सोशल मीडियाचा उपयोग
समाज निर्मितीसाठी करावा
-
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि.
15 :- आजची तरुणाई प्रामुख्याने सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करतांना दिसत
आहे. मात्र या सोशल मीडियाचा उपयोग त्यांनी प्राधान्याने चांगल्या समाज
निर्मितीसाठी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
माहिती व
जनसंपर्क महासंचालनालय जिल्हा माहिती कार्यालय नांदेडच्यावतीने नांदेड येथील
शासकीय अध्यापक महाविद्यालयात सोशल मीडिया महामित्र उपक्रमांतर्गत संवादसत्राचे
आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डोंगरे बोलत
होते. यावेळी शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे यांची
प्रमुख उपस्थिती होती.
सोशल
मीडियाचे आजच्या काळातील महत्व विशद करतांना जिल्हाधिकारी डोंगरे पुढे म्हणाले की,
या माध्यमामुळे संदेशाची देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात होत असल्याने या सामाजिक
माध्यमांचा प्रभावही तितकाच जास्त वाढत आहे. अनेकांशी जोडण्याच्या या नवीन
माध्यमाचा वापर चांगल्या समाजोपयोगी योजना त्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केला
गेला तर खऱ्या अर्थाने चांगली समाज निर्मिती होऊ शकते. महामित्र हा शासनाचा उपक्रम
अत्यंत स्तुत्य असून यामुळे सोशल मीडियातील प्रभावी युवक-युवती शासनाशी जोडले जात
आहेत. या व्यक्तींनी भविष्यात चांगले संदेश, चांगल्या योजना तळागाळापर्यंत
पोहचविण्याचा समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवावा, अशी सुचना करुन जिल्हाधिकारी
डोंगरे यांनी नांदेड जिल्ह्यातील वैशिष्ट्यपुर्ण योजनांची माहिती दिली. नांदेड
जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कार्य राज्यच नव्हे तर देशपातळीवर सुद्धा गौरविले
गेले आहे, असे सांगून त्यांनी नांदेड जिल्ह्याची परिपूर्ण माहिती देणाऱ्या
ॲप्लीकेशनची निर्मिती केल्याचे सांगून त्याचा वापर करण्याचे आवाहन केले.
जलयुक्त
शिवार अभियान, तलावातील गाळ काढण्याच्या उपक्रमातून जलसंवर्धनाची चळवळ जिल्ह्यात
सुरु असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डोंगरे यांनी माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयाने राबविलेल्या महामित्र उपक्रमाचे विशेष कौतूक केले. केवळ प्राप्त
झालेले संदेश कोणताही विचार न करता फारवर्ड करण्याची चुकीची पद्धत बदलून कोणताही
संदेश विचार करुन फारवर्ड केल्यास आपण अधिक कार्यक्षमपणे समाजाला दिशा देवून शकतो
हा विचार प्रत्येकाने बाळगावा असेही ते म्हणाले.
प्रारंभी
जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर आणि अनुलोम संस्थेचे जिल्हा प्रमुख विजय
मोरगुलवार यांनी प्रास्ताविक करुन पाहुण्यांचे स्वागत केले. शासकीय अध्यापक
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे यांनीही यावेळी आपल्या भाषणात सोशल
मीडियाचा वापर समर्पक समाजाच्या उद्धारासाठी करण्याचे आवाहन केले व अध्यापक
महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सुविधांचा आढावा देत या
महाविद्यालयाच्या स्वत:च्या इमारत उभारणीसाठी जागा उपलब्ध करुन देण्याच्या
प्रश्नाविषयी उहापोह केला. यावेळी महाविद्यालयाच्यावतीने त्यांनी जिल्हाधिकारी
डोंगरे यांचा यथोचित सत्कारही केला.
परीक्षक
मंडळीच्यावतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे
अधिव्याख्याता डॉ. वैजनाथ अनमुलवार यांनी मनोगत मांडले.
नांदेड
जिल्ह्यातील नऊ क्षेत्राच्या टॉप सहभागींचे नऊ संवादसत्र (गटचर्चा) सकाळी याठिकाणी
घेण्यात आल्या. यामध्ये सोशल मीडिया महामित्र ॲपद्वारे टॉप ठरलेल्या व्यक्तींनी
सहभाग नोंदविला या संवादसत्रासाठी डॉ. कल्पना बेलोकर, व्ही. एम. कल्याणपाड, एस.एस.
दासरवार, प्रा. महेश मोरे, डॉ. भास्कर भोसले, डॉ. सुलभा मुळे, डॉ. वैजनाथ अनमुलवार,
सुनिल हुसे, प्रा. सु. गं. जाधव, डॉ. एस. एस. सोळंके आणि माधव चुकेवाड यांनी
परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी सर्व परीक्षकांचा पुष्पगुच्छ व लोकराज्य अंक
देवून सत्कार करण्यात आला. संवादसत्रात सहभागी व्यक्तींना संदर्भमूल्य असलेली
महाराष्ट्र वार्षिकी पुस्तिका आणि लोकराज्य अंक देवून गौरविण्यात आले. सहभागींना
वर्षेभर लोकराज्य अंक मोफत पाठविण्यात येणार असून प्रमाणपत्र थेट ॲपवरुन डाऊनलोड
करुन मिळणार आहे. शेवटी विजय होकर्णे यांनी सर्वांचे आभार मानले तर अनुलोमचे बळीराम
पाटील यांनी सुत्रसंचालन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे
प्रा. हारुण शेख व त्यांचे सर्व सहकारी
तसेच जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रविण बिदरकर, महमंद युसूफ, विवेक डावरे, अलका
पाटील, काशिनाथ आरेवार, बालनरस्या यांनी तसेच अनुलोम संस्थेचे अशिष चौधरी, राम
साळवेश्वरकर, प्रविण श्रीमनवार, पांडुरंग बुद्धेवार, विष्णु माने आदिंनी परिश्रम
घेतले.
00000