Wednesday, August 16, 2017

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये
माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न
नांदेड दि. 16 :- स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येथील शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे माजी विद्यार्थांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेतील माजी विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचे व्यासपीठ प्राचार्य पी. डी. पोपळे यांनी मिळवून दिल्याबद्दल संस्थेचे माजी विद्यार्थी तथा नांदेड पाटबंधारे विभागात अधिक्षक अभियंता या पदावर कार्यरत असलेले समाधान सब्बीनवार यांनी आभार मानले. संस्थेच्या भावी काळात माजी विद्यार्थी संघटनेच्या रुपाने योगदान देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने संस्थेत वृक्षारोपन कार्यक्रम गतवर्षी राबविण्यात आला, इतकेच नव्हे तर त्यांची वर्षभरापासून निगा घेवून वाढविण्यात आल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. व्ही. बी. उश्केवार यांनी सांगितले. प्रत्येक माजी विद्यार्थ्यांने आपल्या मिळकतीतील अर्धा टक्का तरी संस्थेच्या विकास कामात दयावा, असे आवाहन श्री. उश्केवार यांनी केले. प्राचार्य पोपळे यांनी तंत्रनिकेतनमधील  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात माजी विद्यार्थी सक्रिय सहभाग नोंद शकतात.
संस्थेच्या विकास कामात माजी विद्यार्थ्यांनी सक्रीय होण्याचे आवाहन केले. यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष तथा शासकीय तंत्रनिकेतन नांदेडचे माजी प्राचार्य एस. एम. खासीम, सचिव ए. एम. मुद्दमवार, कोषाध्यक्ष एस. व्ही. अस्पत, सदस्य शिव सुराणा, जी. आर. मिरासे, उल्हास सुकळकर, गिरीष आरबड यांच्यासह बहुसंख्य माजी विद्यार्थी उपस्थित होते. मेळाव्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपआपल्या विभागाला भेटी दिल्या.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी  एस. पी. कुलकर्णी, के. एस. कळसकर, आर. एम. दुलेवाड, व्ही. व्ही. कुलकर्णी, एस. आर. मुधोळकर यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन आभार आर. के. देवशी यांनी केले.  

000000
कोल्हापुरी बंधाऱ्याच्या गेट दुरुस्तीचे कामे
तपासुन पुर्ण करावीत  - पालकमंत्री खोतकर   
नांदेड दि. 16 :- पर्जन्यमान कमी असल्यामुळे येत्या काळातील पाणीटंचाई लक्षात घेऊन पाणी वाहून जाऊ नये, यासाठी संबंधीत यंत्रणांनी कोल्हापुरी बंधाऱ्याच्या गेट दुरुस्तीचे कामे तांत्रिकदृष्ट्या तपासुन पुर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले.       
जलसंपदा लघुसिंचन, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे, जलसंपदा नांदेड पाटबंधारे दक्षीण, उत्तर विभागांतर्गत  कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये शंभर टक्के पाणीसाठा करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आढावा बैठक पालकमंत्री श्री. खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली काल (दि. 15) जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस आ. अमर राजुरकर, आ. हेमंत पाटील, आ. डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी अशोक शिनगारे, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, मनपा आयुक्त गणेश देशमुख, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता एस. के. सबीनवार, लघू सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू, उपजिल्हाधिकारी (रोहयो) बी. एन. कांबळे आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.    
पालकमंत्री श्री. खोतकर पुढे म्हणाले की, टंचाई व अतिवृष्टीमुळे नुकसान टाळण्यासाठी प्रकल्पाचे गेट उघडता व बंद करता आली पाहिजे. विष्णुपुरी प्रकल्पाच्या 18 नंबर गेटची व कोल्हापुरी बंधाऱ्याच्या गेट दुरुस्तीसाठी तांत्रिकदृष्ट्या तपासणी करावी. प्रकल्पातील पाणी वाहुन जाणार नाही याबाबत दक्षता घेऊन दुरुस्तीची कामे पुर्ण करावीत. पुढील पाणीटंचाई लक्षात घेऊन कोल्हापुरी बंधाऱ्यातील साठलेले पाणी वाहून जाऊ नये यासाठी दक्ष रहावे. गेटची किरकोळ दुरुस्ती, नादुरुस्त गेटसाठी, बांधकाम व इतर दुरुस्तीसाठी लागणारा निधी संबंधीत विभागाकडुन किंवा आमदार निधीतून खर्च करण्यासाठी प्रयत्न करावा. ज्या विभागाने कोल्हापुरी बंधारे बांधली त्यांनी बंधाऱ्याची देखभाल पुर्ण करावी. यासाठी वेळेत दखल घेऊन यंत्रणांनी सतर्क राहून त्याबाबत तयारी करावी. जिल्हाधिकारी नांदेड यांनी कोल्हापुरी बंधाऱ्यांना भेटी देऊन पाहणी करावी. त्याबाबत कामांच्या प्रगतीचा आढावा घ्यावा, अशा सूचना पालकमंत्री श्री. खोतकर यांनी दिल्या.  
जिल्ह्यात कोल्हापुरी बंधाऱ्यांची संख्या 176 असून संकलीत गेटची संख्या 12 हजार 465 आहे. कार्यरत असलेल्या गेटची संख्या 8 हजार 671, नादुरुस्त गेटची संख्या 3 हजार 794 आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.  

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...