Friday, September 4, 2020

 

कर्मचाऱ्यांची व रिक्त पदाची माहिती

ऑनलाईन आज्ञावलीमध्ये नोंदवावी

-         जिल्हा सांख्यिकी अधिकारी बासटवार

नांदेड (जिमाका) दि. 4 :- कर्मचारी सर्वंकष माहितीकोष 2020 तयार करण्याचे काम जिल्हा सांख्यिकी कार्यालयमार्फत सुर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यालयानी त्यांच्या कर्मचाऱ्यांची व रिक्त पदांची माहिती ऑनलाईन आज्ञावलीद्वारे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी नांदेड  यांनी केले आहे.

 

नियोजन विभागाचे शासन परिपत्रक 27 ऑगस्ट 2020 सार जिल्ह्यातील सर्व राज्यशासकीय कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयाची व त्यांच्या आस्थापनेवरील नियमित, नियमित्तेर, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी व तदर्थ तत्वावर असलेल्या कर्मचाऱ्यांची 1 जुलै 2020 यासंदर्भ दिनांकाची माहिती ऑनलाईन आज्ञावलीमध्ये नोंदविणे आवश्यक आहे. ही माहिती नोंदवून जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे प्रमाणपत्र-1 जोडल्याशिवाय वेतन देयके कोषागार कार्यालयाकडुन स्विकारण्यात येणार नाहीत. याची सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी.

 

ज्या शासकीय कार्यालयांची वेतन देयके कोषागारात सादर होत नाहीत, अशा कार्यालयानी सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांची व रिक्त पदांची माहिती ऑनलाईन आज्ञावलीद्वारे नोंदणी करुन जिल्हा सांख्यिकी अधिकारी यांच्याकडे सादर करावयाची आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सांख्यिकी अधिकारी, नांदेड जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचा दूरध्वनी 02462-252775, -मेल- dso.nanded@hotmail.com येथे संपर्क साधावा, असेही आवाहन नांदेडचे जिल्हा सांख्यिकी अधिकारी नि. ग. बासटवार यांनी केले आहे.

00000

 

जिल्हा परिषदेची शुक्रवारी सभा

नांदेड (जिमाका) दि. 4 :- नांदेड जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवार 11 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 1 वा. व्हिडीओ कॉन्फरन्स गुगल मीट (Video Conference Google Meet) या ॲपद्वारे व जिल्हा परिषदेचे सदस्य यांच्या कार्यक्षेत्रातील पंचायत समितीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सचिव तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी केले आहे.

00000

 

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत

समाज कल्याण कार्यालयाचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 4 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनु. जातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे काही प्रश्न अथवा स्वाधार योजनेबाबत त्यांना काही माहिती हवी असल्यास थेट सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड येथे चौकशी करावी. कार्यालयाबाहेरील इतर कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधू नये अथवा कोणत्याही अमिषास बळी पडू नये. तसेच कार्यालयाबाहेरील इतर कोणत्याही अनभिज्ञ व्यक्तीशी अथवा अधिकृत व्यक्तीशिवाय विद्यार्थ्यांनी अनाधिकृत व्यक्तींशी संपर्क केल्यास होणाऱ्या सर्व परिणामाची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत विद्यार्थ्यांची राहिल याची नोंद घ्यावी. संबंधीत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष समाज कल्याण कार्यालयातील संबंधीत कार्यासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.

                                                                         00000

 

14 सप्टेंबर रोजी रेती साठ्याचा लिलाव

नांदेड (जिमाका) दि. 4 :- नांदेड तालुक्यात विनापरवानगी अनाधिकृत गोळा केलेल्या रेतीसाठा महसूल विभागाने जप्त केला आहे. त्याची ईटीएस मोजणी करण्यात आली आहे. या रेतीसाठ्याचा लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अधिपत्याखाली सोमवार 14 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे केला जाणार आहे. 

सदर अवैध रेतीसाठा हा 425 ब्रासची  तिसरी फेरी असून सदर रेतीसाठा मौजे ब्राम्हणवाडा येथे उपलब्ध आहे. सदर रेतीसाठा गट नंबर निहाय असून तो पाहून तपासून घेऊन लिलावात भाग घ्यावा व अटी आणि शर्तीबाबतची माहिती गौण खनिज विभागात कार्यालयीन वेळेत पाहून घ्यावी, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.

                                                                         00000

 

माविमकडून ऑनलाईन उखाणे स्पर्धेचे आयोजन

स्पर्धेचे व्हिडीओ 10 सप्टेंबरपर्यंत पाठवावेत

नांदेड (जिमाका) दि. 4 :- सध्याच्या 'कोविड-19' च्या काळात महिलांचा उत्साह वाढविण्याच्या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) येणाऱ्या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन उखाणे स्‍पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेसाठीचे व्हिडीओ येत्या दि. 10 सप्टेंबर, 2020 पर्यंत माविमच्या जिल्हा कार्यालयाकडे पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

उखाणा घेणे हा महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेच्या जीवनातील जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याच गोष्टीला नजरेसमोर ठेऊन कोविडच्या सध्याच्या निराशामय काळात महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी राज्यातील महिलांसाठी महामंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती ठाकरे यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्‍पर्धा सर्व महिलांसाठी खुली असून ती निशुल्क आहे. ज्या महिलांना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी नाविण्‍यपूर्ण, जनजागृती करणारे, सामाजिक आशय असणारे तसेच ऐतिहासिक मूल्य असणारे यापैकी एका उखाण्याचा कमीत कमी दीड ते जास्तीत जास्त तीन मिनिटांच्या कालावधीचा व्हिडीओ तयार करून माविमच्या जिल्हा कार्यालयाकडे दिनांक 10 सप्‍टेंबर, 2020 पर्यंत पाठवावा.  

स्पर्धेसाठीचे उखाणे नाविण्यपूर्ण असावेत. त्यांचा आशय सामाजिक, ऐतिहासिक व प्रबोधनात्मक असावा. उखाणे हा मौखिक साहित्यिक प्रकार आहे. तरी या स्पर्धेसाठी त्यातील आशय हा प्रागतिक विचारांना पुढे नेणारा असावा. सर्वसाधाणपणे पतीच्या नावाभोवती उखाणे गुंफले जातात. पण, या स्पर्धेत समाजसुधारक, ऐतिहासिक व्यक्तीरेखा (विशेषत: स्त्री व्यक्तीरेखा), कोविड काळातील अत्यावश्यक सेवा यांच्यापैकी अथवा यासारखे तत्सम यांच्या भोवती उखाणे गुंफणे अपेक्षित आहे. उखाणा 'स्त्री पुरुष समानता' या मुल्यांचा पुरस्कार करणारा असावा. तो कमीत कमी दीड ते जास्तीत जास्त तीन मिनिट लांबीचा असावा. उखाणा पाठ असावा.  

जिल्ह्यात प्राप्त उखाण्याची जिल्हा स्तरावर परीक्षकाकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्‍या महिलांचे 3 क्रमांक आणि माविमेतर महिलांचे 3 क्रमांक काढून 6 व्हिडीओ विभागीयस्तरावर पाठविण्यात येतील. प्रति जिल्हा 6 याप्रमाणे साधारण एकूण 36 पात्र व्हिडीओ एका विभागीयस्तरावर प्राप्त होतील ज्यामधून परीक्षकाकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्‍या महिलांचे 3 क्रमांक व माविमेतर महिलांचे 3 क्रमांक काढून 6 व्हिडीओ मुख्यालयाकडे पाठविले जातील. 6 विभागाचे मिळून 36 पात्र व्हिडीओमधून राज्यस्तरावर केवळ माविमच्‍या महिलांचे ३ क्रमांक व माविमेतर महिलांचे 3 असे 6 क्रमांक काढले जातील. मात्र, विभागीयस्तरावर 36 पात्र महिलांना स्‍पर्धेत सहभागाबाबत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्‍यात येईल. राज्‍यस्‍तरीय विजेत्या 6 महिलांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात उखाणा सादरीकरणासाठीची संधी देण्‍यात येईल. याशिवाय प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहितीसाठी माविम मुख्यालयाचे कार्यक्रम व्यवस्थापक श्री. महेंद्र गमरे (भ्रमणध्वनी क्र. 9892548854) यांच्याशी किंवा जिल्हा कार्यालयांशी जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ 3 निकेतन निवास, पाटबंधारेनगर शिवरोड तरोडा नांदेड व्हाटसॲप क्रमांक 8275925108 ज्योति कापसे, (8446127112 प्रसार, एमआयएस), ई-मेल nanded.mavim19@gmail.com संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.   

000000

 

केंद्र शासनाचे 'बाल शक्ती पुरस्कार' आणि 'बालकल्याण पुरस्कार'

दि. 15 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 4 :- केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या 2021 साठीच्या 'बाल शक्ती पुरस्कार' आणि 'बालकल्याण पुरस्कार' साठी येत्या दि. 15 सप्टेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.

'बाल शक्ती पुरस्कार' हा वय 5 वर्षे ते 18 वर्षे वयोगटातील बालकांसाठी असून शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपूण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. अशा बालकांना हा पुरस्कार दिला जातो.

'बालकल्याण पुरस्कार' हा वैयक्तिक पुरस्कार आणि संस्था पुरस्कार अशा दोन गटात दिला जातो. वैयक्तिक पुरस्कार हा मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तिस हा पुरस्कार दिला जातो. संस्था स्तरावरील पुरस्कार हा बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला दिला जातो. संस्था पूर्णतः शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बालकल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी. 

बाल शक्ती पुरस्कार सन 2021 आणि बालकल्याण पुरस्कार 2021 साठीचे अर्ज हे www.nca-wcd.nic.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. पुरस्कारांविषयी अधिक माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे, असेही आयुक्तालयाने कळविले आहे.

0000

 

202 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

362 बाधितांची भर तर सहा जणांचा मृत्यू   

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- शुक्रवार 4 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 202 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 362 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 94 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 268 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 381 अहवालापैकी  966 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 8  हजार 212 एवढी झाली असून यातील  5  हजार 203 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाणे 65.85 टक्के एवढे झाले आहे. एकुण 2 हजार 698 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 271 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. 

 या अहवालात आज 6 जणांचा मृत्यू झाला असून मृत्त पावलेले व्यक्ती पुढील प्रमाणे आहेत. शुक्रवार 4 सप्टेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 46 वर्षाचा देगलूर येथील एक पुरुष, 61 वर्षाचा विनायकनगर नांदेड येथील एक पुरुष, 70 वर्षाचा विष्णुपुरी नांदेड येथील एक पुरुष, तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे नांदेड येथील 72 वर्षाचा एक पुरुष, 50 वर्षाचा किनवट येथील पुरुष तर खाजगी रुग्णालयात गणराज प्लाझा नांदेड येथील 56 वर्षाचा एका पुरुषाचा मृत्तांमध्ये समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 257 झाली आहे.

 आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील 2, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 10, मुखेड कोविड केंअर सेंटर 14, हदगाव कोविड केंअर सेंटर 2, लोहा कोविड केंअर सेंटर 10, माहूर कोविड केंअर सेंटर 12, नायगाव कोविड केंअर सेंटर 7, देगलूर कोविड केंअर सेंटर 6, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 23, पंजाब भवन कोविड केंअर सेंटर 52, खाजगी रुग्णालय 6, किनवट कोविड केंअर सेंटर 4, मुदखेड कोविड केंअर सेंटर 1, उमरी कोविड केंअर सेंटर 23, कंधार कोविड केंअर सेंटर 26, बिलोली कोविड केंअर सेंटर 4 असे  बाधित व्यक्तींना 202 औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 33, किनवट तालुक्यात 12, भोकर 5, लोहा 4, नायगाव 8, उमरी 5, धर्माबाद 1, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 3, अर्धापूर 1, हदगाव 4, देगलूर 4, मुखेड 8, हिंगोली 1, हिमायतनगर 3 व परभणी 1 असे एकुण 94 बाधित आढळले.  

 तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 132, अर्धापूर तालुक्यात 01,  मुखेड 3, किनवट 4, नायगाव 16, देगलूर 6, धर्माबाद 10, हिमायतनगर 1, हिंगोली 2, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 23, मुदखेड 4, बिलोली 2, लोहा 11, कंधार 6, हदगाव 12, माहूर 17, उमरी 15, लातूर 9 असे  एकुण 288 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 2 हजार 698 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 247, एनआरआय व पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 1124, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 82, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 54, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 85, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 126,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 56, लोहा कोविड केअर सेंटर येथे 113, हदगाव कोविड केअर सेंटर 57, भोकर कोविड केअर सेंटर 27,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 34,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 91, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 34, मुदखेड कोविड केअर सेटर 32,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 53, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 48, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 57, उमरी कोविड केअर सेंटर 38, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 5, बारड कोविड केअर सेंटर 4, खाजगी रुग्णालयात 305 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 17, निजामाबाद येथे 2 बाधित, मुंबई येथे 1 बाधित तर हैद्राबाद येथे 5 बाधित, लातूर येथे 1 बाधित  संदर्भित झाले आहेत.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण सर्वेक्षण 1 लाख 52 हजार 613

घेतलेले स्वॅब- 53 हजार 063,

निगेटिव्ह स्वॅब- 42 हजार 658,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 362,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 8 हजार 212,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-12,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 24,

एकूण मृत्यू संख्या- 257,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 5 हजार 203,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 698,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 488, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 271.  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...