Friday, September 4, 2020

 

माविमकडून ऑनलाईन उखाणे स्पर्धेचे आयोजन

स्पर्धेचे व्हिडीओ 10 सप्टेंबरपर्यंत पाठवावेत

नांदेड (जिमाका) दि. 4 :- सध्याच्या 'कोविड-19' च्या काळात महिलांचा उत्साह वाढविण्याच्या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) येणाऱ्या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन उखाणे स्‍पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेसाठीचे व्हिडीओ येत्या दि. 10 सप्टेंबर, 2020 पर्यंत माविमच्या जिल्हा कार्यालयाकडे पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

उखाणा घेणे हा महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेच्या जीवनातील जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याच गोष्टीला नजरेसमोर ठेऊन कोविडच्या सध्याच्या निराशामय काळात महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी राज्यातील महिलांसाठी महामंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती ठाकरे यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्‍पर्धा सर्व महिलांसाठी खुली असून ती निशुल्क आहे. ज्या महिलांना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी नाविण्‍यपूर्ण, जनजागृती करणारे, सामाजिक आशय असणारे तसेच ऐतिहासिक मूल्य असणारे यापैकी एका उखाण्याचा कमीत कमी दीड ते जास्तीत जास्त तीन मिनिटांच्या कालावधीचा व्हिडीओ तयार करून माविमच्या जिल्हा कार्यालयाकडे दिनांक 10 सप्‍टेंबर, 2020 पर्यंत पाठवावा.  

स्पर्धेसाठीचे उखाणे नाविण्यपूर्ण असावेत. त्यांचा आशय सामाजिक, ऐतिहासिक व प्रबोधनात्मक असावा. उखाणे हा मौखिक साहित्यिक प्रकार आहे. तरी या स्पर्धेसाठी त्यातील आशय हा प्रागतिक विचारांना पुढे नेणारा असावा. सर्वसाधाणपणे पतीच्या नावाभोवती उखाणे गुंफले जातात. पण, या स्पर्धेत समाजसुधारक, ऐतिहासिक व्यक्तीरेखा (विशेषत: स्त्री व्यक्तीरेखा), कोविड काळातील अत्यावश्यक सेवा यांच्यापैकी अथवा यासारखे तत्सम यांच्या भोवती उखाणे गुंफणे अपेक्षित आहे. उखाणा 'स्त्री पुरुष समानता' या मुल्यांचा पुरस्कार करणारा असावा. तो कमीत कमी दीड ते जास्तीत जास्त तीन मिनिट लांबीचा असावा. उखाणा पाठ असावा.  

जिल्ह्यात प्राप्त उखाण्याची जिल्हा स्तरावर परीक्षकाकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्‍या महिलांचे 3 क्रमांक आणि माविमेतर महिलांचे 3 क्रमांक काढून 6 व्हिडीओ विभागीयस्तरावर पाठविण्यात येतील. प्रति जिल्हा 6 याप्रमाणे साधारण एकूण 36 पात्र व्हिडीओ एका विभागीयस्तरावर प्राप्त होतील ज्यामधून परीक्षकाकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्‍या महिलांचे 3 क्रमांक व माविमेतर महिलांचे 3 क्रमांक काढून 6 व्हिडीओ मुख्यालयाकडे पाठविले जातील. 6 विभागाचे मिळून 36 पात्र व्हिडीओमधून राज्यस्तरावर केवळ माविमच्‍या महिलांचे ३ क्रमांक व माविमेतर महिलांचे 3 असे 6 क्रमांक काढले जातील. मात्र, विभागीयस्तरावर 36 पात्र महिलांना स्‍पर्धेत सहभागाबाबत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्‍यात येईल. राज्‍यस्‍तरीय विजेत्या 6 महिलांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात उखाणा सादरीकरणासाठीची संधी देण्‍यात येईल. याशिवाय प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहितीसाठी माविम मुख्यालयाचे कार्यक्रम व्यवस्थापक श्री. महेंद्र गमरे (भ्रमणध्वनी क्र. 9892548854) यांच्याशी किंवा जिल्हा कार्यालयांशी जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ 3 निकेतन निवास, पाटबंधारेनगर शिवरोड तरोडा नांदेड व्हाटसॲप क्रमांक 8275925108 ज्योति कापसे, (8446127112 प्रसार, एमआयएस), ई-मेल nanded.mavim19@gmail.com संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.   

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...