ते होणार आहे. मनपा आयुक्त समीर उन्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिबिरा पुणे येथील ख्यातनाम इंग्रजीचे वक्ते प्रा. राजेश अग्रवाल हे विद्यार्थ्यांना स्पर्धा रिक्षेच्या संदर्भातील इंग्रजी विषयाची तयारी कशी करावी याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये चार रंगाचा पेन नोटबुक यासह उपस्थित रहावे , असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, मनपा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000000
कुष्ठरोगाविषयी माहिती देणाऱ्या
जनजागृती रॅलीचा उत्साहात शुभारंभ
नांदेड दि. 30 :- राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानानिमित्त जनजागृती रॅलीचा जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांनी हिरवा झेंडा दाखून नांदेड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील गांधी पुतळा पासून शुभारंभ केला. यापुर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास मान्यवरांची पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम, मनपा उपायुक्त रत्नाकर वाघमारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. इंगळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. श्याम नागापुरकर, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. डी. टी. कानगुले, डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. परतवाघ, डॉ. आईटवार, डॉ. एच. आर. साखरे, डॉ. नईम अन्सारी आदी वैद्यकीय अधिकारी, परिचारीका उपस्थित होते.  
सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) नांदेड यांच्यावतीने आयोजित ही रॅली गांधी पुतळ्यापासून महावीर चौक, वजिराबाद, पोलीस अधीक्षक कार्यालय, शिवाजी पुतळा मार्गे श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक शासकीय रुग्णालय नांदेड येथे समारोप झाला. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी दिसता चट्टा-डॉक्टरांना भेटा , हात मिळवा कुष्ठरोग मिटवा, बहुविध औषधोपचार, केला कुष्ठरोग गेला, एमडीटीची गोळी करी कुष्ठरोगाची होळी आदी फलक हातात घेवून उत्साहात घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधले होते.  रॅलीच्या समारोपाप्रसंगी जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात पथनाट्यामधून कुष्ठरोगाविषयी असणारे गैरसमज व औषधोपचार याची माहिती सादर केली.  रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी महात्मा गांधी पुतळ्यासमोर कुष्ठरोगाविषयी माहिती देणारे प्रदर्शनही भरवण्यात आले होते.   
जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाच्या अनुषंगाने आज दिनांक 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2017 या काळात आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत विशेष जनजागृती कुष्ठरोगाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.  दि. 6 ते 21 फेब्रवारी 2017 या दरम्यान शहरी भागात व गावामध्येही घरोघरी जावून ही विशेष कुष्ठरोग सर्वेक्षण मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेच्या काळात सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांनी केले आहे.
0000000000


  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...